
डॉ अजित रानडे
Poultry Industry Challenges: सद्यस्थितीमध्ये भारतात कुक्कुटपालनाचे तीन स्तर आढळून येतात. पहिला म्हणजे बॅकयार्ड किंवा परसातले पक्षी पालन. या मध्ये २० ते ५० पक्षी शेतकऱ्यांमार्फत पाळले जातात. त्यानंतरचा स्तर म्हणजे ग्रामीण कुक्कुटपालन. यामध्ये साधारण ५०० पक्षी पाळले जातात. यात वेगवेगळ्या संस्थांमार्फत कुक्कुटपालनासाठी खास तयार केले गेलेले पक्षी पाळले जातात. हे पक्षी अंडी आणि मांस ह्या दोन्हींच्या उत्पादनासाठी वापरले जाऊ शकतात. या परसातल्या आणि ग्रामीण कुक्कुटपालनाद्वारे तयार होणारी अंडी व मांस यांचा बाजारपेठेमध्ये ३० टक्के इतका वाटा आहे.
तिसरा स्तर म्हणजे व्यावसायिक कुक्कुटपालन. यामध्ये मोठ्या प्रमाणात, म्हणजे लाखो पक्षी एकेका फार्मवर पाळले जातात. हे आधुनिक पद्धतीने केले जाणारे कुक्कुटपालन असून, त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाचा वाटा हा बाजारपेठेत ७० टक्क्यांच्या आसपास आहे. या तीनही प्रकारच्या कुक्कुटपालनाची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत आणि हे तीनही स्तर व्यवसायाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहेत. देशात मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन व्यवसायाची प्रगती झाली असली तरी ती टिकवून ठेवणे आणि त्यात वाढ करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय पोषण संस्थेने शिफारस केल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने वर्षाला किमान १८० अंडी आणि १० ते ११ किलो मांस सेवन करणे आवश्यक आहे. देशाची लोकसंख्या सतत वाढतच राहणार आहे, त्यामुळे या व्यवसायात आणि अंडी व मांस यांच्या उत्पादनात वाढ होणे अपरिहार्य आहे. या मार्गात काही आव्हाने आणि अडचणी नक्कीच येतील, परंतु त्यावर मात करून हा व्यवसाय वाढत राहिला पाहिजे.
कुक्कुटपालन उद्योगासमोरील आव्हाने
पक्ष्यांना होणारे विविध रोग व त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान हे कुक्कुटपालन उद्योगासमोरील पहिले आव्हान आहे. माणसाला होणाऱ्या रोगांमधील ६० ते ७० टक्के रोग हे प्राणी किंवा पक्षी यांच्यापासून संक्रमित होण्याची शक्यता असते. त्यामुळे पक्ष्यांना रोग न होऊ देणे आणि त्यासाठी जैविक सुरक्षा व इतर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या कुक्कुटपालनामुळे एकाच ठिकाणी भरपूर संख्येमध्ये पक्षी पाळले जातात.
त्यामुळे या फार्मवर पक्ष्यांपासून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ किंवा मलमूत्र वगैरे मोठ्या प्रमाणावर तयार होतात. त्यांची योग्य विल्हेवाट लावणे हे एक मोठे आव्हान आहे. या टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ‘रेंडरिंग प्लांट’ किंवा ‘बायोगॅस प्लांट’ वगैरे गोष्टींची उपलब्धता असणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा, प्रदूषण करणारा व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे बघितले जाईल.
याचबरोबर फार्मवर पक्षी कशा प्रकारे पाळले जातात, त्यांचे व्यवस्थापन कल्याणकारी पद्धतीने होत आहे ना, पक्ष्यांना कसलाही त्रास किंवा असुविधाजनक वातावरण ठेवले जात नाही ना इत्यादी गोष्टींकडे सुद्धा ग्राहकांचे लक्ष असते. याच अनुषंगाने विक्री व्यवस्थेचे विशेषतः ब्रॉयलर पक्ष्यांच्या बाबतीत योग्य काळजी घेणे, दुकाने व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे, पक्ष्यांपासून निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे खूप गरजेचे आहे.
भारतातील जवळ जवळ ७१ टक्के जनता मांसाहारी असली, तरी सुद्धा बऱ्याच प्रमाणात मांसाबद्दल जनतेच्या मनात गैरसमज आणि भीती आहे. सामान्य जनतेच्या मनातले हे सगळे गैरसमज दूर करून योग्य आणि शास्त्रीय वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचवणे, हे फार मोठे आव्हान या व्यवसायापुढे उभे आहे. विशेषतः सध्याच्या अति जलद बातम्यांची देवाण-घेवाण होण्याच्या जगात गैरसमज लवकर पसरतात व ते वेळच्या वेळी दूर होणे गरजेचे आहे.
वर उल्लेख केलेल्या गतीने जर कुक्कुटपालन वाढणे अपेक्षित असेल तर व्यवसायाच्या वाढीसाठी लागणारी सर्व साधनसामग्रीसुद्धा त्याच गतीने वाढणे गरजेचे आहे. विशेषतः पक्ष्यांसाठी लागणारे खाद्य तयार करण्यासाठी आवश्यक कृषी उत्पादने पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजेत. कृषी उत्पादनांच्या उपलब्धतेतील घट आणि परिणामी किमतीत होणारी वाढ यामुळे पक्ष्यांचे खाद्य महागडे ठरते. उत्तम प्रतीची उत्पादन क्षमता असलेले पक्षी व त्यांचे व्यवस्थापन, बाजारपेठेची क्षमता लक्षात घेऊन अंड्याचे, पक्ष्यांचे उत्पादन, त्यांची योग्य अशी सुधारित विक्री व्यवस्था, जैविक सुरक्षेचे काटेकोर पालन ही चतु:सूत्री अंगीकारल्यास कुक्कुटपालन व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल.
डॉ अजित रानडे ९८३३६०७०७४
(लेखक कुक्कुटपालन तज्ज्ञ आहेत.)
ranadeas@yahoo.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.