Milk Production : स्वच्छ दूध उत्पादनाचे नियोजन

Clean Milk Production : योग्य दूध व्यवस्थापन कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे हळुवारपणे, त्वरित आणि पूर्णपणे स्वच्छ आणि कोरड्या सडातून उच्च-गुणवत्तेचे दूध दोहन करणे, कासदाह संसर्ग कमी करणे हा आहे.
Milk Production
Milk ProductionAgrowon
Published on
Updated on

डॉ. महेश जावळे, डॉ. शीतल चोपडे, डॉ. अतुल ढोक

Clean Milk Production Planning : योग्य दूध व्यवस्थापन कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे हळुवारपणे, त्वरित आणि पूर्णपणे स्वच्छ आणि कोरड्या सडातून उच्च-गुणवत्तेचे दूध दोहन करणे, कासदाह संसर्ग कमी करणे हा आहे. याच बरोबरीने गाय तसेच दूध काढणारी व्यक्ती यांच्यातील ताण कमी करणे महत्त्वाचे आहे.

संसर्गजन्य किंवा पर्यावरणीय कारणांमुळे दुभत्या जनावरांमध्ये कासदाह संसर्ग होतो.बाधित झालेल्या गायीचे दूध काढताना रोगकारक जिवाणूंचे इतर गायींमध्ये संक्रमण होऊ शकते. पर्यावरणामार्फत आजाराचा प्रसार होत असल्यास दूध दिल्यानंतर लगेच जेव्हा सड नलिका उघडी असते तेव्हा गाय संक्रमित होऊ शकते.
१) कासदाह संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी हातमोजे वापरणे, दूध दोहनापूर्वी आणि नंतर सडांचे निर्जंतुकीकरण, सड कोरडे करण्यासाठी प्रत्येक गाई, म्हशीसाठी स्वतंत्र टॉवेल वापरावा. दूध यंत्रातील बॅकफ्लश सिस्टम आणि दूध काढण्याची उपकरणे योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण करावीत.
२) ज्या कळपांमध्ये सांसर्गिक कासदाह संक्रमण नियंत्रित केले असते, अशा ठिकाणी बहुतेकदा पर्यावरणीय संसर्गामुळे कासदाह आढळून येतो. पर्यावरणामुळे होणारा कासदाह टाळण्यासाठी गोठ्यामध्ये स्वच्छ वातावरण ठेवावे. गोठा आणि फरशी कोरडी ठेवावी जेणेकरून पर्यावरणीय रोगजनकांचा संपर्क कमी होईल.

गाईंची हाताळणी ः
१) गायींना गोठ्यातून दूध पार्लरमध्ये नेल्यानंतर दूध काढण्याची प्रक्रिया सुरू होते. गायी पार्लरमध्ये आणताना शांतपणे हाताळाव्यात. शेपटी खेचणे किंवा ओरडल्यामुळे गायी तणावग्रस्त होतात.
२) जेव्हा गायींवर ताण येतो तेव्हा एड्रेनलिन संप्रेरक रक्तप्रवाहात सोडले जाते. दूध काढण्यापूर्वी ३० मिनिटांच्या आत एड्रेनलिन संप्रेरक सोडले गेल्यास ऑक्सीटोसिनच्या उत्सर्जनात व्यत्यय निर्माण होतो आणि दूध निर्मितीच्या सामान्य प्रक्रियेमध्ये व्यत्यय येतो. परिणामी, पान्हा वेळेत न सोडणे, दूध काढण्याच्या वेळेत वाढ होऊन दूध उत्पादन कमी होऊ शकते.
३) सांसर्गिक कासदाह झालेल्या गायींचे दूध काढल्यानंतर जिवाणू सदर कास हाताळलेल्या व्यक्तीच्या हातावर राहू शकतात. दूध काढताना इतर गायींच्या सडांमध्ये संक्रमित होऊ शकतात. दूध काढण्यापूर्वी हात साबण आणि पाण्याने पूर्णपणे धुवावेत. गायींमधील संसर्गजन्य कासदाहाचा प्रसार कमी करण्यासाठी दूध काढताना योग्य गुणवत्तेचे हातमोजे घालावेत.

