

डॉ. योगेश पाटील, संजय चितोडकर, डॉ. नीलेश मगर
Wheat Farming Management : रब्बी हंगामात घेतले जाणारे गहू हे महत्त्वाचे पीक आहे. गव्हाची लागवड जिरायत, मर्यादित सिंचन आणि बागायती अशा तीनही प्रकारे करता येते. मर्यादित सिंचनासाठी (१ ते २ पाणी) महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अनेक वाण प्रसारित केलेले आहेत. त्या वाणांची निवड करून १ ते २ पाण्यात गहू पिकाचे चांगले उत्पादन मिळविता येते. ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी जमिनीची गहू लागवडीसाठी निवड करावी. पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सेंमी खोलीवर करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.
जमीन
गहू पिकाच्या लागवडीसाठी भारी व खोल जमिनीची निवड करावी. एक किंवा दोन पाणी उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी जमिनीतच गव्हाची लागवड करावी.
पेरणीची वेळ
संरक्षित पाण्याखाली घेण्यात येणाऱ्या गव्हाची पेरणी २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान करावी.
पूर्वमशागत
जमिनीची मशागत करताना खरीप पीक जर सोयाबीन किंवा गळीत धान्य असेल, तर एकच कुळवणी करावी. कुळवणीच्या अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरवून टाकावे. आधीच्या पिकाची धसकटे व इतर काडीकचरा वेचून त्याचा कंपोस्टसाठी वापर करावा.
बियाणे प्रमाण
संरक्षित पाण्याखाली पेरणीसाठी हेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे.
बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी बियाण्यांस थायरम (७५ डब्ल्यू.एस.) या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर मावा, तुडतुडे आणि खोडमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम (७० डब्ल्यूएस) १७.५ मिलि प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीमध्ये सुकवावे.
त्यानंतर प्रति किलो बियाण्यांस ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खतांची प्रत्येकी २५ ग्रॅम प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. जिवाणू खतांच्या बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ मिळते.
पेरणी
पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सेंमी खोलीवर करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.
संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी दोन ओळींत २० सेंमी अंतर ठेवून करावी.
पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूंनी न करता ती एकेरी करावी. म्हणजे आंतरमशागतीची कामे करणे सोईचे होते.
बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा.
जमिनीचा उतार लक्षात घेवून गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.
सिंचन व्यवस्थापन
अपुऱ्या पाणीपुरवठा परिस्थितीत कमी पाण्यात अधिक उत्पादनक्षम वाणांचा वापर करून खालीलप्रमाणे पाणी व्यवस्थापन करावे.
एकच पाणी देणे शक्य असल्यास ः पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
दोन पाणी : पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
तीन पाणी : पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी आणि तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
आंतरमशागत
पेरणीपासून ३० ते ४० दिवसांचे आत तणाचे प्रमाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. आवश्यकतेप्रमाणे १ ते २ कोळपण्या करून जमीन मोकळी करावी. त्यामुळे तणांचा नाश होतो. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. जिरायती गव्हामध्ये जमिनीवर आच्छादनाचा वापर केल्यास बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा जास्त टिकून राहतो.
जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी उपाययोजना
ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. तुषार पद्धतीने सिंचन केल्यास जास्तीचे क्षेत्र कमी कालावधीत भिजविता येईल.
जमिनीत कमी ओलावा असल्यास, पोटॅशिअम नायट्रेट १ टक्का प्रति लिटर पाणी या
प्रमाणात फवारणी करावी. या फवारणीमुळे पिकाच्या पानातील क्रिया गतिमान होण्यास मदत होते. पीक जमिनीतील उपलब्ध ओलावा शोषून घेण्यास सुरुवात करते.
पिकास पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसांनी १९:१९:१९ या विद्राव्य खताची २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
खत व्यवस्थापन
पेरणीची वेळ नत्र (किलो/ हेक्टर) स्फुरद (किलो/ हेक्टर) पालाश (किलो/हेक्टर)
मर्यादित सिंचन पेरणी ८० ४० ४०
मर्यादित सिंचनासाठी सुधारित वाण
वाण परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस) सरासरी उत्पादन (क्विं/हे.) वैशिष्ट्ये
सरबती वाण (कोरडवाहू)
एन. आय. ए. डब्ल्यू. १४१५ (नेत्रावती) १०५ ते १०८ जिरायत १६ ते १८ प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम
सरबती वाण (मर्यादित सिंचन)
फुले अनुराग (एन.आय. ए. डब्ल्यू. ४०२८) १०५ ते १०८ ३० ते ३५ (एका ओलिताखाली) प्रथिनांचे प्रमाण १२.४ टक्के, आकर्षक टपोरे दाणे, करपा रोगास प्रतिकारक्षम, चपातीसाठी उत्तम.
फुले अनुपम (एन.आय. ए. डब्ल्यू. ३६२४) १०५ ते ११० ३० ते ३५ (एका ओलिताखाली) नियंत्रित पाणी, वेळेवर पेरणी, तांबेरा प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम
फुले सात्त्विक (एन.आय.ए.डब्ल्यू. ३१७०) १०३ ते १०८ ३५ ते ४० (एका ओलिताखाली) नियंत्रित पाणी, वेळेवर पेरणी, तांबेरा प्रतिकारक
एन.आय.ए.डब्ल्यू. १४१५ (नेत्रावती) १०८ ते १११ (मर्यादित सिंचन) २५ ते २८ प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम
बन्सी वाण (मर्यादित सिंचन)
एन.आय.डी.डब्ल्यू. ११४९ ११० ते ११५ ३५ ते ४० नियंत्रित पाणी, वेळेवर पेरणी, तांबेरा प्रतिकारक, शेवया, कुरड्या व पास्ता निर्मितीसाठी उत्तम वाण
एम.ए.सी.एस. ४०५८ १०६ २५ ते ३० प्रथिने १२.८ टक्के, जस्त ३७.८ पीपीएम, लोह ३९.५ पीपीएम, तांबेरा प्रतिकारक, रवा व पास्तासाठी उत्तम वाण
एकेडीडब्ल्यू २९९७ -१६ (शरद) ११० ते ११५ १२ ते १४ चपाती व पास्ता निर्मितीसाठी उत्तम
- डॉ. योगेश पाटील, ७९७२८१९१०१
- डॉ. नीलेश मगर, ९४२१८८६४७४
- प्रा. संजय चितोडकर, ९३२६०९६१८१
(कृषी संशोधन केंद्र, निफाड जि. नाशिक )
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.