Silage Production : मुरघास बनविताना काय काळजी घ्यावी?

Green Fodder : पावसाच्या अनिश्‍चित आणि अनियमित प्रमाणामुळे अनेक वेळा चाऱ्याची टंचाई निर्माण होते. हिरवा चारा वर्षभर साठविण्यासाठी मुरघास निर्मिती हा एकमेव पर्याय आहे. मूरघास निर्मिती करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती घेऊ.
Silage
Silage Agrowon
Published on
Updated on

के. जी. सोळंकी, डॉ. एस. व्ही. गायकवाड, पी. एस. कटारे

Silage Making : पावसाळा आणि त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये चारा उपलब्ध होतो. त्या काळामध्ये आजूबाजूचा परिसर, शेताचे बांध व अन्य पडीक जमिनीही बऱ्यापैकी गवतांनी व्यापलेल्या असतात. मात्र हा काळ संपताच दूध उत्पादकांसमोर पौष्टिक हिरवा चाऱ्याची समस्या निर्माण होते. त्यामुळेच हिरवा चारा उपलब्ध असतानाच उत्तम प्रकारे मुरघास तयार करून त्याचे साठवण केल्यास वर्षभराची ददात मिटू शकते. त्यामुळे खर्चात मोठी बचतही साधते.

मुरघास म्हणजे काय?

मुरघास म्हणजे मुरलेला चारा (घास). अगदी आपल्या मुरांबा किंवा मोरावळ्यासारखा. हिरवा चारा त्याच्या पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश न होऊ देता किमान ४५ दिवस हवाबंद करून वेगवेगळ्या मार्गांनी साठवून ठेवणे म्हणजे मुरघास होय.

मुरघास बनविण्याची प्रक्रिया

मका व ज्वारीसारखी चारापिके ७५-८० दिवसांत कापणीला येतात. चारापिके हे चिकाच्या किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेत आली की कापावीत. त्यातील पाण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असावे. त्यापेक्षा अधिक पाणी असल्यास नुकसान होऊ शकते. ते टाळण्यासाठी कापणीनंतर थोड्या वेळेसाठी चारा सुकू द्यावा. त्यानंतर कुट्टी मशिनने चाऱ्याचे एक-दोन इंच लांबीचे तुकडे करावेत. कुट्टी केल्यानंतर ती त्वरित मुरघास करण्याच्या बॅगेत, खड्ड्यात किंवा बांधकाम केलेल्या जागी आणून टाकावी.

Silage
Silage Production : यांत्रिक मुरघास निर्मितीत ‘ऑरगॅनिका’ कंपनीची ओळख

कुट्टी टाकल्यानंतर ती पसरवावी. धुमशाने किंवा पायाने अथवा ट्रॅक्टरने तुडवावी. यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाते. कुट्टी दाबून बसते. मध्याप्रमाणेच सर्व बाजू, कडावर कुट्टी चांगली दाबून घ्यावी. मुरघास बनण्यासाठी प्रत्येक थरावर काही जिवाणू असलेले द्रावण, मीठ फवारावे. या प्रमाणे एकावर एक चाऱ्याचा थर टाकून फवारणी करावी.

प्रत्येक थर व्यवस्थित दाबून शेवटचा थर देखील चांगला दाबून घ्यावा. त्यावर त्वरित प्लॅस्टिकचे आच्छादन घालून हवाबंद करावे. त्यामुळे मुरघास लवकर तयार होतो. बुरशीही लागत नाही. प्लॅस्टिक आच्छादनावर सहा इंच जाडीचा मातीचा थर द्यावा. त्यावर पावसाचे पाणी साठून राहणार नाही, यासाठी योग्य उतार द्यावा. एक चौरस फूट जागेत १५ ते १६ किलो चारा तयार होतो, हे लक्षात घेऊन आपल्या आवश्यकतेनुसार खड्डे किंवा बांधकाम करावे.

पहिल्या वेळी मुरघास बनविताना त्यात काहीही टाकू नये. शक्य असल्यास जिवाणूंचे द्रावण फवारावे. चारा चांगल्या प्रकारे हवाबंद करावा. त्यामुळे बुरशींना प्राणवायू न मिळाल्याने त्यांची वाढ होत नाही. जिवाणूंमार्फत लॅक्टिक ॲसिडची निर्मिती झाल्यामुळे चारा टिकून राहतो. त्यामुळे चारा खराब होण्याची शक्यता कमी होते. प्रायोगिक तत्वावर थोड्या प्रमाणात मुरघास करून पाहावा. हळूहळू तंत्र शिकून घ्यावे.

Silage
Silage Making : तंत्र दर्जेदार मुरघास निर्मितीचे

दर्जेदार मुरघास निर्मितीसाठी महत्त्वाचे

चारा पीक व जातीची निवड : अधिक अन्नघटक मुरघासामार्फत जनावरांना मिळण्यासाठी योग्य चाऱ्याची निवड आवश्यक आहे. मुरघास बनविण्यासाठी शक्यतो एकदल पिकांची निवड करावी. कारण त्यामध्ये कर्बोदके आणि साखरेच प्रमाण जास्त असतात. मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, व काही गवती चारा पिके वापरली जातात. यामध्ये जगभरात मका या पिकाचा सर्वाधिक वापर होतो. मक्याचा मुरघास अतिशय चांगला होत असल्याचा अनुभव आहे. मुरघासासाठी चिकातील मका व फुलोऱ्यातील ज्वारीचा वापर हमखास करतात. याबरोबरच ल्युसर्न सारखे पीकही एकत्र करून मुरघास बनविता येतो.