Milk Production
Milk Production : स्वच्छ दूध उत्पादनाची सूत्रे जाणून घ्या

४) प्री-डीपिंगचा वापर दूध काढण्यापूर्वी सडाच्या टोकावरील रोगकारक जिवाणूंना दूर करण्यासाठी केला जातो. चारही सड सॅनिटायझिंग सोल्यूशनमध्ये पूर्णपणे बुडवावेत. योग्यरीत्या कार्य करण्यासाठी, प्री-डीपिंग सोल्यूशन आणि सड यांचा संपर्क ३० सेकंद असावा.
५) दूध काढण्याची मुख्य क्रिया सुरू करण्यापूर्वी प्रत्येक सडामधून दुधाच्या काही धारा हाताने दोहून काढून टाकल्या जातात. या धारा प्री-डीपिंग करण्यापूर्वी किंवा नंतर काढाव्यात. सड कोरडे करण्यापूर्वी असे करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे दूध सामान्य आहे की दुधामध्ये फ्लेक्स, गुठळ्या दिसणे हे तपासता येते, यावरून गायीला कासदाह झाला आहे का ओळखता येते. फोर स्ट्रीपिंगमुळे सड आणि कासेला उत्तेजित होण्यास मदत होते आणि पान्हा सोडण्यास मदत होते. प्रभावी उत्तेजनामुळे दूध प्रवाह दर वाढण्यास मदत होते. फोर स्ट्रीपिंग करताना दुधाच्या धारा स्ट्रिप कपमध्ये काढाव्यात. या दूध धारा हातावर किंवा टॉवेलवर काढू नये कारण यामुळे गाईच्या इतर सडांमध्ये किंवा इतर गायींमध्ये कासदाह पसरण्याचा धोका संभवतो. या क्रियेद्वारे पुरेसे उत्तेजित होण्यासाठी, प्रति गाय सुमारे १० ते १५ सेकंद लागतात.

६) सड निर्जंतुकीकरण करताना एकच कापड किंवा टिश्‍यू पेपर प्रत्येक सडावरून खालच्या बाजूने पुसण्यासाठी वापरावा. सडांवर असणारी कोणतीही घाण आणि प्री-डीप सोल्यूशन अवशेष काढून टाकावेत. अशा पद्धतीने सड स्वच्छ कापडाने पुसून कोरडे केल्याने कास धुताना पाण्यात असलेल्या जिवाणूंमुळे दूध आणि सडांची संभाव्य
दूषितता होण्यास प्रतिबंध होतो.
७) जिवाणूंना सडाच्या ग्रंथीमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि दूषित करण्यासाठी पाणी हे माध्यम म्हणून कार्य करते. दूध काढण्याची यंत्रे कोरड्या टीटला सुरक्षितपणे जोडलेली राहण्यासाठी डिझाइन केलेली असतात. वैयक्तिक कापड किंवा कागदी टॉवेलने सड कोरडे करणे हा प्रभावी पर्याय नाही. अयोग्यरीत्या कोरड्या केलेल्या सडांमुळे कासदाह होण्याचे प्रमाण वाढते.

Milk Production
Milk Production : स्वच्छ दूध उत्पादनाकडे लक्ष द्या...

मिल्किंग युनिटचा वापर ः
१) दूध देण्याकरिता गाईस तयार करण्याच्या प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते मिल्किंग युनिट जोडण्यापर्यंतचा कालावधी प्रीप-लॅग वेळ म्हणून संबोधले जाते. हा कालावधी अधिकाधिक दूध उत्पादन घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
२) सड ग्रंथीच्या सुरुवातीच्या उत्तेजनानंतर रक्तातील ऑक्सिटोसिनची उच्च पातळी सुमारे ६० सेकंदांत गाठली जाते. गाईस पान्हा फुटण्याच्या क्रियेसोबत मिल्क युनिट जोडणी क्रिया समन्वित करणे महत्त्वाचे आहे. दूध काढण्याची कार्यक्षमता आणि दुधाचा प्रवाह वाढविण्यासाठी, सड उत्तेजित झाल्यानंतर १ ते २ मिनिटांच्या आत मिल्किंग युनिट्स जोडावेत. प्रीप-लॅग वेळ ६० सेकंदांपेक्षा कमी किंवा ३ मिनिटांपेक्षा जास्त असल्यास दूध काढण्याची वेळ जास्त होते, दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते. दुधाचे युनिट जोडल्यानंतर लगेचच पान्हा फुटल्यास अधिक दूध काढणे शक्य होते.

