Bail Pola : झडत्या, तान्हा पोळा अन् शाही मिरवणूक

Vidarbha Bail Pola : विदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण पोळे
Bail Pola
Bail PolaAgrowon

दिनकर गुल्हाने

Pola Festival : भारतीय कृषी संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणजे आजचा बैलपोळा. वर्षभर धन्यासोबत शेतात राबणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण. राज्यात पोळा साजरा करण्याच्या विविध पद्धती, रीती आहेत. विदर्भातील काही गावांमध्ये झडत्या, तान्हा पोळा, शाही मिरवणूक, महिलांच्या नेतृत्वाखालील असे वैशिष्ट्यपूर्ण पोळे साजरे केले जातात. त्यावर टाकलेला दृष्टीक्षेप.

शेतात राब-राब राबताना बैल धन्याची सोबत कधी सोडत नाही. समृद्धीचे गाणे गाताना कधी थकत नाही. म्हणूनच बैलशक्तीच्या पूजेला भारतीय कृषिप्रधान संस्कृतीत वेगळे महत्त्व आहे. बळीराजा आपल्या 'सर्जा राजा' वर मनापासून प्रेम करतो. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतो. अशा या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी या भावनेतून शेतकरी दरवर्षी पोळा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. संपूर्ण श्रावण काळाला सणांची झालर असते. कापूस, सोयाबीनसारखी पिके फुलांपात्यांवर असतात. ज्वारीची कणसे वाऱ्याच्या झुळकीसोबत झुलू लागली की त्यांच्यातला सुगंध सोबत घेऊनच वारा गावभर गिरक्या घेत असतो.

" दिवस सुगीचे सुरू जाहले
ओला चारा, बैल माजले
शेतकरी मन प्रफुल्ल झाले "

अशातच श्रावणाची पिठोरी अमावस्या येते. तोच हा पोळ्याचा दिवस. विदर्भातील विविध गावांत हा सण साजरा करण्याच्या विविध तऱ्हा आहेत. पोळ्याच्या आधीच्या दिवशी दुपारी बैलांना शेतीकामातून सुट्टी मिळते. गावांचे नदीकाठ नितळ पाण्याने खळखळाट करू लागतात. याच पाण्यात डुबकी लावून बैलांची स्वच्छ अंघोळ घालण्यात येते. शेतकरी किंवा सालगडी बैलांसोबत नदीत डुंबण्याचा आनंद लुटतात. संध्याकाळी बैलांची खानमोळ होते. घरचे ताजे लोणी काढून त्यात हळद घालण्यात येते.
संध्याकाळी गोठ्यात प्रत्येक बैलाच्या मानेवर हे लोणी पळस पानाने घासून मालिश करण्यात येते. कुंकू लावून भली मोठी पितळी घंटी वाजवून जोराने ' आज आवतण घ्या..उद्या जेवायला या हो' असे सांगण्यात येते. खांदेमळणीचा हा संस्कार घरोघरी मोठ्या उत्साहात पार पडतो.

Bail Pola
Bail Pola 2023 : पोळा सणाला बैलांची नेमकी काय काळजी घ्याल?

हरसुलच्या पोळ्यातील 'झडत्या'

यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुक्यातील हर्सूल हे छोटे गाव आहे. कौलारू घरे आणि गोठ्यात बैलांच्या जोड्या. या गावचा पोळा प्रसिद्ध आहे तो 'झडत्यांसाठी. हा म्हणजे चारोळीसारखा किंवा शीघ्र काव्यप्रकार असतो. शेतकऱ्यांच्या प्रतिभेला झडत्यांच्या माध्यमातून धुमारे फुटतात. यात असतं अवतीभवतीच्या नेमक्या परिस्थितीवर भाष्य. शेतकरी आपल्या समस्या, दुःख मांडण्याबरोबर सरकारी धोरणांतील त्रुटींचाही समाचार त्यातून घेतात. अलीकडील काळात कपाशीवर बोंडअळीचा प्रभाव जाणवत आहे. अशावेळी बोंडअळी रुपी संकटाला झडत्यांनी झटका दिला नाही तरच नवल.

" पोळा रे पोळा
कास्तकाराचा पोळा
या पोळ्यामंदी
झाले अवघे गोळा
कापसाले मारला हो
बोंडअळीने डोळा
एक नमन कवडा पार्वती

Bail Pola
Bail Pola Festival : बैलपोळ्यासाठी बाजारपेठा फुलल्या, दुष्काळामुळे बळीराजा संकटात

हर हर महादेव sss "

उंच आवाजात, लयबद्ध झडती सादर करताना आजूबाजूचे सवंगडी शेतकरी हर हर महादेव असा घोष करतात. आणि मग पोळ्याच्या तोरणाखाली, बैलांच्या साक्षीने झडत्यांना चांगलीच खुमारी चढते.
व्यवस्थेविरुद्ध शेतकऱ्यांच्या मनात असलेली खदखद व्यक्त होत राहते.

