Post Harvest Hygiene : काढणीनंतर फळे, भाज्यांच्या स्वच्छतेचे महत्त्व

Vegetable Washing Techniques : सध्या काढणी केल्यानंतर फळे किंवा भाज्या शेतातच उपलब्ध पाण्यामध्ये धुतल्या जातात. पण त्यानंतर प्रतवारीमध्ये किंवा बाजारात पोहोचेपर्यंत व पोचल्यानंतरही अनेकांकडून हाताळल्या जातात. त्यातून विविध हानिकारक सूक्ष्मजीवांचा प्रसार होऊ शकतो.
Post Harvest Hygiene Techniques
Post Harvest Hygiene Techniques Agrowon
Published on
Updated on

डॉ. विक्रम कड, डॉ. गणेश शेळके, डॉ. सुदामा काकडे

आपल्या दैनंदिन आहारामध्ये फळे आणि भाज्या यांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. कारण त्यातून शरीराला आवश्यक प्रथिने, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. हे सर्व घटक पोषकतेसोबतच आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. मात्र त्याचा वापर करण्यापूर्वी त्यातील पौष्टिक घटक हे संपूर्ण गुणवत्तेनिशी आणि सुरक्षितपणे पोचणे आवश्यक आहे. सुरक्षितपणाच्या कोणत्याही प्रक्रियेतील सर्वांत सुरुवातीच्या क्रियांमध्ये शेतीमालाची स्वच्छता करणे आवश्यक आहे.

शेतातील माती, धूळ, कीटकनाशके, हानिकारक सूक्ष्मजंतू (उदा. इ. कोलाय, सॅलमोन्नेला इ.), रासायनिक अंश आणि अन्य प्रदूषणकारक घटक आपल्या ताटापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी योग्य प्रकारे स्वच्छतेची आवश्यकता असते. सध्या काढणी केल्यानंतर फळे किंवा भाज्या शेतातच उपलब्ध पाण्यामध्ये धुतल्या जातात. पण त्यानंतर प्रतवारीमध्ये किंवा बाजारात पोहोचेपर्यंत व पोचल्यानंतरही अनेकांकडून हाताळल्या जातात. त्यातून विविध हानिकारक सूक्ष्मजीवांचा प्रसार होऊ शकतो.

म्हणजेच शेतात भाज्या धुणे आणि पुन्हा त्या घरात वापरण्यापूर्वी खळखळत्या भरपूर पाण्यामध्ये धुणे दोन्ही आरोग्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. शेतामध्ये भाज्या धुण्यासाठी पारंपरिक पद्धतीसोबतच काही यंत्रे, अवजारे यांचा वापर करणे शक्य आहे. त्याच प्रमाणे आपल्या भागातील विविध हानिकारक सूक्ष्मजीवांच्या प्रादुर्भावाच्या शक्यता लक्षात घेऊन स्वच्छतेसाठी केवळ पाण्यावरच अवलंबून न राहता काही अन्नदर्जाच्या (फूडग्रेड) रसायनांचा वापर करणे अत्यावश्यक ठरते.

स्वच्छतेची गरज का?

फळे व भाज्यांच्या अधिक पीक उत्पादकतेसाठी होणारा रासायनिक घटकांचा (उदा. कीडनाशके, खते, संजिवके इ.) वापर हा सर्वांच्याच काळजीचा विषय आहे. त्याला जोड मिळते, ती फळे आणि भाज्यांची अयोग्य हाताळणीतून पसरणाऱ्या सूक्ष्मजीव आणि विषारी प्रदूषकांची.

हे सारे घटक आपल्या शरीरात जाऊन साठवले (ॲक्युमलेट) जातात. त्यातून एका टप्प्यानंतर गंभीर आजार निर्माण करतात. दूषित पाण्यामुळे आणि अस्वच्छ हाताळणीमुळे अनेक आजार पसरतात. (उदा. पोटदुखी, अतिसार, अन्नामुळे होणाऱ्या विषबाधा इ.) त्यामुळे काढणी झाल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असते.

स्वच्छतेचे फायदे

 गुणवत्ता सुधारते : फळे आणि भाज्यांवरील अशुद्धता, माती, धूळ आणि रासायनिक अवशेष काढून टाकल्याने त्यांची गुणवत्ता वाढते. ते अधिक ताजे आणि आकर्षक दिसतात.

