Grape Orchard Management : नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकटची पूर्वतयारी

Grape Orchard : नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकटची पूर्वतयारी कशाप्रकारे करतात यावरील लेख पाहुयात.
Grape Orchard
Grape OrchardAgrowon

डॉ. विलास घुले

Grape Advisory : ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत कलम केलेल्या बागेत आता वाढ पूर्णपणे थांबली असावी. कलम जोडाच्या वरती काडी परिपक्व झाल्यामुळे काडीची वाढ थांबलेली असते. यावरील पानांचे वयसुद्धा पूर्ण झाल्यामुळे ती पाने पिवळी पडून गळतील.

आता पानांची संख्याही वाढणार नाही. कलम केलेल्या बागेत कलम जोडावर फक्त एकच फूट राखलेली असते. तिची वाढही आता पूर्णपणे थांबलेली असल्यामुळे या बागेत अशा परिस्थितीत नवीन सांगाडा तयार करणे शक्य होत नाही म्हणून बाग रिकट करावी लागते. मागील हंगामात कलम केलेल्या बागेमध्ये ओलांडा तयार करून पुढील काळात योग्य काडी व्यवस्थापनासाठी येणारा कालावधी फार महत्त्वाचा असतो.

यामध्ये नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेतले जाते. रिकट घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे बागेत प्रत्येक वेल एकसारखी वाढावी. प्रत्येक वेलीचा खोड ओलांडा तयार होऊन एकसारख्या मालकाड्या तयार होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे पुढे जाऊन फळछाटणीनंतर चांगले उत्पादन घेण्यास मदत होते.

रिकटचा योग्य कालावधी

रिकट हा साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी या कालावधीमध्ये घेतला जातो. द्राक्ष बागेतील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा वाढण्यास सुरुवात झाल्यास अशी परिस्थिती रिकट घेण्यास फायदेशीर ठरते.

कारण या तापमानात वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो व येणाऱ्या नवीन फुटी या जोमदार आणि सशक्त असतात. ज्या ठिकाणी तापमान कमी आहे, अशा ठिकाणी डोळे फुटण्यास विलंब लागू शकतो. म्हणून अशा ठिकाणी घाई न करता तापमान वाढ झाल्यानंतरच रिकट घ्यावा.

Grape Orchard
Grape Orchard : कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष बागा वाचविण्यासाठी लगबग

खत व्यवस्थापन

रिकट घेतल्यानंतर नवीन निघणाऱ्या फुटींची वाढ जोमात होण्यासाठी खत व्यवस्थापन फार महत्त्वाचे असते. जवळपास एक वर्षापूर्वी लागवड केलेल्या बागेमध्ये मुळे अजून फारशी वाढलेली नसतील. यावेळी दोन वेलींमध्ये ३ ते ४ इंच खोल व २ फूट रुंदीची चारी वेलीच्या खोडापासून ८ ते ९ इंच अंतरावर घ्यावी.

या चारीमध्ये साधारणतः दीड ते दोन घमेले शेणखत प्रति वेल २५० ते ३०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रति वेल, १० किलो फेरस सल्फेट प्रति एकर, मॅग्नेशिअम सल्फेट १५ किलो प्रति एकर, झिंक सल्फेट ४ किलो प्रति एकर आणि बोरॉन अर्धा किलो प्रति एकर याप्रमाणे टाकून त्यावर मातीचा हलका थर टाकून घ्यावा.

त्यामुळे बोदामध्ये हवा खेळती राहून पांढरी मुळी तयार होण्यास मदत होते. ही कार्यवाही रिकटपूर्वी किमान १५ दिवस आधी करावी. द्राक्ष लागवडीखालील बऱ्याच बागेत जमिनीत चुनखडी कमी अधिक प्रमाणात दिसून येईल. चुनखडीमुळे बागेत महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचे वहन होत नाही. त्यांची वेलीवर कमतरता दिसून येईल. उदा. पानांच्या वाट्या होणे, पाने पिवळी पडणे व पेऱ्यातील अंतर कमी होणे अशा काही समस्या दिसून येतात.

यावर महत्त्वाची उपाययोजना म्हणजे जमिनीत सल्फरचा वापर करणे होय. १५ ते २० टक्के चुनखडी असलेल्या ठिकाणी १०० ते १२० किलो सल्फर प्रति एकर प्रति हंगाम याप्रमाणे पूर्तता करावी. थोड्या फार प्रमाणात चुनखडी असलेल्या बागेत ४० ते ५० किलो सल्फर प्रति एकर प्रति हंगाम याप्रमाणे वापर गरजेचा समजावा.

डॉगरीज खुंटावर कलम केलेल्या बागेत पहिल्या वर्षी पाने पिवळी पडतात. तसेच लहान आकाराची दिसतात. यामध्ये मुख्यतः फेरसची कमतरता दिसून येते. त्यामुळे रिकटपूर्वी फेरसची उपलब्धता करून देणे गरजेचे असते.

