Mango Farming Management : गुणवत्तापूर्ण हापूस उत्पादनासाठी काटेकोर व्यवस्थापनावर भर

Mango Production : रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील राजेंद्र कदम यांची पारंपरिक आंबा बागायत आहे. मागील दोन दशकांपासून दर्जेदार हापूस आंबा उत्पादनात राजेंद्र कदम यांचा हातखंडा आहे.
Mango Orchard
Mango OrchardAgrowon
Published on
Updated on

Mango Crop Management :

शेतकरी नियोजन । पीक : हापूस आंबा

शेतकरी : राजेंद्र मोतिराम कदम

गाव : मजगाव, ता. जि. रत्नागिरी

हापूस आंबा क्षेत्र : ५० एकर

रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील राजेंद्र कदम यांची पारंपरिक आंबा बागायत आहे. मागील दोन दशकांपासून दर्जेदार हापूस आंबा उत्पादनात राजेंद्र कदम यांचा हातखंडा आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण हापूस कसा देता येईल याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. आंब्याचा दर्जा चांगला असल्याने बाजारात दरही तुलनेत अधिक मिळतो.

सुमारे ५० एकरांतील हापूस आंबा बागेत साधारणपणे ३ हजार कलमे आहेत. दर्जेदार आंबा उत्पादनासाठी प्रत्येक हंगाम संपल्यानंतर जून महिन्यापासून बाग व्यवस्थापनावर भर दिला जातो. बागेतील उत्पादित हापूस आंब्याची परदेशातही निर्यात केली जाते. रेसिड्यू फ्री उत्पादनासाठी शेवटच्या टप्प्यातील फवारणी केल्यानंतर साधारणपणे ४० दिवसांनी प्रत्यक्ष फळ काढणीस सुरुवात केली जाते. त्यामुळे बागेतील हापूसला मागणी अधिक असते, असे श्री. कदम सांगतात.

Mango Orchard
Mango Farming Management : केसर बागेत काटेकोर व्यवस्थापनावर भर

मागील कामकाज

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील हंगाम संपला. त्यानंतर साधारणपणे ७ ते १५ जूनच्या दरम्यान बागेमधील झाडांना चरी मारण्याचे काम सुरू केले. चरीची उंची १० इंच आणि रुंदी ८ ते १० इंच इतकी ठेवली. त्यात शेणखत, बागेतील पालापाचोळा व रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या. कलमाच्या आकारमानानुसार रासायनिक खतांच्या मात्रा देण्यात आल्या. शेणखताचा वापर जास्त करत असल्यामुळे रासायनिक खतांच्या मात्रा कमी दिल्या जातात. भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे युरियाचा वापर कमी केला जातो.

चरीमध्ये पालापाचोळा टाकल्यानंतर रासायनिक खतमात्रा दिली जाते. त्यामुळे पालापाचोळा कुजण्यासही मदत होते. तसेच चरी मारल्यामुळे गांडूळही मरत नाहीत. पाऊस पडल्यानंतर ते झाडांच्या मुळातच विरघळते. खतमात्रा देण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कलमांची आळी व्यवस्थित करून घेतली. साधारणपणे जून महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे या काळात बागेत कोणतीही कामे करणे शक्य झाले नाही.

पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बागांची साफसफाई केली.

यावर्षी पाऊस १५ ते २० दिवस लांबल्यामुळे फवारणी कामे उशिराने सुरू केली. कलमांना पालवीही उशिराने येण्यास सुरवात झाली. पालवी आल्यानंतर किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. पालवीचे संरक्षण करण्यासाठी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पहिली शिफारशीत रासायनिक घटकांची फवारणी केली. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव टाळणे शक्य झाले.

Mango Orchard
Fruit Crop Management : थंडीत फळबाग व्यवस्थापनात करायचे बदल

नोव्हेंबर महिन्यात मोहर येण्यास सुरुवात झाली. त्याचे प्रमाण तुलनेने कमी होते. हापूस उत्पादन एक वर्षाआड घेतले जाते. त्यामुळे यंदा मोहोर कमी अपेक्षित होते. परंतु तुलनेत ५० टक्के मोहर आलेला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मणिपूरला झालेल्या वादळाचा परिणाम कोकणातील वातावरणावर झाला. त्यामुळे मोहोर येणाऱ्या कलमांना पालवी फुटली. गतवर्षी मोहोर आलेल्या कलमांना तेवढ्याच ताकदीने फळधारणा होईलच असे नाही, असे राजेंद्र कदम सांगतात.