कापणी करताना योग्य वेळ : पिकामध्ये सर्वाधिक अन्नघटक असणारी, पचनीयता असलेली व त्याच वेळी अधिक उत्पादन असणारी वेळ निवडून कापणी करावी. प्रत्येक चाऱ्यामध्ये कापणीची विशिष्ट वेळ असते. उदा. मक्याचे कणीस मधोमध मोडले तर त्यामध्ये पांढरी दुधाची रेषा दिसते.

चारा कुट्टीचा आकार : मुरघासाच्या गुणवत्तेसाठी कुट्टीचा आकार हा दीड ते दोन सेंटिमीटरच्या दरम्यान असावा. कुट्टी करताना मक्याचे दाणे फुटलेले असावेत. यामुळे मुरघास चांगला दाबला जाऊन पचनीयता वाढते.

बाह्य मिश्रण : मुरघास करताना सर्व नियम पाळत असू तर बाह्य मिश्रण टाकण्याची गरज नाही. मात्र काही वेळा पाण्याचे प्रमाण थोडे जास्त आहे, कापणी उशिरा झाली आहे, अशा स्थितीमध्ये किण्वन प्रक्रियेला मदत करण्यासाठी काही उपयुक्त जिवाणूंची मदत घ्यावी. अशा वेळी मीठ व युरिया यांचा वापर टाळावा.

मुरघास दाबण्याची प्रक्रिया : मिश्रणातील हवा बाहेर काढून टाकण्यासाठी व त्याची हवारहित स्थिती जपण्यासाठी व्यवस्थित दाबून घ्यावे. त्यासाठी कुट्टीचा आकार, पाण्याचे प्रमाण, हवा बाहेर काढण्यासाठी वापरली जाणारी पद्धत फार महत्त्वाची आहे.

आंबवण प्रक्रिया : मुरघासाची गुणवत्ता पूर्णत : किण्वन किंवा आंबवण प्रक्रिया किती प्रभावीपणे होते यावर अवलंबून आहे. आंबून मुरघासाचा सामू ४.२ ते ४.५ च्या दरम्यान आला पाहिजे.

अन्नघटकांचे नुकसान : मुरघास करताना चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण हे शिफारशीपेक्षा जास्त असेल तर तळाशी पाणी जमा होते. यातून काही अन्नघटक बाहेर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचे प्रमाण कायम ६५ ते ७० टक्के राहील याची दक्षता घ्यावी.

शुष्क घटकांचे प्रमाण : मुरघास अधिक गुणवत्तेचा होण्यासाठी त्यामध्ये शुष्क घटक (३० ते ३५ टक्के) व पाणी (६५ ते ७० टक्के) असले पाहिजे. पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास त्यातील पाणी तळाशी जमा होते किंवा अन्नघटकांसह वाहून जाते. पाण्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा कमी असल्यासही किण्वन प्रक्रिया योग्य प्रकारे होत नाही.

मुरघासाचा रंग, वास : फिक्कट तपकिरी ते पिवळा रंग, योग्य आम्लता, पिकलेल्या कवठाच्या फळासारखा वास असणारा मुरघास चांगला असतो. या पेक्षा वेगळा रंग किंवा वास असेल तर त्याची गुणवत्ता कमी असेल असे समजावे.

मुरघासाचे फायदे

मुरघासामुळे वर्षभराच्या हिरव्या चाऱ्याचे नियोजन आगाऊ, पावसाळा असतानाच करता येते.

उन्हाळ्यातही जनावरांना हिरवा आणि पौष्टिक चारा उपलब्ध होऊ शकतो.

रोज शेतात जाऊन वैरण कापून आणण्याचे कष्ट वाचतात.

पारंपरिक पद्धतीच्या चारा व्यवस्थापनामध्ये पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याचे अधिक प्रमाण तर उन्हाळ्यात कडबा, सुकलेले गवत यांचे प्रमाण वाढते. परिणामी जनावरांचे आरोग्य बिघडते. दूध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्या तुलनेमध्ये मुरघासामुळे वर्षभर चांगल्या प्रतीचा एकसारखा चारा मिळत राहिल्याने जनावरांमधील पोटाचे आजार कमी होऊन आरोग्य वाढते.

कमी क्षेत्रात अधिक पशू सांभाळणे शक्य होते. पावसाळ्यात किंवा मुबलक चारा असताना चाऱ्याची किंमत कमी असते. त्या वेळी तो विकत घेऊन मुरघास बनवून साठवल्यास फायदा होतो.

जनावरे मुरघास आवडीने खात असल्याने वाया जाण्याचे प्रमाण कमी असते. दूध उत्पादनात अप्रत्यक्षरीत्या वाढ होते.

मुरघासाचा चारा पीक ७५ ते ८० दिवसांत तयार होते. त्या जमिनीत पुन्हा लगेच दुसरे पीक घेणे सोपे जाते.

०२४०- २६४६२५२, (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, जि. छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com