New Orchard Cultivation : नवीन फळबाग लागवड करताना घ्यावयाची काळजी

Orchard Care : प्रथम झाडेझुडपे तोडून जमीन स्वच्छ करावी. नंतर जमीन उभी-आडवी दोन वेळा खोल चांगली कुळवणी करावी. त्यानंतर फळी फिरवून समपातळीत आणावी.
New Orchard Cultivation : नवीन फळबाग लागवड करताना घ्यावयाची काळजी
Agrowon
Published on
Updated on

डॉ. एम. बी. पाटील, प्रवीण मांजरे

Orchard Update : आपल्या राज्यातील हवामान फळबाग लागवडीसाठी अनुकूल आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात आंबा, केळी, चिकू, पपई, नारळ इ., तर पूर्वेकडील उष्ण व कोरड्या हवामानात संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, द्राक्षे, डाळिंब इ. घ्यावीत.

कोकणा सारख्या अति पावसाच्या भागात चिकू, नारळ, फणस, आंबा, काजू इ. फळझाडे घ्यावीत. तर पावसाचे प्रमाण अति कमी असलेल्या भागात बोर, सीताफळ, आवळा, चिंच अशी कोरडवाहू फळझाडे घ्यावी. हंगामी पिकांच्या जोडीला फळबाग असल्यास शाश्‍वत उत्पन्नाची खात्री मिळते.

लागवडीची पूर्वतयारी

फळबाग लागवड दीर्घ मुदतीची, जास्त गुंतवणुकीची बाब आहे. त्यामुळे सुरुवातीला झालेली चूक नंतर भरून काढता येत नाही.

त्यामुळे लागवडीचे नियोजन करण्यापूर्वी जमिनीची निवड, मातीची तपासणी, फळ पिकाची निवड, लागवडीचा आराखडा, जातिवंत कलमे, रोपांची निवड, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ या सर्व गोष्टींचा विचार करावा. एकदा फळपिकाची निवड झाल्यानंतर लागवडीची योग्य वेळ आणि लागवड केलेल्या रोपांची काळजी, पीक संरक्षण या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरतात.

New Orchard Cultivation : नवीन फळबाग लागवड करताना घ्यावयाची काळजी
Orchard Cultivation : एक हजार ७२४ हेक्टरवर फळबाग लागवड

जमिनीची निवड : फळबाग ही दीर्घकालीन गुंतवणूक असल्यामुळे जागेची निवड ही महत्त्वाची ठरते. निवडीच्या वेळी फक्त जमिनीचा पृष्ठभाग पाहून अंदाजे निर्णय घेण्यापेक्षा प्रत्यक्ष मातीचे परीक्षण करून घ्यावे. ४ ते ५ ठिकाणी १ ते १.५ मीटर खड्डे खोदून मातीचे नमुने काढून माती तपासून घ्यावी.

सर्वसाधारण फळझाडांना कमीत कमी १ मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमीन पाहिजे. तसेच जमिनीतील पाण्याची पातळी ३ मीटरच्या वर येणे उपयोगाचे नसते. कारण पाण्याचा निचरा नीट न झाल्यामुळे पिकांच्या मुळावर त्याचा विपरीत होतो. फळझाडांकरिता गाळाच्या उत्तम निचऱ्याच्या जमिनी योग्य ठरतात.

ज्या जमिनीतून पाण्याचा उत्तम निचरा होत नाही, अशा जागेत कोणतेच फळझाड चांगले येत नाही. जमिनीच्या रासायनिक गुणधर्मांचा विचार करता, भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत, मध्यम पोताची, जमिनीचा सामू ६ ते ७ पर्यंत असावा. जमिनीतील चुनखडीचे प्रमाण १० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असेल, तेथे आंबा, पेरू, चिकू, संत्रा, मोसंबी, लिंबू, तत्सम फळांची लागवड घेऊ नये.

जमिनीच्या प्रकारानुसार फळपिकांची निवड

भारी, उत्तम निचऱ्याची - केळी व पपई

मध्यम - आंबा, संत्रा, मोसंबी, चिकू

हलकी - पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, द्राक्षे, पपई, सीताफळ, बोर, आवळा, कवठ, करवंद, चिंच, जांभूळ, फालसा

पूर्वमशागत : प्रथम झाडेझुडपे तोडून जमीन स्वच्छ करावी. नंतर जमीन उभी-आडवी दोन वेळा खोल चांगली कुळवणी करावी. त्यानंतर फळी फिरवून समपातळीत आणावी.

