
Akola News: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन विभागाने शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या जपलेल्या पारंपरिक वाणांच्या नोंदणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवी दिल्ली येथील ‘पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण’ (PPV&FRA) यांच्या डीयूएस (Distinctness, Uniformity and Stability) चाचणी केंद्राच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जात आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील बुलडाणा जिल्ह्यातील दादाराव हटकर (हिवरखेड, ता. खामगाव) व वाशीम जिल्ह्यातील जगन्नाथ सरकटे यांनी विकसित केलेल्या तूर वाणांची नोंदणी प्रक्रिया करण्यात आली आहे. संशोधक संचालक डॉ. विलास खर्चे यांनी या निमित्ताने सांगितले, की शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या विशिष्ट वाणांना कायदेशीर हक्क मिळावा व त्यांना व्यावसायिक लाभ मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी सादर केलेल्या वाणांची विद्यापीठ एक वर्ष प्रक्षेत्र चाचणी करून शुद्धता तपासते. यानंतर तयार होणारा अहवाल, आवश्यक कागदपत्रे आणि बियाण्यांचे नमुने प्राधिकरणाकडे सादर करून वाणांची नोंदणी केली जाते. या उपक्रमांतर्गत बुलडाणातील शेतकरी दादाराव हटकर यांनी विकसित केलेले ‘गजब ५’ हे तूर वाण आणि वाशीमचे जगन्नाथ सरकटे यांची ‘समृद्धी’, ‘समृद्धी २२’ आणि ‘रेणुका २५’ ही वाणे नोंदवण्यात आली आहेत.
जी स्थानिक हवामानाशी जुळवून घेणारी, रोगप्रतिकारक व उच्च उत्पादनक्षम आहेत. संशोधन उपसंचालक डॉ. आम्रपाली आखरे यांनी सांगितले, की पारंपरिक वाणांचे दस्तऐवजीकरण भविष्यातील संशोधनासाठी उपयुक्त आहे. नोंदणी झालेल्या वाणांचा वापर केवळ शेतकऱ्यांच्या परवानगीनेच करता येतो.
पीकवाण संरक्षण, शेतकरी हक्क कायद्यांतर्गत नोंदणीचे फायदे :
हक्कांचे संरक्षण : शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या वाणांची नोंदणी झाल्यानंतर त्या वाणांच्या उत्पादनाचा, विक्रीचा आणि विनिमयाचा हक्क त्यांना मिळतो. इतरांना शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय हे वाण वापरता येत नाहीत.
उत्पन्नाची संधी : नोंदणीकृत वाणांची गुणवत्ता आणि वैशिष्ट्ये लक्षात घेऊन शेतकरी त्यांच्या बियाण्यांची विक्री करू शकतात आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
ओळख आणि सन्मान : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वाणासाठी शेतकऱ्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख आणि सन्मान मिळतो.
संशोधनासाठी उपयोग : नोंदणीकृत वाणांचा उपयोग कृषी संशोधनासाठी करता येतो, ज्यामुळे अधिक चांगले, टिकाऊ नावीन्यपूर्ण वाण विकसित करणे शक्य होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.