Crop Nursery : गुणवत्तापूर्ण रोपांसाठी ‘प्रतिक हायटेक नर्सरी’

Supply of Plants : प्रतीक हायटेक नर्सरीच्या माध्यमातून श्रीकांत मोरे यांची विविध भागांतील शेतकऱ्यांशी नाळ जोडली आहे. त्यांच्या रोपवाटिकेने पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठबळावर १२ वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विविध रोपांचा पुरवठा केला जातो.
Crop Nursery
Crop NurseryAgrowon

Agriculture Pratik Hi-Tech Nursery : घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची.आई-वडिलांनी अपार कष्ट करून मुलांना शिक्षण दिलं, वाढवलं. अगदी तुटपुंज्या पैशात आठवड्यातील किराणा सामानाचे नियोजन करणे म्हणजे तारेवरची कसरत. बिकट परिस्थितीत आई शालिनी आणि वडील ज्ञानेश्वर यांनी परिस्थितीशी केलेल्या संघर्षामुळेच नारायणगाव (जि.पुणे) येथील श्रीकांत मोरे यांनी रोपवाटिका व्यवसायातून विकासाची दिशा पकडली आहे.

घरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे श्रीकांत मोरे यांना उच्च शिक्षण घेता आले नाही. पहिला प्रश्न जगण्याचा होता, नाइलाजास्तव उच्च शिक्षणाऐवजी घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांना एका कृषी क्षेत्रातील कंपनीमध्ये नोकरी पत्करावी लागली. त्यातूनच शेतीशी निगडित असलेला रोपवाटिका व्यवसायाचा जन्म झाला.

पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगाव (ता. जुन्नर) येथे मुक्ताई ढाब्यामागे श्रीकांत ज्ञानेश्वर मोरे यांची प्रतिक हायटेक नर्सरी आहे. त्यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील आसखेड बुद्रूक. सामान्य शेतकरी कुटुंबात श्रीकांत यांचा जन्म झाला. आई, वडील, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार. त्यांचे शिक्षण बीएस्सी (कृषी) झाले आहे.

श्रीकांत मोरे यांनी भाडेतत्त्वावर अवघ्या दोन गुंठा जागेत सुरू केलेला रोपवाटिका व्यवसाय आज वेगळ्या उंचीवर पोचला आहे. आज ही रोपवाटिका दहा एकर क्षेत्रावर विस्तारली आहे. रोपवाटिकेचे उत्तम नियोजन, रोपांची गुणवत्ता, दर्जेदार व उच्च प्रतीची रोपे, रोपांचे योग्य व्यवस्थापन, व्यवसायातील प्रामाणिकपणा, शेतकऱ्यांसोबत जपलेली विश्वासहर्ता, वक्तशीरपणा या गुणांच्या जोरावर मोरे यांनी रोपवाटिका व्यवसाय महाराष्ट्रभर पोहोचविला. रोपवाटिका व्यवसायात त्यांच्या पत्नी कोमल यांचाही मोलाचा वाटा आहे.

Crop Nursery
Nursery Business : रोपवाटिकांचे कामकाज न सुधारल्यास अधिकार काढू

राज्यभर रोपांचा पुरवठा

कृषी कंपनीमध्ये उत्पादन विक्रीचे काम करत असताना विविध भागातील शेतकऱ्यांशी त्यांचा अनेकदा संबंध येत होता. शेतकऱ्यांशी चर्चा करताना उत्कृष्ट दर्जाची रोपे मिळण्याची समस्या त्यांना प्रकर्षाने जाणवली. या समस्येचा त्यांनी गांभीर्याने विचार केला. शेतकऱ्यांची गरज ओळखून चांगल्या प्रतीची रोपे मिळावीत, या उद्देशाने त्यांनी रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू केला

प्रतीक हायटेक नर्सरीच्या माध्यमातून मोरे यांची विविध भागांतील शेतकऱ्यांशी नाळ जोडली आहे. त्यांच्या रोपवाटिकेने पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठबळावर बारा वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. भाजीपाला, फुलवर्गीय रोपे, फळझाडांच्या रोपांची गुणवत्ता जपत शेतकऱ्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यात मोरे यांनी यश मिळविले.

संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भाजीपाला, फुले, फळ झाडांच्या रोपांचा पुरवठा केला जातो. योग्य प्रकारे काळजी घेऊन गुणवत्तापूर्ण, दर्जेदार रोपांची निर्मिती केली जाते. रोपांच्या गुणवत्तेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे. रोप निर्मिती ते शेतकऱ्यांना देईपर्यंत रोपांच्या ट्रे वर स्टिकर लावून त्यात प्रत्येक गोष्टींची नोंद असते. यामुळे रोपे किती दिवसांची आहेत, याची पारदर्शकता राखली जाते.

