
Pahalgam Terror Attack Statement: पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममधील बैसरण भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून शांतता असलेल्या काश्मिरात हा हल्ला झाला आणि त्यात निरपराधांचे जीव गेल्याने सर्वत्र संतापाची लाट आहे. महाराष्ट्रातील सहा जणांनी यात प्राण गमावले. हजारएक पर्यटक काश्मीरला गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सहकारी मंत्र्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन वॉर रूम तयार करण्याचे निर्देश दिले.
खरे तर राज्यकर्त्यांनी आपल्या यंत्रणेला कामाला लावणे, त्यांच्याकडून काटेकोर नियोजन करून काम करून घेणे ही जबाबदारी असते. मात्र एकनाथ शिंदे यांची कार्यशैली वेगळी आहे. ते रस्त्यावरचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोजून तीन वेळा मंत्रालयात आले. त्यानंतर वर्षावरून कारभार हाकला. कोरोना काळात कुणाला भेटत नव्हते आणि ते खरेही आहे.
त्यांच्याशी बंड करून सत्तेत आल्यानंतर आपण घरात बसणारे नाही हे दाखविण्यासाठी शिंदे मंत्रालयातील सहावा मजला सोडून रस्त्यावर उतरू लागले. पहाटे चार चार वाजता गणपती दर्शनासाठी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊ लागले. लोकांमध्ये मिसळणारे मुख्यमंत्री अशी इमेज त्यांनी तयार केली. आता ही इमेज उपमुख्यमंत्री असतानाही ते टिकवून आहेत. पहलगाममधील हल्ल्यानंतर मंत्री गिरीश महाजन हे काश्मीरला गेले.
आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा या दोन मंत्र्यांवर जबाबदारी सोपविली. पाठोपाठ शिंदे काश्मीरला रवाना झाले. सोबत मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅमेरे आणि पत्रकार घेऊन जाण्यास ते विसरले नाहीत. त्यानंतर शिंदे यांच्या पाया पडतानाचे, पर्यटकांशी मोबाइल फोनवर बोलतानाचे व्हिडिओ उबग तर आणतातच, पण मृत्यूनंतर राजकीय लाभाचे तूप कसे ओरपावे याचा वस्तुपाठही राजकारणी घालून देत असल्याचे किळसवाणे चित्र पहायला मिळत आहे.
यावर कळस चढवला तो ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी. मस्के हे शिंदे कृपेने झालेले खासदार. काश्मीरला गेलेले पर्यटक कधीही विमानात बसले नाहीत, त्यांना शिंदेंनी विमानातून महाराष्ट्रात आणले अशी मुक्ताफळे उधळून आम्ही काहीही झाले तरी राजकारणच करणार असा निगरगट्टपणा दाखवून दिला.
आरोग्य खात्याची लक्तरे
या आठवड्यात शिंदे गटाच्या कोट्यातून आरोग्यमंत्री झालेल्या प्रकाश आबिटकर यांच्या आजरा मतदारसंघात एका भरधाव मोटार सायकलचा अपघात झाला. अपघातात एक तरुण गंभीर जखमी होऊन अर्धा तास रस्त्याकडेला तडफडत होता. आजरा या शहरापासून केवळ आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर अपघाताचे ठिकाण असूनही तेथे अर्धा ते पाऊण तासात रुग्णवाहिका पोहोचली नाही. तो तरुण तडफडून मृत्युमुखी पडला. राज्यात आरोग्य सेवेअभावी रुग्णांचे जीव जात असताना त्यांना मदतीचा हात देणारे कुणी नाही.
उपमुख्यमंत्री शिंदे हे आरोग्य सेवेसाठी आणि मदतीसाठी तत्पर असतात. पण त्यांच्या एका मंत्र्याकडे असलेल्या खात्याची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना तिकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ बोलायला तयार नाहीत. धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांना भिकाऱ्यापेक्षाही वाईट वागणूक दिली जाते, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णांचे हाल तर पाहवत नाहीत. त्यामुळे तेथे ग्लॅमर नसल्याने मीडिया घेऊन नेते जात नाहीत.
राजकीय वाद
राज्यात तिसरी शिक्षणाची भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्याच्या आदेशानंतर विरोधाचे रान उठले. उत्तरेतील गायपट्ट्याचा इतका प्रभाव आहे, की मुंबई, पुण्यासारख्या महानगरात अस्सल मराठी माणूसही हिंदीतून संवाद सुरू करतो. माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या काळात शालेय शिक्षणात एक ड्रेसकोड, पुस्तकाला कोरी पाने यांसारखे ‘क्रांतिकारी’ निर्णय घेण्यात आले आणि ते बासनातही गुंडाळले.
मराठी शाळांची पुरती वाट लागली असताना, शालेय शिक्षण विभाग पालकांची मानगूट पकडून खासगी शाळांच्या दारात उभे करून देणारी धोरणे राबवीत आहे. नागरी जीवनातून मराठी हद्दपार होत असताना शालेय शिक्षणातही तिचे बारावे घालून राजकीय वाद करण्यात सध्या दादा भुसे यांच्यासारखे महान शिक्षणमंत्री मश्गूल आहेत. भुसे हे याआधी कृषिमंत्री होते. त्यांना ते खाते नको होते. शिवसेनेतील फुटीनंतर हातापाया पडून त्यांनी खाते सोडले. त्यानंतर बंदरे आणि खनिकर्म खाते मिळाले.
त्यात काय करायचे हे न कळाल्याने अडीच वर्षे ते गप्प होते. त्यानंतर त्यांना आता शालेय शिक्षण खाते दिले आहे. आता काहीतरी क्रांतिकारी करायचे म्हणून ते जोरदार कामाला लागलेले दिसतात. त्यातूनच शिक्षकांना ड्रेसकोड, हिंदी सक्तीसारखे भिकेचे डोहाळे त्यांच्या विभागाला लागले आहेत. हिंदी सक्तीचा निर्णय परस्पर काढल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. तीन पक्षांमध्ये एकट्या भाजपकडे बहुमत आहे.
अपक्षांना इशारा केला तरी त्यांच्यातील काहीजण झपकन उडी मारतील. एकनाथ शिंदे यांनी कितीही बेंडकुळ्या दाखवल्या तरी मंत्री मात्र मुख्यमंत्र्यांना वचकून आहेत. त्यामुळे दादा भुसे यांच्यासारखे क्रांतिकारी शिक्षणमंत्री परस्पर असा निर्णय घेतील का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे भुसेंना बळीचा बकरा केले की काय, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. दीपक केसरकर यांच्या काळात मंत्रालयापेक्षा चर्नी रोडवरील कार्यालयातून शालेय शिक्षण विभागाचा कारभार चालत असे. ज्या क्षेत्रात काय करायचे कळत नाही त्या ळी नसते भाकड उद्योग करण्यात या खात्याच्या मंत्र्यांना रस असतो.
टाळ्या हाळ्यांचे पुन्हा दिवस
‘विठ्ठला’भोवतींच्या बडव्यांना कंटाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केलेल्या राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना हाळी दिली आहे. तर चोहोबाजूंनी घेरलेल्या उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद देत टाळी दिली आहे. त्यामुळे शिंदे गट पुरता बिथरला आहे. पण या टाळ्या हाळ्यांमागील नेमके गमक काय आहे, हे अद्याप अनेकांना उमगत नाही. एक मात्र खरे,की भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यासोबतची मैत्री तोडून टाकली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र अशा टाळ्या हाळ्यांना हरकत नसल्याचे सांगून टाकले आहे.
: ९२८४१६९६३४
(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.