आगामी नियोजन

सध्या बागेत कलम हलवणीची कामे सुरू आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यात आलेल्या फुलोऱ्याला फळधारणा होण्यासाठी कलमांची हलवणी केली जाते. त्यामुळे कलमांवरील सुकलेला मोहर गळून पडण्यास मदत होते. मोहर गळून पडल्यानंतर लहान कैऱ्या दिसून येण्यास सुरुवात होईल. काही कलमे करवंदीच्या आकाराची फळे लगडलेली आहेत. तर काही कलमांवरील कैऱ्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत चिकूच्या आकाराइतक्या होतील.

हापूस निर्यातीसाठी पाठविला जात असल्यामुळे निर्यातीच्या निकषांनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन करण्यावर भर दिला जातो. कमी रेसिड्यू असलेल्या रासायनिक निविष्ठांचा वापर केली जातो. साधारणपणे फळ काढणीस प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी किमान ४० दिवस आधी रासायनिक फवारणी थांबविली जाते. फळांमध्ये रासायनिक अंश राहणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे श्री. कदम सांगतात.

Mango Orchard
Kesar Mango Farming : संघर्षातून कुटुंबाने साधली उन्नती

दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यापासून पुढे उष्णतेत वाढ होते. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव देखील कमी दिसून येतो. पोषक वातावरणामुळे हापूस वेगाने तयार होण्यास मदत मिळते. त्यामुळे रासायनिक फवारणीची तितकी आवश्यकता भासत नाही. फळ काढणीसाठी झेल्याच्या वापर केला जाते. त्यासाठी धारदार आणि नव्या पद्धतीची ब्लेड वापरली जातात. फळ काढताना देठ मोठा ठेवला जातो. देठ तुटून फळातील चिक बाहेर पडणार नाही याची काळजी घेतली जाते. काढणीनंतर फळे स्वच्छ केली जातात. देठ असलेली फळे वेगळी काढली जातात.

आंबा काढणीनंतर लगेच क्रेटमध्ये भरून गोडाऊनमध्ये सावलीत आणला जातो. जेणेकरून उन्हाचा फळांवर परिणाम होणार नाही. काढणीनंतर आंब्यांची गोडाऊनमध्ये प्रतवारी केली जाते. फळांचे वजन आणि एका पेटीतील आंबे यांचा विचार करून प्रतवारी करण्यावर भर दिला जातो.

प्रतवारी करताना एक नंबरचे फळ वजनाला साधारण ३२० ग्रॅमच्या वर भरेल एवढे असते. वजनकाट्यावर वजन करूनच नंतर हापूस आंबा पेटीत भरला जातो. पाच डझनाच्या पेटीमध्ये २८० ते ३०० ग्रॅम वजनाची फळे भरली जातात. सहा डझनची पेटी २४० ते २८० ग्रॅम वजनाच्या फळांची, २०० ते २४० ग्रॅम वजनांच्या फळांची पेटी सात डझनची पेटी, तर १७० ते २०० ग्रॅम वजनाच्या फळांची आठ डझनची पेटी असते. त्यापेक्षा छोट्या आंब्याची पेटी ९ डझन प्रमाणे भरली जाते.

प्रतवारी करताना डाग असलेले आंबे बाजूला वेगळे काढले जातात. आंबे पेटीत भरताना विशेष काळजी घेतली जाते. अधिक दर मिळावा यासाठी फळांचा दर्जा चांगला राखण्यावर भर दिला जात असल्याचे राजेंद्र कदम सांगतात.

पीक संरक्षण

कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेतील कलमांची नियमितपणे दर ४ ते ५ दिवसांनी तपासणी केली जाते. जेणेकरून प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर जाण्यापूर्वी नियंत्रण करणे शक्य होईल. पालवी कोवळी असताना त्यातील रस शोषण्यासाठी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. सुरुवातीच्या टप्प्यात कलमांवर शेंडे पोखरणारी अळी, कोळी, तुडतुडा आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी रासायनिक कीडनाशकांची दर १५ दिवसांनी नियमित फवारणी करण्यास सुरुवात केली. किडींची ओळख पटवून त्यानंतर रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाते. त्यामुळे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होत असल्याचे राजेंद्र कदम सांगतात.

- राजेंद्र कदम, ९२७२५२६८६८, ९४२२४३३१३३

(शब्दांकन : राजेश कळंबटे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com