सजीव कुंपण : लागवड केल्यानंतर फळझाडांची नवीन वाढ जनावरे खातात. तसेच रोप व कलमे तुडवतात. नवीन लावलेल्या झाडांचे भटक्‍या गुरांपासून संरक्षण करण्यासाठी निवडलेल्या जागेभोवती चिलार, शिकेकाई, करवंद यांसारख्या काटेरी झुडपांचे कुंपण करावे.

बागेचे उष्ण वारे, थंडीपासून व वादळापासून संरक्षण करण्यासाठी निलगिरी, शेवरीसारख्या उंच सरळ वाढणाऱ्या झाडांची बागेच्या पश्‍चिम व दक्षिण बाजूने २ ते ३ फुटांवर लागवड करावी. काही वेळा वाऱ्याच्या अडथळ्यासाठी लावलेली झाडे बागेतील मुख्य फळझाडांबरोबर पाणी आणि अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा करतात.

हे टाळण्यासाठी अडथळ्यांच्या झाडांपासून १० फूट अंतरावर ३ फूट खोल व २ फूट रुंद खड्डा खणून त्यामध्ये येणारी या झाडांची सर्व मुळे छाटून टाकावीत. अशा प्रकारे मुळ्या छाटण्याचे काम प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी करावे.

फळपिकांच्या जातीची निवड

व्यापारी तत्त्वावर फळ लागवड करताना उत्पादन क्षमता, प्रत, बाजारातील मूल्य आणि मागणीचा विचार करावा. विविध विभागांसाठी वेगवेगळ्या जातीची शिफारस केलेली असते. विभागनिहाय त्या जातींची निवड करावी. ती कीड व रोगास प्रतिकारक्षम जात असावी.

फळपिकांच्या सुधारित जाती

आंबा : हापूस, केसर, रत्ना, दशहरी, पायरी, नागीण, नीलम, तोतापुरी, आम्रपाली

मोसंबी : न्युसेलर, काटोल गोल्ड, साथगुडी

कागदी लिंबू : फुले सरबती, साई सरबती, प्रमालिनी, विक्रम, पीडीकेव्ही लाइम

संत्रा : नागपूर संत्रा, नागपूर सीडलेस

पेरू : सरदार (एल-४९), अलाहाबाद सफेदा, ललित, श्‍वेता

चिकू : कालीपत्ती, क्रिकेट बॉल

सीताफळ : बालानगर, धारूर ७, सुपर गोल्डन, स्थानिक जाती

बोर : कडाका, उमराण, छुहारा, सोनुर - ६

चिंच : प्रतिष्ठान, नं. २६५, शिवाई, अकोला स्मृती

आवळा : बनारसी, चकय्या, कांचन, कृष्णा, एन.ए.-७

अंजीर : पूना फिग, दिनकर

जांभूळ : कोकण बहाडोली, स्थानिक

कलमांची निवड करताना :

-बागेकरिता उत्कृष्ट आणि गुणवत्ता माहीत असलेली दर्जेदार आणि खात्रीशीर कलमे/रोपे आणावी.

-रोपे खरेदी करताना शक्यतो कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, फळ संशोधन केंद्र किंवा शासकीय रोपवाटिकेमधून रोपे आणावीत. ते शक्य नसल्यास आपल्या माहितीतील शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतून कलमे/रोपे घ्यावीत.

-वाढीला जोमदार, निरोगी आणि आपण निवडलेल्या जातीचीच असल्याची खात्री करून घ्यावी.

-कलमे/रोपे एक वर्ष वयाची, मध्यम वाढीची आणि ६० ते ७५ सें.मी. उंच असावीत.

-कलम केलेल्या रोपांमध्ये खुंट व कलमकाडीची जाडी सारखी असावी व जोड एकजीव झालेला असावा. फळझाडांचे कलम किंवा भरलेले डोळे जमिनीपासून २० सें.मी. पेक्षा उंच नसावेत.

-कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत, यापेक्षा ती योग्य त्या जातीच्या मातृवृक्षापासून केलेली आहेत की नाहीत याकडे अधिक लक्ष द्यावे.

-लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या रोप संख्येपेक्षा १५ टक्के जास्त रोपे खरेदी करावीत. अशी रोपे नांगे भरणे किंवा रोपे मर झालेल्या ठिकाणी परत लावता येतात.

New Orchard Cultivation : नवीन फळबाग लागवड करताना घ्यावयाची काळजी
Orchard Cultivation : मराठवाड्यात ‘रोहयो’ मधून ५ हजार ७९९ हेक्टरवर फळबाग लागवड

लागवडीची योग्य वेळ

- पाऊस सुरू झाल्यावर पावसाच्या सुरुवातीस जून महिना अगर जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. या झाडांची वाढ जोमाने होते.

