Saline Land Improvement : खारपाणपट्टा जमीन सुधारणेवर लक्ष द्या

Agriculture Update : विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात खारपाणपट्टा साधारण ३०० गावांमध्ये विस्तारलेला आहे. हा भूभाग नैसर्गिकरीत्या क्षारपड झालेला आहे. या भागामध्ये भूजल खारवट असल्यामुळे विहिरींना गोडे पाणी नाही.
Saline Land
Saline LandAgrowon
Published on
Updated on

Saline Land Agriculture : विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात खारपाणपट्टा साधारण ३०० गावांमध्ये विस्तारलेला आहे. हा भूभाग नैसर्गिकरीत्या क्षारपड झालेला आहे. या भागामध्ये भूजल खारवट असल्यामुळे विहिरींना गोडे पाणी नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी इतर शासकीय पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून राहावे लागते. हा भूभाग सोडिअममुक्त जमिनीचा आहे. साधारण १० फूट खोलीनंतर अत्यंत टणक क्षारयुक्त थर आढळतो. त्यामुळे पावसाळी पाण्याचे भूजल पुनर्भरण होत नाही.

जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण खोलीप्रमाणे वाढत जाते. सर्व शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या भागात विहिरी नाहीत. कारण येथील विहिरींना गोडे पाणी लागतच नाही. पिकांना जर पाटाच्या पद्धतीने किंवा ठिबक सिंचनाने ओलीत केल्यास जमिनीवरच्या थरात क्षार जमा होऊन जमिनी कडक होतात, नापीक होतात आणि पर्यायाने शेती मशागत अशक्य होते. शेत जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असल्यामुळे मातीचे कण हे चिकटून राहत नाहीत.

Saline Land
Saline Land : क्षारपड जमीन सुधारणेचे आर्थिक फायदे

त्यामुळे शेतातील माती ही पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाते व शेतामध्ये मोठ्या ओघळी तयार होतात. असे क्षेत्र मशागतीस अयोग्य होते. असे असले तरी शेती चांगली उपजाऊ आहे. कापूस, तूर, ज्वारी, हरभरा या पिकांचे उत्पादन चांगले आहे. त्यामुळे बहुतांश शेतक‌ऱ्यांचे या पट्ट्यातील शेती समस्यांकडे दुर्लक्ष होते. या क्षेत्राच्या वरील बाजूने सातपुडा पर्वतरांगा आहेत. तिकडे पडणारे पावसाचे पाणी या भागातून वेगाने वाहत पूर्णासारख्या मोठ्या नद्यांत जाते.

या गाळयुक्त पाण्याने त्या भागातील धरणे गाळयुक्त होत आहेत. या भागामध्ये फळबाग क्षेत्र नाही. झाडांची संख्या कमी आहे. गावागावांमधील अंतर हे खूप जास्त आहे. त्यामुळे ग्रामविकास व रस्ते दुरुस्ती या कामावरच जास्त लक्ष केंद्रित होत गेले. मात्र मूलभूत शेती विकासाकडे पाहिजे, त्या प्रमाणात काम झालेले दिसत नाही. खारपाण पट्ट्यातील जमीन सुधारणेसंदर्भात पुढे काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत. त्यावर प्राधान्याने काम करणे गरजेचे आहे.

Saline Land
Saline Land : क्षारपड जमीन सुधारणा

शेताच्या बांधावर धुरे असावेत. त्यामुळे शेतातील गाळ पावसाळ्यात वाहून जाणार नाही व धुऱ्यावर चारा पिके घेता येतील. खरीप हंगामामध्ये पेरणी उतारास आडवी होईल, शक्यतो सरी वरंब्यावर होईल यावर भर देण्यात यावा.

एकूणच मातीचा सामू हा ७.५ ते ९ आहे आणि सेंद्रिय कर्ब प्रमाण ०.१० पासून ०.३० पर्यंत आढळते. त्यामुळे ते सुधारण्यासाठी पीक अवशेषांचे कंपोस्ट करण्यावर भर देण्यात यावा. रासायनिक खतांचा वापर गरजेनुसार करण्यासाठी समाज स्तरावरून प्रयत्न करणे अगत्याचे आहे. या भागातील मुख्य पीक कापूस, तूर, हरभरा व सोयाबीन आहे. या सर्व पिकांच्या अवशेषांचे कंपोस्ट केल्यास (गांडूळ खत नव्हे) सेंद्रिय कर्ब सुधारण्यास उपयोगी पडेल. उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसल्यामुळे गांडूळ खत प्रकल्प बंद पडतात.

या भागात नाल्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जमिनीमधील क्षारांचे निस्तारीकरण करण्यासाठी केलेले भूमिगत स्ट्रक्चरमधून पाण्याचा निचरा करण्यासाठी नाले उपलब्ध नाहीत. तसेच पाणलोट आखणी करताना एक समान बिंदू मिळत नसल्यामुळे काटेकोरपणे पाणलोट आरेखन होत नाही. या परिसरामध्ये तसेच लगतच्या गावामध्ये २० कि.मी. पर्यंत मध्यम आकाराचे टोळ दगड मिळत नाहीत. त्यामुळे भूमिगत उपचार करणे शक्यच नाही असे अनुभवास आले आहे.

अकोट, अंजनगाव, हिवरखेड गावांतील पूर्वी गोड्या पाण्यांच्या विहिरीचे पाणी आता खारवट होत आहे. त्यामुळे क्षारयुक्त (खारेपाणी पट्टा) विस्तारत असण्याची साशंक भिती होत आहे. खारपाण पट्ट्यात सुधारणा करताना दीर्घकालीन विचार करून या भागात उपाययोजना होणे जनहिताचे वाटते. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी देखील स्वतः अशा उपायांची जाणीवपूर्वक अंमलबजावणी करणे हिताचेच आहे. कारण शेतातील माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली तर ती पुन्हा आपल्या शेतात येणार नाही. मातीचा पाऊस पडत नाही हे सदैव लक्षात असावे, त्यामुळे उताराला आडवी पेरणी आणि सरीवरंबा पद्धतच कामी येऊ शकते.

श्री. कुवरसिंह मोहने. सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी, अकोट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com