रोपवाटिकेचा विस्तार

श्रीकांत मोरे यांनी आईचे दागिने गहाण ठेवून अवघे २८ हजार रुपये जमविले आणि त्यातूनच हा छोट्या स्वरूपाचा व्यवसाय सुरू झाला. अवघ्या दोन गुंठा जागेत शेडनेटमध्ये १५ ऑगस्ट २०१० रोजी प्रायोगिक तत्त्वावर ही छोटी रोपवाटिका सुरू केली. व्यवसाय सुरू झाला खरा, पण पहिल्याच वर्षी तोटा झाला.

तब्बल पाच लाख रुपयांचे कर्ज वाढले. भांडवल अत्यल्प असल्याने रोपवाटिकेत विविध सुविधा उपलब्ध करणे शक्य नव्हते. त्यावेळी जनरेटरची किंमत ३० हजार रुपये होती पण भांडवल नसल्याने नवीन जनरेटर विकत घेणे शक्य नव्हते, त्यामुळे विजेची समस्या सतत जाणवत होती.

Crop Nursery
Mulberry Nursery Planning : रेशीम उद्योगासाठी तुती रोपवाटिकेचे नियोजन

पैसे नसल्याने तीन लाख रुपयांची रोपे पाण्याअभावी जळून गेली होती. सुरुवातीला नवीन वाढलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांनी वडिलांच्या बँकेतील ठेवीवर कर्ज काढून नवीन कर्ज फेडले आणि हळूहळू वडिलांच्या पाच लाख रुपयांच्या कर्जाची व्याजासह परतफेड केली.

लहानशा रोपवाटिकेतून यश मिळत गेल्यानंतर हळूहळू या व्यवसायाची व्याप्ती वाढत गेली. मोरे यांनी कष्ट आणि प्रामाणिकपणा जपत अत्यंत कमी भांडवलावर हा व्यवसाय उभा केला. आज त्यांच्या दहा एकरावरील रोपवाटिकेत १०० मजूर आणि १५ कार्यालयीन कर्मचारी आहेत. सध्या पाच हजार शेतकरी रोपवाटिकेशी जोडलेले आहेत.

महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील शेतकरी त्यांच्याकडून विविध रोपांची खरेदी करतात. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, वेळ वाया जाऊ नये, शेतकऱ्यांचे उत्पादन घटू नये, याकडे मोरे यांचे विशेष लक्ष असते.

सामाजिक बांधिलकीची जोड

रोपवाटिका व्यवसायात मोरे यांनी अनेक छोटे मोठे बदल केले. सुरवातीला दोन गुंठ्यात असलेली रोपवाटिका आज दहा एकर क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. रोपवाटिकेच्या माध्यमांतून सामाजिक बांधिलकी जपत गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोरे शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदत करतात. रोपवाटिकेतील कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी सातत्याने मदत केली जाते. कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य सुविधा पुरविल्या जातात.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

नारायणगाव परिसरात पूर्वी शेतकऱ्यांना योग्य गुणवत्ता आणि रोगमुक्त रोपे फारशा प्रमाणात मिळत नव्हती. बदलत्या वातावरणानुसार पिकात काय बदल करायला हवेत याची शेतकऱ्यांना फारशी माहिती नव्हती. हे लक्षात घेऊन मोरे यांनी हंगामानुसार योग्य जातीची गुणवत्तापूर्ण रोपे उपलब्ध करून दिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या प्रतीची आणि रोगमुक्त रोपे देण्याचा विशेष प्रयत्न केला.

यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात चांगली वाढ झाली. व्यवसायातील प्रामाणिकपणा, योग्य मार्गदर्शन आणि ठरलेल्या वेळेत रोपांचा पुरवठा यामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावरील विश्वास अधिकच दृढ झाला. कोणत्या हंगामात कोणते पीक घेतले पाहिजे, कोणती जात लावावी याबाबत शेतकरी मोरे यांचा सल्ला घेतात.

झेंडूसारख्या पिकासह इतर अन्य पिकांबाबत मोरे यांच्याकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले जाते. कलकत्ता झेंडूमध्ये प्रतीक हायटेक नर्सरीने अवघ्या महाराष्ट्रभरात वेगळा ठसा उमटवला आहे. कलकत्ता झेंडू जातीच्या रोपांसाठी प्रतीक नर्सरीचे नाव प्राधान्याने घेतले जाते. कोलकाता झेंडू पिकातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळत आहे.

भाजीपाला आणि इतर सर्व रोपे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, झेंडू, मिरची, कलिंगड, ऊस, पपई यांसह इतर रोपे देखील या रोपवाटिकेत तयार करून मिळतात. रोपे घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी बुकिंग करावे लागते. नारायणगाव हे टोमॅटोचे आगार मानले जाते. येथील टोमॅटो मार्केट देखील मोठे आहे.अशा ठिकाणी शेतकऱ्यांना टोमॅटोची चांगल्या गुणवत्तेची रोपे मोरे यांच्या रोपवाटिकेतून मिळतात.

प्रतीक नर्सरी ८९७५७९७९६९

श्रीकांत मोरे ७४९८४७३५३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com