Sale of Agriculture Produce : ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे विक्रीचे नियोजन

MCX Online Platform : ‘एमसीएक्स’ प्लॅटफॉर्ममध्ये विविध पद्धतीच्या आधारे शेतीमालाचा बाजारभाव आणि विक्री यांच्या जोखमीचे व्यवस्थापन केले जाते. त्यातील एक पद्धत म्हणजे हेजिंग.
Cotton
Cotton Agrowon
Published on
Updated on

Management of Market Price and Sale Risk of Agricultural Commodities : गोदाम पुरवठा साखळीच्या आधारे पर्यायी बाजारपेठ उभी करताना ‘एमसीएक्स’सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे कापूस मूल्य साखळीबाबत आपण मागील तीन भागांत माहिती घेतली, परंतु या प्लॅटफॉर्मद्वारे शेतमाल विक्री व बाजारभाव यातील जोखीम कमी करण्याच्या अनुषंगाने कसे कामकाज करता येईल यावर ऊहापोह होणे आवश्यक आहे. ‘एमसीएक्स’ प्लॅटफॉर्ममध्ये विविध पद्धतीच्या आधारे शेतीमालाचा बाजारभाव आणि विक्री यांच्या जोखमीचे व्यवस्थापन केले जाते. त्यातील एक पद्धत म्हणजे हेजिंग.

हेजिंग म्हणजे काय?

कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या भौतिक बाजारामध्ये किंवा जागतिक स्तरावर शेतीमालाच्या जाहीर झालेल्या बाजारभावाच्या आधारे भविष्यातील बाजारभावात होणाऱ्या बदलातील जोखीम कमी करणे अथवा त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या प्रक्रियेस हेजिंग म्हणतात.

याप्रक्रियेत दोन टप्प्यांत बाजारभाव जोखीम नियंत्रणात आणली जाते, ज्यामध्ये भौतिक बाजारातील शेतीमालाच्या भावातील चढ किंवा उतारातील बदलामुळे होणारा नफा किंवा तोट्यातील फरक भविष्यातील किमतीनुसार ‘एमसीएक्स’ प्लॅटफॉर्मच्या आधारे भरून काढण्याची संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणता येते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कापूस पिकातील हेजिंग हे जगातील विविध महत्त्वाचे एक्स्चेंज जसे की इंटर कॉन्टिनेन्टल एक्स्चेंज (ICE), झेंगजाऊ कमोडिटी एक्स्चेंज (ZCE), ब्राझीलियन मर्कनटाईल आणि फ्यूचर एक्स्चेंज (BM&F) यावर केले जाते.

खासगी कंपन्या, शेतकरी, उत्पादन करणारे व विकत घेणारे व्यापारी, स्पॉटमार्केटमध्ये व्यवहार करणारे, आयातदार व निर्यातदार, प्रक्रियादार, बाहेरच्या देशातील हेजिंग करणारे हेजर्स हे हेजिंग करून बाजारभावातील जोखीम कमी करू शकतात. याकरिता गुंतवणूक करणारी यंत्रणा जसे की, मध्यस्थ, मिच्यूअल फंड, पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा देणाऱ्या यंत्रणा यांच्यामार्फत हेजिंगचे व्यवस्थापन केले जाते.

Cotton
Sale of Agriculture Produce : ‘एमसीएक्स’ ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे व्यवहार

शेतकऱ्यांना हेजिंगचा फायदा

सर्वसाधारपणे ‘एमसीएक्स’ प्लॅटफॉर्म मार्फत पुढील हंगामातील शेतीमालाच्या किमती चालू हंगामातील लागवडीपूर्वी जाहीर करण्यात येतात. पुढील हंगामातील शेतीमालाच्या किमतीच्या माहितीच्या आधारे शेतकरी चालू हंगामात शेतीमाल लागवडीबाबत निर्णय घेऊ शकतो.

चालू हंगामात लागवड करण्यात आलेल्या शेतीमालाची भविष्यातील किंमत ‘एमसीएक्स’ प्लॅटफॉर्मद्वारे निश्‍चित करून पुढील बाजारभावाच्या चढ-उतारातील जोखीम कमी करणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे हे शेतकऱ्याला सहज शक्य होते.

उदा. कापूस लागवड एप्रिल-मेमध्ये करतेवेळी डिसेंबर-जानेवारीमध्ये कापूस काढणीच्या काळातील बाजारभाव जर लागवड करतेवेळी ठरवून त्यानुसार निश्‍चित केला तर उत्पन्नाची ठरावीक रक्कम हाती येईल, याची हमी मिळते. भविष्यातील बाजारभावाच्या चढ-उतारापासून संरक्षण मिळू शकते.

