
Raigad News : रायगड जिल्ह्यात दरवर्षी अतिवृष्टीमुळे पूर, दरडी कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच जीवितहानी होते. किनारी भागांतील धूप प्रतिबंधासाठी बांबू लागवड हा उत्तम पर्याय असल्याने जिल्हा प्रशासनाने बांबू क्लस्टर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत यंदा ३५ लाख बांबूंची लागवड केली जाणार आहे.
कृषी, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाने यासाठी रोपवाटिका तयार केल्या असून, या रोपवाटिकांमध्ये ‘मंगा’ जातीची बांबूची रोपे तयार केली असून लवकरच लागवड केली जाणार आहे. किनारपट्टीवरील भागात वादळांपासून निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी या बांबूची मदत होऊ शकेल.
जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढली आहे. त्यामुळे काही भागाला वारंवार पुराचा सामना करावा लागतो. संशोधकांच्या निरीक्षणानुसार, किनारपट्टीवरील भागात वादळापासून निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी बांबूची मदत होऊ शकते. बांबूची झाडे त्यांच्या मजबुतीमुळे मातीला धरून ठेवतात, ज्यामुळे किनारपट्टीची धूप कमी होतो.
बांबूच्या घनतेमुळे लाटा आणि समुद्राच्या प्रवाहांमुळे होणारे नुकसान कमी होते. बांबूची लागवड जैवविविधता वाढवते आणि वन्यजीवांसाठी अधिवास निर्माण करते. बांबूच्या लागवडीमुळे जमिनीतील पाणी पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते.
काही वर्षांत रायगड जिल्ह्यातील किनारी भागासह डोंगराळ भागात असणाऱ्या गावांमध्ये सातत्याने पुराचा धोका वाढला आहे. पुराच्या धोक्यामुळे दरवर्षी हजारो नागरिकांना आपला मूळ अधिवास सोडून इतर ठिकाणी जावे लागते.
त्यामुळेच जिल्ह्यात एक कोटी बांबू लागवडीची योजना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. या योजनेंतर्गत या वर्षी ३५ लाख बांबूची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी रोपे तयार करण्यात आली असून, जून ते जुलैदरम्यान लागवड सुरू केली जाणार आहे. खासगी आणि शासकीय जमिनींवर ही लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांना पडीक जमिनी, बांधावर बांबू लागवड करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत लागवड
शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. वैयक्तिक बांबू लागवडीअंतर्गत तीन बाय तीन मीटर या अंतरानुसार एक हेक्टरसाठी एक हजार रोपांची लागवड केल्यास चार वर्षांसाठी लाभार्थ्यांना सात लाखांपर्यंतचा लाभ मजुरी व इतर खर्चाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.