Wheat Cultivation : नियोजन उशिरा गहू लागवडीचे...

Wheat Sowing : या वर्षी परतीच्या पावसामुळे खरीप पिके वेळेत काढणे शक्य झाले नाही. तसेच जमिनीतील वाफसा अभावी बागायती गव्हाची पेरणी महिनाभर उशिरा झाली.
Wheat Cultivation
Wheat CultivationAgrowon
Published on
Updated on

डॉ. विजेंद्र बाविस्कर, डॉ. यशवंतकुमार के. जे., डॉ. सुधीर नवाथे

ऊस तोडणी, कापूस काढणी किंवा सोयाबीन आणि खरिपातील अन्य पिकांच्या काढणीस झालेल्या उशिरामुळे गव्हाच्या पेरणीस विलंब होतो. या वर्षी परतीच्या पावसामुळे खरीप पिके वेळेत काढणे शक्य झाले नाही.

तसेच जमिनीतील वाफसा अभावी बागायती गव्हाची पेरणी महिनाभर उशिरा झाली. राज्यातील गव्हाच्या पेरणीपैकी अंदाजे ३० टक्के क्षेत्र उशिराच्या पेरणीखाली येते. मात्र यंदाच्या पावसाच्या परिस्थितीमुळे या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कमी उत्पादकतेमागील कारणे

  • गहू लागवडीसाठी हलक्या जमिनीचा वापर.

  • पिकाच्या वाढीसाठी तसेच दाणे भरण्याच्या कालावधीत आवश्यक तापमान आणि थंडीचा पुरेसा कालावधी न मिळणे.

  • सुधारित लागवड तंत्राचा अभाव.

  • अधिक उत्पादनक्षम सुधारित वाणाच्या बियाणांची अनुपलब्धता

  • पिकास आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देणे.

  • रासायनिक खतांचा असंतुलित वापर.

वेळेवर पेरणी आवश्यक

बागायती गव्हाच्या उशिरा पेरणीची शिफारस ही नोव्हेंबरचा शेवटचा पंधरवडा ते डिसेंबरचा पहिला पंधरवडा (१६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर) या कालावधीसाठी आहे. मात्र, काही ठिकाणी १५ डिसेंबरनंतरही गव्हाची पेरणी केली जाते. वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केल्यास प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात उत्पादनात हेक्टरी २.५ क्विंटल किंवा एकरी एक क्विंटल उत्पादन घट येते.

गहू पिकाचे उत्पादन हे पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते. गहू पिकाच्या वाढीसाठी ७ अंश सेल्सिअस ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तसेच दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्याची वाढ चांगली होऊन दाण्याचे वजन वाढते. मात्र, उशिरा पेरणी केलेल्या गव्हास अनुकूल वातावरण मिळत नसल्याने उत्पादनात घट येते.

Wheat Cultivation
Wheat Cultivation : गहू लागवडीसाठी योग्य वाणाची निवड महत्त्वाची

पेरणी

  • पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सेंमी खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.

  • पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता एकेरी करावी. म्हणजे आंतरमशागत सोयीचे होते.

  • जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.

आंतरमशागत

बागायत उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यांनी खुरपणी करावी. पीक कांडी अवस्थेत आल्यानंतर मजूर लावून तणांचा बंदोबस्त करता येत नाही. तसे केल्यास पिकांची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शिफारशीत तणनाशकाचा वापर फायद्याचा ठरतो.

खत व्यवस्थापन

बागायत उशिरा पेरणीसाठी ९० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति हेक्टरी प्रमाणे द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी खुरपणीनंतर द्यावी किंवा १/३ नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीचे वेळी व उर्वरित नत्राची अर्धी मात्रा पहिल्या व दुसऱ्या पाण्याच्या वेळी द्यावी.

Wheat Cultivation
Wheat Cultivation : मर्यादित सिंचनामध्ये गहू लागवडीचे नियोजन

उत्पादनातील घट टाळण्यासाठी उपाय 

  • गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी उपलब्धतेनुसार शिफारस केलेल्या वाणांचा वापर करावा.

  • उशिरा पेरणीसाठी गव्हाच्या दोन ओळींत १८ सेंमी अंतर ठेवून पेरणी ५ ते ६ सेंमी. खोल पाभरीने शक्यतो दक्षिणोत्तर करावी.

  • हेक्टरी रोपांची संख्या जास्त ठेवण्यासाठी बियाणाचे हेक्टरी प्रमाण १२५ ते १५० किलो एवढे ठेवावे.

  • खत व्यवस्थापनामध्ये १/३ नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळी, उरलेले नत्र दोन समान हप्त्यात पहिले पाणी आणि दुसरे पाणी देतेवेळी द्यावे.

  • जमिनीत ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवामान राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने म्हणजे १५ दिवसांनी योग्य मात्रेत पाणी द्यावे. पीक क्षेत्रात तापमान कमी राहण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा.

  • गहू पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यानंतर काही वेळा गव्हाच्या दाण्यावर काळा डाग पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी दाणे भरताना तुषार वरील क्षेत्रात शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी करावी.

सिंचन व्यवस्थापन

जमिनीत कायमस्वरूपी ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवा राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने (१५ दिवसांनी) योग्य मात्रेत सिंचन करावे. तापमान कमी राहण्यासाठी गव्हासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषार सिंचनाने शेवटचे पाणी ८० ते ८५ दिवसांदरम्यान द्यावे.

बागायती उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात. गहू पिकाला वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे.

एमएसीएस-६२२२ वाणाची लागवड

  • आघारकर संशोधन संस्थेने विकसित केलेला गव्हाच्या एमएसीएस-६२२२ (MACS ६२२२) या सरबती वाणाची वेळेवर पेरणी केल्यास हेक्टरी सरासरी ४८ क्विंटल उत्पादन मिळते. अनुकूल परिस्थितीत या वाणाची कमाल उत्पादन क्षमता ६० क्विंटल प्रति हेक्टर इतकी आहे.

  • हा वाण उशिरा पेरणीसाठी (१ ते १५ डिसेंबर) व दोन ते तीन पाण्याच्या पाळ्यांमध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद देतो.

  • हा वाण तांबेरा प्रतिकारक, मोठा दाणा, पाव व चपातीसाठी उत्तम आहे.

  • बदलत्या हवामानात तसेच उशिरा पेरणी अशा प्रतिकूल परिस्थितीतही चांगले उत्पादन मिळवून देणारा असा हा वाण आहे.

  • शेतकऱ्यांच्या शेतात घेतलेल्या गहू पीक प्रात्यक्षिकामध्येही (FLD) उशिरा पेरणीतही एमएसीएस-६२२२ या वाणाचे हेक्टरी सरासरी ४० ते ५० क्विंटल उत्पादन मिळाले आहे. त्याचप्रमाणे फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू १९९४) हा सरबती वाण देखील बागायती वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी राज्यात प्रसारित करण्यात आला आहे. वेळेवर पेरणीखाली हेक्टरी ४६.१२ क्विंटल, तर उशिरा पेरणीखाली ४४.१३ क्विंटल उत्पादन मिळते.

- डॉ. विजेंद्र बाविस्कर, ८३७४१७४७९७

(अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com