- पावसाच्या सुरुवातीस लागवड केलेली झाडे चांगली समाधानकारक वाढतात. काही कालावधीकरिता पाण्याचा ताणही सहन करू शकतात.

- अतिपावसात अगर पावसाच्या शेवटी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फळझाड लागवड करू नये.

कलमांची लागवड कशा प्रकारे कराल?

कलमाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंवर उभा काप द्यावा व मुळाभोवती असलेला मातीचा गोळा न फुटता पॉलिथिन बॅग काढावी. मोकळा झालेला गोळा दोन्ही हातात धरून खड्ड्याच्या मधोमध ठेवून हलकेच दाबावा. मोकळ्या हाताने माती भरून गोळ्याभोवती माती टाकावी.

अगोदर हाताने व नंतर पायांनी दाबावी. हे करताना मातीच्या गोळ्यावर पाय पडून फुटणार नाही याची काळजी घ्यावी. आवश्यकता वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे. आधारासाठी पश्‍चिम बाजूस ६ इंच अंतरावर ४ ते ५ फूट बांबूची काठी रोवून त्यात कलम बांधावी. रोपे किंवा कलमे लावल्यानंतर त्याच दिवशी कलमांना पुरेसे पाणी द्यावे.

सघन लागवड पद्धत

१) सध्या ही पद्धत खास करून आंबा व पेरू लागवडीसाठी वापरली जात आहे. सामान्यतः पारंपरिक पद्धतीमध्ये आंबा कलमांची १० मी. × १० मी. अंतरावर, तर पेरू ६ × ६ मी. अंतरावर लावतात. सघन लागवड करताना हे अंतर पेरू पिकामध्ये ६ मी. × ३ मी. अंतर तर आंब्यामध्ये ५ × ५ मी. किंवा ६ × ५ मी अंतर ठेवून लागवड करतात. त्यामुळे एकरी झाडांची संख्या वाढते.

२) मात्र या पद्धतीमध्ये झाडांची छाटणी व वळण देणे ही दोन कामे शास्त्रीय पद्धतीने वेळेवर करण्याची आवश्यकता असते. ते योग्य प्रकारे केले गेले तरच झाडाची फळधारणा लवकर आणि भरपूर होते. नाहीतर याच्यावर परिणाम होतो.

३) सघन लागवड ही चौरस पद्धतीने करण्याऐवजी आयताकृती पद्धतीने (दोन ओळींतील अंतर जास्त व दोन झाडांतील अंतर कमी ठेवून) केल्यास आंतरमशागतीची कामे सहज व सोपी होतात.

४) लागवड दक्षिण उत्तर दिशेने करावी. त्यामुळे दिवसभर कलमांना उन्हाचा प्रकाश संश्‍लेषणासाठी चांगला फायदा होतो.

५) झाडे लहान असल्यामुळे फळांची विरळणी, फवारणी, छाटणी, आंतरमशागत, खते देणे, हाताने फळ काढणे, फळांची वाहतूक ही कामे सोपी होतात व खर्च कमी होतो.

६) पाणी व खतांचा पुरेपूर वापर केला जातो.

पाण्याच्या उपलब्धतेनुसारच करा नियोजन

- बागायती फळझाडांना नियमित पाणी देण्याची गरज असते. अशा बागायती फळझाडांची लागवड करण्यापूर्वी आपल्याकडील पाण्याची उपलब्धता जरूर तपासावी. त्यानुसार आपले क्षेत्र ठरवावे.

- कोरडवाहू फळपिकांना लागवडीच्या सुरुवातीस पहिली तीन ते चार वर्षे चांगल्या व समाधानकारक वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते.

- नारळ, सुपारी, केळी, पपई, चिकू, मसाला पिके यांना अन्य फळझाडांपेक्षा जास्त पाणी लागते. म्हणून पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळझाडांची निवड करावी.

- आपल्याकडे १२ महिने पाण्याची सोय असेल तर ज्या फळझाडांना बाराही महिने पाणी लागते अशा फळझाडांची निवड करावी. आपल्याला पाणी आठ महिने पुरत असेल तर पेरू सारखी फळझाडे लावावीत. आपले पाणी फक्त सहा महिने पुरत असेल तर सीताफळ, रामफळ, आवळा, बोर यांसारखी कोरडवाहू फळझाडांची लागवड करावी.

संपर्क - डॉ. एम. बी. पाटील (विभागप्रमुख), ७५८८५९८२४२, प्रवीण मांजरे (आचार्य पदवी विद्यार्थी), ८८८८३४८०५०, उद्यानविद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com