Team Agrowon
सध्याच्या परिस्थितीत बागेतील वातावरणाचा विचार करता, प्रत्येक ठिकाणी तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान वाढलेले असून, तितक्याच प्रमाणात आर्द्रता कमी झालेली आहे. या वेळी बागेत द्राक्ष वेलीच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था आढळून येतील.
जुन्या बागेत खरडछाटणी उशिरा झाली असल्यास, या वेळी वाढत्या तापमानात डोळे फुटतेवेळी अडचणी येतात. प्रखर सूर्यप्रकाशाची किरणे डोळ्यांवर जास्त काळ पडल्यामुळे डोळ्यातील पेशी सुकतात, जळतात किंवा मरतात. त्यामुळे डोळे फुटत नाहीत किंवा कमकुवत डोळे फुटतात व कालांतराने ओलांडा डागाळण्याची समस्या निर्माण होते.
दुसऱ्या परिस्थितीतील बागेत ३ ते ४ पानांची अवस्था असल्यास, वाढत्या तापमानात फुटी सुकण्याची समस्या दिसून येईल. निघत असलेल्या फुटींवरील पानांचे वय कमी असल्यामुळे ही पाने स्वतः अन्नद्रव्ये तयार करू शकत नाहीत. त्यामुळे ही पाने काडीतून किंवा ओलांड्यातून अन्नपुरवठा करून अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करतात.
एकदा पानाचे वय व आकार वाढल्यास, प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून स्वतःचे अन्नद्रव्य तयार करून वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग सुरळीत होतो. परंतु तीन ते चार पाने अवस्थेत वाढत्या तापमानात पानांद्वारे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते. त्यामुळे पुरवठा आणि उपलब्धता यामध्ये ताळमेळ बसत नसल्यामुळे पानांमध्ये पाण्याची गरज वाढते. ही गरज पूर्ण न झाल्यामुळे पानांच्या कडा सुकताना दिसून येतात.
तापमान जास्त असलेल्या बागेत वारे जास्त प्रमाणात वाहत असल्याचा अनुभव येईल. या वेळी जमिनीतून सुद्धा पाणी जास्त प्रमाणात निघून जाईल. जास्त तापमानामुळे पानांतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेगही जास्त असेल. त्यामुळे सबकेनकरिता पिचिंग केल्यानंतर बगलफूट निघण्याकरिता अडचणी येऊ शकतात.
हलक्या जमिनीतील द्राक्ष बागेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे पाण्याची गरज जास्त असते. या वेळी बागेत सबकेननंतर बगलफुटी निघणे महत्त्वाचे आहे.