Raju Shetti
Raju ShettiAgrowon

Raju Shetti : गुऱ्हाळे, खांडसरी उद्योग बंद पाडण्याचा घाट : शेट्टी

Raju Shetti : साखर कारखान्यांची मक्तेदारी टिकविण्यासाठी केंद्र सरकारने गुऱ्हाळे आणि खांडसरी बंद पाडण्याचा घाट घातला आहे. मात्र साखर नियंत्रण आदेशात कोणतीही चुकीची दुरुस्ती आम्ही होऊ देणार नाही.
Published on

Pune News : साखर कारखान्यांची मक्तेदारी टिकविण्यासाठी केंद्र सरकारने गुऱ्हाळे आणि खांडसरी बंद पाडण्याचा घाट घातला आहे. मात्र साखर नियंत्रण आदेशात कोणतीही चुकीची दुरुस्ती आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला. शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथे मंगळवारी (ता. १७) झालेल्या खांडसरी व गूळ पावडर उत्पादक असोसिएशनच्या राज्यस्तरीय बैठकीतही हीच भूमिका मांडण्यात आली.

साखर नियंत्रण आदेशात दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारने २३ सप्टेंबरपर्यंत हरकती मागवल्या आहेत. या प्रस्तावित दुरुस्तीबाबत साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी बुधवारी (ता. १८) श्री. शेट्टी यांच्यासमवेत चर्चा केली. साखर आयुक्तालयात झालेल्या या बैठकीला गूळ व खांडसरी उद्योगाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

Raju Shetti
Raju Shetti: फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कडक कारवाई करा, राजू शेट्टी यांची मागणी; एसपी महेंद्र पंडित यांची घेतली भेट

त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘साखर उद्योग देशात अलीकडे उभा राहिला. मात्र ग्रामीण भागात गूळ उद्योग अनेक शतकांपासून सुरू आहे. साखर लॉबीला साखर सोडून अन्य काहीच उभे राहू द्यायचे नाही. या लॉबीच्या दबावाला बळी पडून गूळ, खांडसरी उद्योग बंद पाडण्याचा प्रयत्न केंद्र करीत आहे. परंतु आम्ही गूळ उद्योगाच्या पाठीशी उभे आहोत.’’

साखर नियंत्रण आदेशातील उपपदार्थांची व्याख्या चुकीच्या पद्धतीने दुरुस्त करण्यास देखील शेट्टी यांनी विरोध दर्शविला. ते म्हणाले, ‘‘साखर लॉबीला आता बगॅस, सीबीजी, प्रेसमड, मळी इतकेच घटक उपपदार्थांच्या व्याख्येत हवे आहेत. या लॉबीला सहवीज, सीबीजी, इथेनॉल, अल्कोहोल, स्पिरिट असे घटक कायदेशीर संरक्षणापासून दूर ठेवायचे आहेत.

Raju Shetti
Raju Shetti : हमीभाव, कर्जमुक्तीसाठी निर्णायक आंदोलन करणार

या उपपदार्थांपासून मिळणारे उत्पन्न ऊस उत्पादकांना मिळू नये, अशी भूमिका साखर उद्योगाची आहे. यावर शेतकऱ्यांचे ऐकून न घेता केंद्राने निर्णय घेऊ नये. साखर आयुक्तांसमोर हरकती मांडल्या असून केंद्राला पाठविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.’’

सुक्रोजचे प्रमाण घटविण्याच्या हालचाली

साखरेच्या व्याख्येत आंतरराष्ट्रीय मानकानुसार ९६.५ टक्के सुक्रोज ग्राह्य धरले आहे. परंतु कायदेशीर दुरुस्ती करीत सुक्रोजचे प्रमाण घटवून ९० टक्के करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे देशातील गूळ व खांडसरी उद्योग आर्थिक संकटात सापडतील. साखर उद्योगाचे निकष आम्हाला लावण्याचा प्रयत्न केल्यास इतर लाभदेखील द्यायला हवेत. कारण सरकारचे कोणतेही लाभ घेता गूळ, खांडसरी प्रकल्प उभारले गेले आहेत, असे ‘यशवंत ग्रुप’चे कार्यकारी संचालक अभिजित नाईक यांनी वार्ताहरांना सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com