बाजारभावाच्या शोध विषयक कार्यप्रणालीमुळे या संकल्पनेत सहभागी झालेल्या शेतकरी अथवा इतर लाभार्थ्याला स्पर्धात्मक किंमत मिळू शकते. एमसीएक्स प्लॅटफॉर्ममार्फत सुरू केलेल्या फ्यूचर वायदे बाजारामुळे कमी गुंतवणुकीत बाजारभाव विषयक जोखीम नियंत्रण करता येते.

ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये विविध प्लॅटफॉर्मची माहिती जरी घेतली असेल तरी शेतकरी कंपनीच्या संचालक मंडळातील जबाबदार संचालकांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहून सूक्ष्म व अभ्यासपूर्वक व्यवहार सुरू करणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ किंवा एमसीएक्स चे संकेतस्थळावरून (www.mcxindia.com) माहिती घ्यावी.

गोदाम उभारणी पूर्ण केलेल्या शेतकरी कंपनीने जर कंपनीच्या कार्यक्षेत्रात कापूस उत्पादन होत असेल, तर कापूस मूल्य साखळीत कामकाज करण्याच्या अनुषंगाने सर्व संचालकांनी कापूस मूल्य साखळीचे संपूर्ण ज्ञान घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकरी कंपनीच्या सभासदांना विक्री व्यवस्थेबाबत सेवा देणे शक्य होणार नाही.

शेतकरी उत्पादक कंपनीस होणारे फायदे

शेतकरी उत्पादक कंपनी एमसीएक्स प्लॅटफॉर्मच्या फ्यूचर वायदे बाजाराशी निगडित बाजारभाव जोखीम नियंत्रण उपक्रमात सहभागी झाल्यास आवश्यक कागदपत्रे जमा केली तर त्यांना खालील प्रमाणे फायदा मिळू शकतो.

उपक्रम सूट/परतावा (टक्के)

शेतीमाल परीक्षण शुल्क १००

शेतीमाल साठवणूक गोदाम शुल्क १००

शेतीमाल साठवणूक बॅग, ड्रम इत्यादी. १००

शेतीमाल वाहतूक खर्च ५०

अडतदार शुल्क १००

गोदाम रेपॉसिटरी शुल्क (एनईआरएल, सीसीआरएल) १००

कृषी उत्पन्न बाजार समिती शुल्क १००

स्वच्छता, वाळवणूक व प्रतवारी शुल्क ५०

क्लिअरिंग कॉर्पोरेशन शुल्क १००

सेबीने मान्यता दिलेले उपक्रम शुल्क १००

उपरोक्त शुल्क परतावा घेण्यासाठी लाभार्थ्याने बिलाची पावती, खर्चाचा तपशील आणि बँक खाते क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपनीने शेतमालाचे डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्‍सची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

Cotton
Sale of Agriculture Produce : ‘एमसीएक्स' प्लॅटफॉर्मसाठी मूल्यसाखळी

उदाहरण १ : कापसाचे बाजारभाव पडण्याच्या स्थितीतील व्यवहार

‘एमसीएक्स’ प्लॅटफॉर्मच्या आधारे बाजारभाव वाढीच्या काळात आणि बाजार पडण्याच्या काळात हेजिंगचा कसा उपयोग होऊ शकतो याचे उदाहरण पाहूयात.

असे गृहीत धरा, की जिनरने ऑक्टोबर महिन्यामध्ये (जिनर हा कापूस मूल्यसाखळीचा एक महत्त्वाचा घटक असून, कापसाचे गाठीमध्ये रूपांतर करणारा कापूस मूल्य साखळीतील एक प्रक्रियादार आहे) कापसाच्या १००० गाठी (२९ मिमी लांबीचा कापूस आणि एका गाठीचे वजन १७० किलो) साठवून ठेवल्या आहेत.

‘एमसीएक्स'' प्लॅटफॉर्मच्या साह्याने हेजिंग करून जिनर ऑक्टोबर महिन्यामध्येच कापूस गाठीचा बाजारभाव लॉक (फिक्स करणे) करून ठेवतो आणि स्वत: साठवून ठेवलेल्या कापूस गाठीचा बाजारभाव पडण्याच्या शक्यतेपासून संरक्षण मिळवितो. आजची म्हणजे ऑक्टोबर महिन्यातील कापसाची किंमत २५,००० प्रति कापूस गाठ आहे आणि त्याच वेळेस डिसेंबर महिन्यातील फ्यूचर वायदे करार किंमत रुपये २५,५०० असेल. जिनरने डिसेंबरच्या फ्यूचर वायदे करारातील कापसाचे ४० लॉट ऑक्टोबरमध्येच २५,५०० रुपयांना डिसेंबरच्या डिलिव्हरीकरिता विकले.