३) दुग्ध प्रणालीमध्ये हवेचा प्रवेश कमी करण्यासाठी संलग्नक काळजीपूर्वक काढावेत. गाईच्या कासेच्या खाली मिल्किंग युनिट आणि त्याचे बंद पट्टे व्यवस्थित बांधावे. दूध काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान लाइनर स्लिप घसरू नयेत म्हणून मिल्किंग युनिट तपासावे.
४) जेव्हा मिल्किंग युनिट योग्यरीत्या बसविले जात नाही, तेव्हा दूध काढताना टीट कप घसरतात आणि दूध काढल्यानंतर खूप जास्त दूध कासेमध्ये राहते. लाइनर स्लिप अयोग्य वापरल्यास दूध किंवा कास दूषित होऊ शकते. जेव्हा टीट कप लाइनर घसरतो, तेव्हा दुधाचे काही थेंब टीटच्या शेवटच्या बाजूस झटक्यामुळे मागे टाकले जाऊ शकतात. जर दुधाच्या या थेंबांमध्ये कासदाह निर्माण करणारे जिवाणू असतील तर ते कासेमध्ये प्रवेश करतात आणि परिणामी नवीन संसर्ग होऊ शकतो.

५) मिल्किंग युनिट स्वहस्ते किंवा स्वयंचलित टेक-ऑफसह काढले जाऊ शकते. कोणत्याही प्रक्रियेमध्ये, क्षमतेपेक्षा जास्त दूध काढण्याचा प्रयत्न टाळावा. ज्यामुळे लाइनर स्लिप होण्याचे प्रमाण वाढू शकते, सडांचे नुकसान होऊ शकते.
६) जेव्हा स्वयंचलित टेक-ऑफ वापरले जातात, तेव्हा युनिट सेटिंग जास्त वेळ राहू नयेत याची खात्री करण्यासाठी समायोजन करावे. स्वयंचलित टेक-ऑफची सहसा शिफारस केली जाते, कारण ते मिल्किंग युनिट काढण्याची क्रिया सातत्यपूर्ण करतात.
७) टीट कप व्यक्तिशः काढताना किंवा काढण्यापूर्वी व्हॅक्यूम बंद करणे सुनिश्‍चित करावे. गायींसाठी संपूर्ण दूध काढण्यासाठी साधारणपणे प्रति गाय ४ ते ६ मिनिटे लागतील. दुधाच्या प्रवाहाचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे किंवा मिल्किंग युनिट बंद करण्याची योग्य वेळ निश्‍चित करण्यासाठी दुधाचा प्रवाह निर्देशक वापरावा. व्हॅक्यूम बंद न करता टीट कप काढून टाकल्याने सडाच्या टोकावरील पेशींचे नुकसान होते. यामुळे जिवाणू सड ग्रंथीमध्ये प्रवेश करू शकतात, परिणामी संसर्गाचे प्रमाण वाढते.
८) दूध काढल्यानंतर कासेमध्ये सुमारे २ ते ४ कप दूध शिल्लक राहाते. गाय योग्य रीतीने उत्तेजित केल्यास आणि योग्यरीत्या जोडलेल्या मिल्किंग युनिट्स वापरल्यास कासेमध्ये जास्त प्रमाणात दूध उरत नाही.
९) मिल्किंग युनिट वेगळे केल्यानंतर लगेचच प्रत्येक संपूर्ण सड जंतुनाशक द्रावणामध्ये बुडवावे. संसर्गजन्य कासदाह नियंत्रित करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. नवीन कासदाह संसर्ग टाळण्यासाठी, दूध काढून पूर्ण झाल्यानंतर गायी किमान ३० मिनिटे उभ्या राहतील, याची खात्री करावी.
-------------------------------------
संपर्क ः डॉ. महेश जावळे, ९२७३७३००१५
(सहायक प्राध्यापक पशुपोषण शास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com