Grape Orchard
Grape Orchard Management : वाढत्या तापमानाचा द्राक्ष बागेवर काय परिणाम होतो?

काडीची परिपक्वता

रिकट घेण्यापूर्वी कलम जोडावर ६ ते ७ पेरे परिपक्व असणे गरजेचे आहे. त्यामुळे नव्या फुटी निघण्यास चांगली मदत होते. ज्या बागेत अशी परिस्थिती नसेल अशा ठिकाणी रिकट थोडा उशिरा घ्यावा.

या वेळी वेलीवर पोटॅशयुक्त (०:०:५०) खतांची २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे गरजेनुसार २ ते ३ फवारण्या घ्याव्यात. शेंडा पिंचिंग करून घ्यावा. यामुळे काडीस परिपक्वता येण्यास मदत होईल.

पानगळ करणे

ज्या बागेमध्ये रिकट घ्यावयाचा आहे, अशा ठिकाणी पानगळ करून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. ज्या ठिकाणी रिकट घेणार, त्याच्या खाली व वर तीन ते चार डोळे उघडे राहिल्यास रिकटनंतर नवीन सशक्त आणि जोमदार फूट निघण्यास मदत होते. रिकटच्या ८ ते १० दिवस आधी पाणी बंद करून पानगळ करावी. ही पानगळ हाताने किंवा रसायनांच्या (इथेफॉनच्या) साह्यानेही करून घेता येईल.

बागेतील पानांच्या परिस्थितीनुसार रसायनांचे प्रमाण ठरवले जाते. भारी जमिनीमध्ये हिरवेगार पाने असलेल्या परिस्थितीमध्ये देठाची व पानांची पकड मजबूत असते. अशा वेळी रसायनांचे प्रमाण हे जास्त लागते. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ३ ते ४ मिलि प्रति लिटर पाणी यापेक्षा जास्त प्रमाण वाढविण्याची आवश्यकता नाही.

याचसोबत कलम जोडावर ६ ते ७ पेराच्या ठिकाणी बांबूला सुतळी बांधून घेणे व वरच्या सर्व सुतळ्या सोडून फूट खाली वाकून द्यावी. यामुळे अन्नद्रव्ये मागे येऊन काडीची वाढ थांबते. डोळ्यामध्ये अन्नद्रव्य येऊन डोळे फुटण्यास मदत होईल.

हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग

रिकट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी हायड्रोजन सायनामाइडची पेस्टींग करून पेस्टिंग घ्यावे. त्यासाठी काडीची जाडी आणि बागेतील उपलब्ध तापमान यावरून हायड्रोजन सायनामाइडची मात्रा निश्‍चित करून घ्यावी.

साधारणपणे ३० ते ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान असलेल्या बागेत ३५ मिलि प्रति लिटर हायड्रोजन सायनामाइड पुरेसे होईल. बागेत जर पानगळ झाली नसल्यास हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग पुन्हा करावे. त्याचप्रमाणे जाड काड्यांवर देखील पुन्हा एकदा पेस्टिंग करणे गरजेचे समजावे.

मागील हंगामात द्राक्ष वेलीवर पावसाळी वातावरणात बऱ्याच प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला असू शकतो. या रोगांचे सुप्तावस्थेतील बीजाणू पुढे पोषक वातावरण मिळताच वेगाने वाढू शकतात. त्यातून रोगाचा प्रसार होतो. रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार यावर लक्ष ठेवावे. याचसोबत बागेतून छाटणी केलेल्या काड्या बाहेर काढाव्यात. तसेच हायड्रोजन सायनामाइडच्या पेस्टिंगनंतर दुसऱ्या दिवशी १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी बागेत करून घ्यावी.

रिकट घेताना

ज्या बागेमध्ये जास्तीत जास्त खोड तयार झाले आहे, अशा ठिकाणी १२ ते १४ मिमी जाड असलेल्या खोडावर रिकट घेता येईल.

ज्या ठिकाणी वाढ ही कलम जोडाच्या वरती खुंटलेली आहे, अशा ठिकाणी कलम जोडाच्या वरती ३ ते ४ डोळे राखून छाटणी घ्यावी.

बागेमध्ये सर्वसाधारण एकसारखी जाडी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी रिकट घेण्याची साधारणतः शिफारस असते. ज्या बागेत कलम जोडाच्या वरती कमी अधिक प्रमाणात काडीची जाडी दिसून येईल, अशा बागेत कलम जोडाच्या वरती ६ ते ७ डोळ्यावर रिकट घ्यावा.

- डॉ. विलास घुले, ९७६७३६१९९५, (शास्त्रज्ञ - उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्‍वर, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com