Orchard Plantation : नवीन फळबाग लागवडीचे नियोजन

Fruit Crop Cultivation : फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी फळबाग लागवडीची पूर्वतयारी आणि नियोजन या बाबी महत्त्वाच्या आहेत.
Orchard Plantation
Orchard PlantationAgrowon

डॉ. आदिनाथ ताकटे

फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी फळबाग लागवडीची पूर्वतयारी आणि नियोजन या बाबी महत्त्वाच्या आहेत. फळबागेचे नियोजन करताना जमिनीचा प्रकार, फळझाडांची निवड, बारमाही पाण्याची व्यवस्था, स्थानिक हवामानात कोणत्या प्रकारची फळझाडे येऊ शकतील, लागवडीपूर्वी माती, पाणी परिक्षण, लागवडीसाठी उत्तम कलमांची उपलब्धता या सर्व बाबींचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचा आहे.

हवामानानुसार फळपिकांची लागवड ः
महाराष्ट्रातील हवामान सर्व फळपिकांच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक आहे. त्यामुळे सफरचंद वगळल्यास बहुतेक सर्व फळपिकांची यशस्वी लागवड करता येते. राज्याचा विचार करता पश्‍चिम महाराष्ट्रात आंबा, केळी, चिकू, पपई, नारळ अशा प्रकारची फळझाडे घेता येतात. पूर्वेकडील उष्ण व कोरड्या हवामानात संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, द्राक्षे, डाळिंब यांसारखी फळझाडे घ्यावीत. कोकणसारख्या अति पावसाच्या भागात आंबा, काजू, चिकू, नारळ, फणस यांसारखी फळझाडे घ्यावीत. तर अत्यंत कमी पावसाचे प्रमाण असलेल्या भागात बोर, सीताफळ, आवळा, चिंच अशी कोरडवाहू फळझाडे घेण्याची शिफारस करण्यात येते.
हवामानानुसार फळझाडांची लागवड न केल्यास फळे न येणे, फळे लागली तरी फळांची प्रत खालावणे, उशिरा फळे लागणे, रोग व किडींचा प्रादुर्भाव इत्यादी समस्या उद्‍भवतात. म्हणून हवामानानुसार फळझाड लागवड करणे आवश्यक आहे.

जमिनीची निवड ः
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड ही अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यासाठी जमिनीचा प्रकार, जमिनीची खोली, जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे? जमिनीचा निचरा कसा आहे? यांचा अभ्यास करावा. फळबागेसाठी जमिनीची निवड करताना जमिनीचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. फळबागेसाठी कमीत कमी १ मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमीन निवडावी. भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत, मध्यम पोताच्या जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा. मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असावे. जमिनीचा उतार २ ते ३ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. फळबाग लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील मातीचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे.
फार खोल असणाऱ्या जमिनी, क्षारयुक्त जमिनी, चोपण जमिनी यांच्यामधून पाण्याचा निचरा योग्य होत नाही. अशा जमिनीत प्रारंभी झाडे वाढल्यासारखी दिसली तरी पुढे वाढीचा वेग मंदावतो आणि उत्पादन मिळत नाही. तसेच ज्या जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त आहे, अशा जमिनीत फळबागेची वाढ होत नाही.


Orchard Plantation
Orchard Plantation : मोहोळमध्ये शेततळ्यामुळे फळबाग क्षेत्रात वाढ


विविध फळझाडांच्या लागवडीचे अंतर ः
फळझाड---लागवडीचे अंतर (मीटर)---हेक्टरी झाडे
आंबा---१० x १०---१००
चिकू---१० x १०---१००
चिंच---१० x १०---१००
जांभूळ---१० x १०---१००
नारळ---७.५ x ७.५---१७७
आवळा---७ x ७---२०४
पेरू---६ x ६---२७७
००---३ x २---१६६६
बोर---६ x ६---२७७
लिंबू किंवा मोसंबी---६ x ६---२७७
सीताफळ---५ x ५---४००
डाळिंब---४.५ x ३---७४०
अंजीर---५ x ५---४००
००---४.५ x ३---७४०

फळबागेसाठी खड्डा कसा भरावा ः
खड्डा खोदताना वरी व खालील थरातील माती वेगवेगळी टाकावी. खड्डे तीन आठवडे तापू द्यावेत, जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाशामुळे खड्ड्यांचे निर्जंतुकीकरण होईल. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खड्डे पुन्हा भरावेत. खड्डे मातीने भरताना ते निर्जंतुकीकरण करून खड्ड्याच्या तळाला वाळलेला पालापाचोळा १५ सें.मी. थरात भरावा. मातीमध्ये २० ते २५ किलो चांगले कुजलेले शेणखत, २ ते ३ किलो गांडूळखत, २ ते ३ किलो निंबोळी पेंड, २५ ग्रॅम टायकोडर्मा, १५ ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू, २५ ग्रॅम ॲझोटोबॅकटर हे मिश्रण मिसळून घ्यावे. खड्डा जमिनीच्या वर ५ ते ७ सेंमी उंच भरून ठेवावा. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करता येईल.
-------------------------
- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(मृदा शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com