त्याने एकूण करार किमतीच्या १० टक्के मार्जिन मनी (मार्जिन मनी म्हणजे कराराच्या एकूण किमतीच्या मूल्यापैकी काही रक्कम) ‘एमसीएक्स’ एक्स्चेंजला भरून फ्यूचर वायदे बाजारात प्रवेश केला.

आता असे गृहीत धरा, की डिसेंबरमध्ये प्रति गाठ १००० रुपयांनी कापसाच्या किमती पडल्या. जिनरने कृषी उत्पन्न बाजार समिती, स्पीनिंग मिल यासारख्या भौतिक बाजारात २४,००० रुपये प्रति गाठ कापूस विकला आणि कापसाचे ४० लॉट खरेदी करून डिसेंबर फ्यूचर करारात २४,५०० प्रति गाठ प्रमाणे खरेदी करून कापूस बाजारभावाच्या जोखमीचे व्यवस्थापन केले. (* खालील बाजारभाव उदाहरणादाखल घेतले आहेत, प्रत्यक्ष बाजारभाव वेगळे आहेत.)

कालावधी/वेळ स्पॉट किंमत (रुपये/ गाठ) फ्यूचर किंमत (रुपये प्रति १७० किलो गाठ प्रमाणे)

ऑक्टोबर २०२* २५००० डिसेंबर २०२* मध्ये ४० चा लॉट रुपये २५,५०० प्रमाणे विकला.

डिसेंबर २०२* २४,००० डिसेंबर २०२* मध्ये ४० चा लॉट रुपये २४,५०० प्रमाणे खरेदी केला.

परिणाम रुपये १००० प्रति गाठ तोटा रुपये १००० प्रति गाठ जास्त मिळाले.

परिणाम :

वरील व्यवहार केल्यामुळे जिनर भौतिक बाजारात (स्पॉट मार्केटमधील) कापसाच्या पडलेल्या किमतीपासून प्रति गाठ सरासरी दर रुपये २५,००० असताना स्वत:च्या कापसाच्या गाठीचे संरक्षण करू शकला.

उदाहरण २ : कापसाचे बाजारभाव वाढण्याच्या स्थितीतील व्यवहार

समजा आज (ऑक्टोबर महिन्यात) एका निर्यातदाराला १००० कापसाच्या गाठी डिसेंबर महिन्यापर्यंत निर्यात करण्याची ऑर्डर मिळाली. त्याने स्पॉट मार्केटमधून कापूस खरेदी करून डिसेंबरमध्ये निर्यात करण्याचा विचार केला.

असे गृहीत धरा, की आजची कापूस गाठीची स्पॉट किंमत/भौतिक बाजारपेठेतील किंमत रु. २५,००० गाठ असून डिसेंबर फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्ट २५,५०० रुपयांवर ट्रेडिंग/व्यवहार होत आहेत. तसेच निर्यातदाराला डिसेंबर महिन्यात (स्पॉट) कापूस गाठीच्या किमती वाढू शकतात, याची काळजी वाटते.

अशा परिस्थितीत निर्यातदार हेजिंग करून, ऑक्टोबरमध्ये (आज) खरेदी किंमत लॉक करू शकतो आणि स्पॉट मार्केटमधील किमती वाढण्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. (* खालील बाजारभाव उदाहरणादाखल घेतले आहेत, प्रत्यक्ष बाजारभाव वेगळे आहेत.)

कालावधी/वेळ स्पॉट किंमत (रुपये/ गाठ) फ्यूचर किंमत (रुपये प्रति १७० किलो गाठ प्रमाणे)

ऑक्टोबर २०२* २५००० डिसेंबर २०२* मध्ये ४० चा लॉट रुपये २५,५०० प्रमाणे खरेदी केला.

डिसेंबर २०२* २६,००० डिसेंबर २०२* मध्ये ४० चा लॉट रुपये २६,५०० प्रमाणे विकला.

परिणाम रुपये १००० प्रति गाठ तोटा रुपये १००० प्रति गाठ जास्त मिळाले.

परिणाम :

अशा प्रकारे, निर्यातदाराने २५,००० प्रति गाठ या प्रभावी खरेदी किमतीसह स्पॉट मार्केटमधील वाढत्या किमतींपासून स्वतःचे संरक्षण केले.

वास्तविकपणे वरील उदाहरण समजावून घेऊन व्यवहार सुरू करावा असे अपेक्षित असून, जोपर्यंत प्रत्यक्ष व्यवहार केला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही घटकाला त्याचे महत्त्व समजणार नाही. कोणत्याही विषयाची तोंडी किंवा वाचून माहिती घेणे आणि त्या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष कृती करणे याशिवाय कोणतीही संकल्पना समजणार नाही हेही तितकेच खरे आहे.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com