" पैसा रे पैसा सरकारचा पैसा
या महागाईमंदी
कास्तकार जगन रे कैसा
शेतमालाले भाव देऊन
फुलवा शेतकरी कमळाजैसा
एक नमन कवडा पार्वती
हर हर महादेव sss "

बेलोऱ्यातील तान्हा पोळा

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बेलोरा या पैनगंगेच्या काठावरील गावात 'तान्हा पोळा' प्रसिद्ध आहे. पोळ्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलांची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी तीन पिढ्यांची परंपरा असलेला हा बेलोऱ्याचा आगळावेगळा तान्हा पोळा दिमाखात साजरा होतो. अलीकडे यांत्रिकी शेतीच्या झळा बसल्याने सहभागी बैलांची संख्या रोडावली आहे. सकाळी बैलांचे न्हाणे-धुणे होते. त्यानंतर असते ती सजावट. शिंगांना रंग, त्यावर तीन-चार फुटांचे आकर्षक बाशिंग, गळ्यात घुंगरू माळ, पितळी साखळ्या, कपाळावर शिंपल्या-कवड्यांचे सुंदर पान, पायात पोडाळ- पैंजण, कसाट्या- गोंडे आणि पाठीवर नक्षीकाम केलेली सुंदर झुल. असे सजलेले बैल गावातील राम मंदिरावर एकत्र येतात. टाळमृदंगाच्या तालावर दुपारच्या दरम्यान बैल मृदंगाच्या ठेक्यावर ऐटदार चालीने पुढे पुढे चालतात. त्यांना पाहण्यासाठी दुतर्फा मोठी गर्दी उसळते. ही शाही मिरवणूक महादेव मंदिर, सेवालाल मंदिर या मार्गाने बस स्थानकाजवळील मारुती मंदिरात पोचते. परीक्षक मंडळी बैलाचे तरणेबांड रूप, सजावट व ऐटदार चाल पाहत या आगळ्यावेगळ्या पैजेत अव्वल ठरलेल्या बैलांना पुरस्कार देण्यात येतात. आधुनिक काळात या परंपरेला बुल वॉक असे नाव द्यायला काहीच हरकत नाही.

महिलांच्या नेतृत्वातील पोळा

अमरावती जिल्ह्यात तिवसा गावात तान्हा पोळ्यानंतर लगेच महिलांच्या नेतृत्वाखाली तिवसा पोलिस स्टेशन नजीकच्या शहीद स्मारकाजवळ स्वतंत्र पोळा भरविण्यात येतो. यात महिला स्वतः सजविलेल्या बैलजोड्या तोरणाखाली आणतात. बैलांचा साजशृंगार करतात. यात धुरकरी महिला पुढाकार घेतात. सुमारे ७० ते ८० बैलजोड्यांचा सहभाग असतो. पाच वर्षापासून या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी आमदार यशोमती ठाकूर पोळ्याला आवर्जून उपस्थित राहतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला शेतीत राबतात. औत हाकतात. साहजिकच त्यांचा हा आगळावेगळा बैलपोळा लक्षणीय ठरला आहे. महिला स्वतःही सजून-धजून मोठा उत्साह भरतात.

तिवसा येथील शेतकरी महिलांचा बैल पोळा म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर महिला सक्षमीकरणाच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे. स्त्री सन्मानाची मुहूर्तमेढ आहे.
यशोमती ठाकूर, माजी मंत्री

गझल नवाज पांचाळे बनवितात मातीचे बैल

आष्टगाव (ता.मोर्शी, जि. अमरावती) येथील गझल नवाज भीमराव पांचाळे म्हणतात की कुटुंबाच्या उपजीविकेचे साधन म्हणून मी लहानपणी बैल चारायला रानात घेऊन जायचे. शहरात आलो, शिकलो,
मुंबईत नोकरी केली. गझलनं जग दाखवलं, पण 'शहरी ' झालो नाही. गावच्या मातीशी जोडलेलाच राहिलो . पोळा आला की मातीचे बैल बनवणं हा लहानपणीचा आवडता छंद होता. लॉकडाऊन काळात दीर्घकाळ सहकुटुंब गावी राहायला मिळालं. अशातच पोळा आला. मातीचे बैल बनवायची फर्माईश झाली. लहानपणीचा हुनर कामी आला. त्या वेळेसचं गाणं आठवलं, आम्ही सर्वांनी मिळून म्हटलं

पहा सजविले कसे देव
हे पराधान्या-राजा
करावयाची आज तयांची
सगळ्यांनी पूजा "

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com