 सुरक्षितता वाढते : हानिकारक सूक्ष्मजंतू (जिवाणू, विषाणू) आणि रासायनिक अवशेष दूर केल्याने फळे आणि भाज्या खाण्यासाठी सुरक्षित होतात. ज्या कच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या फळे, पालेभाज्या आणि फळभाज्या यांची स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे.

 अन्न विषबाधेपासून संरक्षण : दूषित पदार्थ आहारात आल्यामुळे होणारे आजार टाळता येतात.

 आयुष्यमान वाढते : योग्य प्रकारे धुतल्याने फळे आणि भाज्या अधिक काळ टिकतात, ज्यामुळे त्यांची

नासाडी कमी होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो.

 आरोग्य सुधारते : दूषित फळे आणि भाज्या खाल्ल्याने होणारे आजार, जसे की पोटदुखी, अतिसार, उलट्या आणि इतर प्रादुर्भाव टाळता येतात. प्रदूषित घटक शरीरात साठून निर्माण होणारे व दीर्घकाळ त्रास देणारे आजार (उदा. कर्करोग वगैरे) टाळता येतात.

Post Harvest Hygiene Techniques
Post Harvest Management : पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट प्रकल्पांसाठी सहकार्य करावे

 आहार स्वच्छ व निरोगी बनवणे : शुद्ध व स्वच्छ अन्न खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

 उत्पादनाचे मूल्य वाढते : स्वच्छ आणि उच्च प्रतीच्या उत्पादनांना बाजारात अधिक मागणी व पर्यायाने मूल्य मिळण्यास मदत होते.

 चांगली चव आणि ताजेपणा टिकतो ः स्वच्छ केलेली फळे व भाज्या अधिक काळ ताज्या राहतात. त्यातील पोषक घटक व चव अधिक काळ टिकून राहतात. त्या स्वादिष्ट लागतात.

फळे व भाजीपाला दूषित होण्याची कारणे

फळे व भाजीपाला दूषित होण्यामागे मुख्यतः रासायनिक, जैविक आणि पर्यावरणीय घटकांचा समावेश असतो.

 कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा अतिरेकी वापर : शेतकरी अनेक वेळा शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात कीडनाशकांचा किंवा रासायनिक खतांचा वापर करतात. यातील अनेक रसायने थेट फळे व भाज्यांवर राहिल्यास ते मानवी आरोग्यास अपायकारक ठरतात.

 प्रदूषित पाणी व माती : शेतीसाठी वापरले जाणारे प्रदूषित पाणी आणि मातीमुळे भाजीपाला व फळांमध्ये विषारी घटक प्रवेश करतात.

 अयोग्य साठवणूक व वाहतूक : फळे व भाजीपाला साठवण आणि वाहतुकीमध्ये अयोग्य तापमान, अयोग्य हाताळणी यामुळे बुरशी व जिवाणूंचा संसर्ग होतो. अखाद्य पदार्थांच्या संपर्कामुळेही हानिकारक पदार्थ तयार होऊ शकतात. उदा. प्लॅस्टिक पिशव्यांमधील साठवणूक इ.

 जैविक घटकांचे प्रदूषण (बॅक्टेरिया व विषाणू) : दूषित पाणी, स्वच्छतेचा अभाव व मोकळ्या वातावरणात विक्रीमुळे फळे आणि भाजीपाला आरोग्यासाठी हानिकारक जिवाणू (इ. कोलाय, सॅलमोन्नेला) आणि विषाणूंचा प्रादुर्भाव होतो. असा संसर्ग पाळीव जनावरे आणि पक्ष्यांच्या संपर्कातूनही होऊ शकतो.

 कृत्रिम रंग आणि घातक पदार्थांचा वापर : काही व्यापारी माल चमकदार व आकर्षक दिसण्यासाठी कृत्रिम रंग लावतात. कार्बाइडसारख्या घातक रसायनांचा वापर फळे लवकर पिकविण्यासाठी केला जातो.

 हवामानातील बदल आणि औद्योगिक प्रदूषण : हवेतील विषारी वायू (सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड) पिकांवर परिणाम करतात. अति उष्णता आणि अपुऱ्या पावसामुळे पिके कोमेजून त्यांची गुणवत्ता घसरते.

