Sale of Agriculture Produce : ‘एमसीएक्स' प्लॅटफॉर्मसाठी मूल्यसाखळी

MCX Platform : ‘एमसीएक्स’ ऑनलाइन प्लॅटफॉर्ममार्फत शेतीमाल विक्रीव्यवस्थेबाबत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
Agriculture Produce
Agriculture ProduceAgrowon
Published on
Updated on

MCX of Agriculture : राज्यातील समुदाय आधारित संस्था म्हणजेच सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांचे फेडरेशनमार्फत पर्यायी बाजारपेठ उभारण्यासाठी क्षमता बांधणी आवश्यक आहे.

सध्या राज्यातील विविध प्रकल्पांतर्गत कार्यरत यंत्रणा गोदाम, पॅकहाउस, स्वच्छता व प्रतवारी यंत्रणा इत्यादी पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

पर्यायी बाजार उभारणीमध्ये शेतीमालाचे व्यवहार करण्याचा परवाना, खासगी बाजार उभारणीचा परवाना, वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाचे प्रमाणीकरण प्रमाणपत्र प्रक्रिया,

व्यवसायाशी संबंधित विविध परवाने घेणेबाबतची प्रक्रिया व कालमर्यादा, एनईआरएल, एनईएमएल, एनसीएमएल, एनसीडीईएक्स व एमसीएक्स यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मची नोंदणीवर प्रशिक्षण आवश्यक आहे.

काही शेतकरी कंपन्या स्वत: या सर्व प्रक्रिया शिकून पर्यायी बाजारव्यवस्था निर्मितीमध्ये अग्रेसर आहेत, परंतु हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. ‘एमसीएक्स’ या प्लॅटफॉर्ममार्फत उपलब्ध सुविधा समुदाय आधारित संस्थेमार्फत घेण्याची आवश्यकता आहे.

शेतीमाल विक्रीव्यवस्थेबाबत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये कापूस, कापूस गाठी, पाम तेल आणि मेंथा तेल यांचा समावेश होतो.

कापूस मूल्यसाखळी

गोदाम व्यवसाय करताना कापूस पिकाचा ‘एमसीएक्स’ ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या आधारे कशाप्रकारे व्यवसाय करू शकतो याची माहिती समुदाय आधारित संस्थांनी घेणे आवश्यक आहे. याकरिता कापूस मूल्य साखळीची माहिती घेणे गरजेचे आहे.

जगातील एकूण कापड उद्योगात वापरण्यात येणाऱ्या धाग्यापैकी ३५ टक्के वापर कापसाच्या धाग्याचा होतो. कापसाची ताकद, शोषकता, धुण्याची आणि रंगण्याची क्षमता अशा विविध गुणांमुळे विविध प्रकारच्या कापड उत्पादनांना अनुकूल आहे. कापूस सरकीपासून पशुखाद्य बनविले जाते आणि त्याचे तेल जगात पाचवे प्रमुख खाद्यतेल म्हणून वापरले जाते.

Agriculture Produce
Agriculture Produce : कृषिमाल विक्रीसाठी शेतकरी कंपन्यांशी करार

कापसाचे वर्गीकरण प्रत्येक गाठीच्या स्टेपल लेन्थ (धाग्याची लांबी), प्रतवारी आणि वर्णानुसार केले जाते. कापसाची प्रतवारी ही साधी ते उत्तम (प्रीमियम) अशा गणकानुसार मोजली जाते. तसेच रंग, चमक, तंतूची शुद्धता, ताकद आणि एकरूपता या स्वरूपात मोजली जाते.

शेतकरी, सहकारी संस्था, शासकीय संस्था, बँका, जिनिंग युनिट, यार्न उत्पादक, टेक्स्टाइल युनिट, गारमेन्ट युनिट, निर्यातदार, विक्रेते, प्रक्रियादार आणि लघू, मध्यम, सूक्ष्म उद्योग (एसएमई) यांसारखे भागधारक कापूस मूल्य साखळीतील प्रमुख घटक आहेत.

जगात कापूस उत्पादनात २०२०-२१ च्या आकडेवारीनुसार ब्राझील (१० टक्के), पाकिस्तान (४ टक्के), ऑस्ट्रेलिया (३ टक्के), तुर्की (२ टक्के), अमेरिका (१३ टक्के), इतर (१७ टक्के), चीन (२६ टक्के), भारत (२५ टक्के) या देशांचा समावेश होतो. जगातील सर्वांत जास्त कापसाचा वापर करण्यात २०२०-२१ च्या आकडेवारीनुसार भारत (२१ टक्के), चीन (३३ टक्के), पाकिस्तान (९ टक्के) बांगलादेश (७ टक्के), तुर्की (६ टक्के), व्हिएतनाम (६ टक्के), उझबेकिस्तान (३ टक्के), इतर (१६ टक्के) हे देश अग्रेसर आहेत.

जगात सर्वांत जास्त कापूस आयात करण्यात २०२०-२१ च्या आकडेवारीनुसार भारत (२ टक्के), चीन (२६ टक्के), पाकिस्तान (११ टक्के) बांगलादेश (१८ टक्के), तुर्की (११ टक्के) व्हिएतनाम (१५ टक्के), इंडोनेशिया (११ टक्के) इतर (१३ टक्के) देशांचा समावेश होतो.

जगात सर्वांत जास्त कापूस निर्यात करण्यात २०२०-२१ च्या आकडेवारीनुसार अमेरिका (३४ टक्के), ब्राझील (२३ टक्के) भारत (१३ टक्के), इतर (१९ टक्के), ऑस्ट्रेलिया (३ टक्के), ग्रीस (३ टक्के), बेनीन (३ टक्के), माली (१ टक्का) या देशांचा समावेश होतो.

भारतात २०२१-२२ च्या आकडेवारीनुसार कापूस उत्पादनात महाराष्ट्र (२२ टक्के), गुजरात (२५ टक्के), मध्य प्रदेश (४ टक्के), तेलंगणा (१९ टक्के), आंध्र प्रदेश (५ टक्के), कर्नाटक (५ टक्के), तमिळनाडू (२ टक्के), ओडिशा (५ टक्के), पंजाब (३ टक्के), हरियाना (६ टक्के), राजस्थान (७ टक्के), इतर (३ टक्के) यांचा समावेश होतो.

किंमत जोखीम व्यवस्थापन

कापूस किंमत जोखीम व्यवस्थापनामध्ये कापड निर्मिती कंपनी, जिनर्स, स्पिनर्स आणि कापूस साठवणूक करणारे स्टॉकिस्ट अशा सहभागींसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. बाजाराशी निगडित आधुनिक तंत्रे आणि धोरणे अत्यंत महत्त्वाची असून बाजार आधारित जोखीम व्यवस्थापनामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. कापूस वायदे बाजार हा किंमत जोखीम व्यवस्थापनातील आर्थिक साधन आहे.

वायदे बाजाराच्या प्लॅटफॉर्मद्वारे विविध योजना उपलब्ध करून दिल्या जातात. यामुळे किंमत जोखीम व्यवस्थापनाद्वारे शेतीमालाच्या किमतीमध्ये स्पर्धा निर्माण होऊ शकते. सरकारकडून स्थापना करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीमार्फत नोंदविलेल्या निरीक्षणानुसार असे आढळून आले आहे, की कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज शेतीमाल किमतीचा शोध, किंमत जोखीम व्यवस्थापनावर कार्य करीत आहे.

बाजारावर परिणाम करणारे घटक

आंतरराष्ट्रीय बाजारातील घटक

मागील काही वर्षांत भारत देश एक गुणवत्तापूर्ण कापसाचे उत्पादन करणारा देश म्हणून गणला जातो. जागतिक बाजारपेठेतील किमतीवर त्याचा मोठा प्रभाव असतो.

जगातील कापसाचे उत्पादन, कापसाचा वापर,आणि साठवणूक केलेला माल याचा थेट परिणाम देशांतर्गत कापसाच्या किमतीवर होत असतो.

देशांतर्गत घटक

देशांतर्गत मागणी पुरवठा परिस्थिती, अंतर-पीक किंमत, उत्पादन खर्च आणि आंतरराष्ट्रीय किमतीची परिस्थिती हे बाजारातील किमतींवर परिणाम करणारे प्रमुख घटक आहेत.

Agriculture Produce
Sale of Agriculture Produce : शेतीमाल विक्रीसाठी ‘एमसीएक्स’

पिकाशी संबंधित घटक

हवामान, कीड, रोग आणि कृषी पिकांशी संबंधित इतर जोखीम घटकांचाही कापूस उत्पादनावर परिणाम होतो.

शासकीय धोरण

आयात, निर्यात आणि किमान आधारभूत किंमत यासंबंधीची सरकारी धोरणे कापसाच्या किमतींवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणारी आहेत.

अर्थव्यवस्था

विशेषत: कापसासाठी जागतिक व्यापार महत्त्वाचा असून, जगभरात उत्पादित होणाऱ्या सुमारे ३० टक्के कापूस धाग्याव्यतिरिक्त, सूत, फॅब्रिक आणि कपडे यांचा अप्रत्यक्षपणे व्यापार केला जातो. मुख्य ग्राहकाची आवड, टेक्स्टाइल सेक्टर आणि त्याच्याशी निगडित कंपन्यांची आर्थिक परिस्थिती हे घटक तितकेच जबाबदार असतात.

सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांचे फेडरेशन किंवा महिला अथवा शेतकरी बचत गट यांनी कापूस पिकाच्या मूल्य साखळी विषयक फार काही कामकाज केल्याचे चित्र नाही. मागील काही वर्षांत तूर व कांदा या पिकात काही प्रमाणात कामकाज करण्यात आले, परंतु अजूनही ठोस असे काही हाती लागलेले नाही.

जागतिक बँक अर्थसाह्यित स्मार्ट प्रकल्पामार्फत कापूस पिकाबाबत मूल्यसाखळी विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून, बाजारभावाची माहिती पुरविणे व कापूस पिकात शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून कापूस थेट न विकता एकाच वाणाच्या कापसाचे उत्पादन करून त्याची गाठ (१७० किलो) बनवून वखार महामंडळाच्या गोदामात ठेवून त्यावर गोदाम पावती योजना देण्यात येत आहे.

यानंतर या गाठी विक्रीकरिता प्रक्रिया उद्योगासोबत थेट करार करण्यात येत आहेत. यामुळे कापसातील सरकीचे तेल व सरकी पेंड शेतकरी वर्गाकडे राहणार असून, गोदामात ठेवलेल्या गाठीस योग्य दर मिळाल्यास शेतकरी वर्गास तिहेरी फायदा होणार आहे.

याकरिता स्मार्ट प्रकल्पाचे संकेतस्थळ (www.smart-mh.org), वायदे बाजाराशी निगडित पर्याय जसे की एमसीएक्स (www.mcxindia.com) व इतर काही मान्यता प्राप्त माहितीच्या स्रोतांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com