 विक्रीदरम्यान होणाऱ्या अशुद्धी : बाजारात उघड्यावर, गटार व सांडपाण्यानजीक अनेकजण मालाची विक्री करत असतात. अशा ठिकाणी धूळ, कीटक व इतर अशुद्ध पदार्थ यामुळे पदार्थ दूषित होतात. विक्रेत्यासोबतच येणाऱ्या ग्राहकांकडून भाज्या सतत हाताळल्या गेल्यास जिवाणूंचा प्रसाराची शक्यता वाढते.

 अस्वच्छ पाण्याचा वापर ः शेतामध्ये भाज्या धुण्यासाठी किंवा बाजारात शेतीमालाचा ताजेपणा टिकविण्यासाठी फवारण्या जाणाऱ्या अस्वच्छ पाण्यामुळे आरोग्यासाठी हानिकारक घटकाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

Post Harvest Hygiene Techniques
Post Harvest Technology : शेतकऱ्यांसाठी ‘एनआयपीएचटी’विविध जिल्ह्यांत शाखा सुरू करणार

शेतीमाल धुण्याच्या विविध पद्धती

 सामान्य धुणे : फळे आणि भाज्यांना स्वच्छ, थंड पाण्यात चांगले धुवावे. यासाठी नळाचे स्वच्छ व चांगले पाणी वापरावे. यामुळे शेतीमालावरील माती आणि धूळ धुतली जाईल.

 धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणे : काही विशिष्ट प्रकारची फळे आणि भाज्या (उदा. सफरचंद, टोमॅटो, ब्रोकोली इ.) गरम पाण्यात २ ते ३ मिनिटे बुडवून धुऊन घ्यावीत. त्यामुळे त्यांचा ताजेपणा टिकविण्यासाठी मेणांचा दिलेला थर, त्यावर असलेले सूक्ष्मजीव आणि रासायनिक अवशेष नष्ट होण्यास मदत होते.

 विशेष धुणे : काही वेळा भाजीपाला आणि फळे साध्या पाण्याने धुतल्यास पुरेसे ठरत नाही. काही फळे आणि भाज्यांसाठी (उदा. पालेभाज्या, ब्रोकोली) मीठ किंवा व्हिनेगरच्या पाण्याचा वापर करतात. यामुळे त्यावरील कीटकनाशके आणि सूक्ष्मजंतू कमी होतात. भाजीपाला आणि फळे मिठाच्या पाण्यात १०-१५ मिनिटे किंवा व्हिनेगरयुक्त पाण्यात ५-१० मिनिटे भिजवून ठेवल्या जातात आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल्या जातात.

 ब्रश किंवा हातांनी घासून धुणे : काही फळांच्या आणि भाज्यांच्या सालीवर चिकट माती किंवा रसायनांचे अवशेष असतात. त्यासाठी ब्रश किंवा हातांनी घासून स्वच्छ धुणे गरजेचेअसते.

 रासायनिक उपचार : काही वेळा फळे आणि भाज्यांवरील हानिकारक घटक काढण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने व देखरेखीखालीच विशिष्ट रसायनांचा वापर केला जातो. कारण योग्य दर्जाची रसायने योग्य मात्रेतच वापरणे गरजेचे असते. यात प्राधान्याने ‘फूड ग्रेड’ स्वच्छतेचे साहित्य किंवा पदार्थ (cleaning agents) वापरले जातात. उदा. फळे आणि भाज्या निर्जंतुक करण्यासाठी क्लोरीन (Chlorine) वापरले जाते. सोडिअम हायपोक्लोराइडच्या (Sodium hypochlorite, NaClO) स्वरूपात क्लोरीनचा वापर ५० ते २०० पी. पी. एम. या प्रमाणात करावा लागतो. मात्र, क्लोरीनचा जास्त वापर हानिकारक ठरू शकतो. क्लोरीनयुक्त द्रावणाचा पीएच (pH) ६.० ते ७.५ च्या दरम्यान ठेवलेला असावा. क्लोरीनच्या द्रावणाचा प्रभाव हा त्याच्या पीएच वर अवलंबून असतो.

 आधुनिक उपकरणे : आजकाल मोठ्या प्रमाणातील फळे आणि भाज्या धुण्यासाठी अनेक आधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. उदा. बबल वॉशर, ड्रम वॉशर, स्प्रे वॉशर, अल्ट्रासॉनिक वॉशर इ. उपकरणामुळे कष्ट आणि वेळेची बचत होते. पुढील भागामध्ये या आधुनिक यंत्रांची, उपकरणांची माहिती घेऊ.

डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com