डॉ. राहुल नवसरे, प्रियंका दिघे
जमिनीचे सपाटीकरण
उंच सखल किंवा अति चढ उताराच्या जमिनीसाठी सपाटीकरण करणे आवश्यक आहे. शेतात उंचवट्यावर पाणी पोहोचत नाही किंवा कमी प्रमाणात पोहोचते व सखल भागात ते वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात साठते. वाजवीपेक्षा जास्त उतार असेल तर वाफ्यात किंवा सऱ्यात दिलेले पाणी उताराच्या दिशेने निघून जाते. सरी किंवा वाफ्यांना पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होते.
क्षार असलेल्या जमिनीत व पाण्याची पातळी ज्या जमिनीत जास्त आहे त्या ठिकाणी पाणी साचू देऊ नये. शेतात साचणारे पावसाचे पाणी उताराच्या दिशेने चारीमध्ये सोडणे गरजेचे आहे. त्यामुळे भारी जमिनीत ०.०५ ते ०.२५ टक्का, मध्यम जमिनीत ०.२० ते ०.४० टक्का व हलक्या रेताड जमिनीत ०.२५ ते ०.३५ टक्का उतार समाधानकारक असतो.
पाणी नियोजन
जमिनीची क्षारता कमी करण्यासाठी व क्षारपड जमिनीची सुधारणा झाल्यानंतर जमिनीत पाण्याची पातळी वाढू नये याकरिता अतिरिक्त पाण्याचा वापर कमी केला पाहिजे. ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचनातून भूगर्भातील खारवट पाण्याचा उपयोग कार्यक्षमरीत्या करता येतो.
पाण्याची प्रत, क्षाराचे प्रमाण, विद्राव्य क्षार २००० मिलिग्रॅम/ लिटर किंवा ३.१२ डेसिसायमन/ मीटरपर्यंत असल्यास ते पाणी ठिबक सिंचनासाठी वापरता येते.
जमिनीची मशागत
जमिनीत खोलवर मशागत केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी मुरण्याची क्षमता वाढते. पृष्ठभागावरील क्षार खोलवर जाण्यास मदत होते.
चोपण किंवा भारी काळ्या जमिनीत सबसॉयलर अवजाराच्या साह्याने खोलवर नांगरणी करता येते.
पिकांची फेरपालट
जमिनीची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने एकच पीक वारंवार न घेता फेरपालट करणे आवश्यक असते. नेहमी आडसाली ऊस लावण्यापेक्षा खरीप हंगामात सोयाबीन, भुईमूग यांसारखी पिके शिवाय ताग, शेवरी यांसारखी हिरवळीची पिके घेतल्यास समस्या कमी होऊ शकते. जमिनीत सतत पीक घ्यावे. जमीन पडीक राहू नये.
ज्या वेळी पीक घेणे शक्य नसेल त्या वेळी बरसीम, लसूण घास, पॅराग्रास लावावे. शिवाय क्षार प्रतिकारक्षम पिकांची निवड करणे फायद्याचे ठरते.
रासायनिक खते
क्षार व चिबड जमिनीतून नत्राचा बऱ्याच प्रमाणात ऱ्हास होतो. त्यासाठी नत्र खताची मात्रा २५ टक्के जास्त देणे फायद्याचे ठरते. त्याशिवाय स्फुरद, लोह व जस्ताची कमतरता जाणवते. त्यासाठी कंपोस्ट खतासोबत रासायनिक खते वापरणे गरजेचे असते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवता येते.
कंपोस्ट कल्चरचा वापर
कंपोस्ट कल्चरचा वापर करून शेतातील पाचट, गव्हाचे काड, भाताचे पिंजर, काडीकचरा वगैरे टाकाऊ सेंद्रिय पदार्थापासून कंपोस्ट खत तयार करावे. या खताचा क्षारपड जमिनीत वापर केल्यामुळे माती कणांची संरचना बदलते आणि हवा, पाणी यांचे प्रमाण प्रमाणशीर होते.
माती परीक्षण
खराब जमिनीचे व्यवस्थापन करण्यापूर्वी या जमिनी कोणत्या प्रकारच्या आहेत त्याची तपासणी करावी. त्यानंतर सुधारणेचे उपाय करावेत. खतांची मात्रासुद्धा माती परीक्षण करून द्यावी.
जमिनी क्षारयुक्त किंवा चोपण होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी
जमिनी सपाट असाव्यात, बांधबंदिस्ती करावी. पाणी साठवून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावेत. जमिनीतून पाण्याची पातळी दोन मीटरच्या खाली ठेवावी. पिकांच्या वाढीसाठी जरुरीप्रमाणेच पाणी द्यावे. विशेषतः ऊस पिकास खत व पाणी योग्य प्रमाणात द्यावे.
आपल्या भागातून कालवा वाहत असल्यास त्यामधून पाणी झिरपू देऊ नये.
जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ व हिरवळीचे खते वापरून मातीची घडण चांगली ठेवावी. त्यामुळे हवा खेळती राहते. जादा पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत होते.
विहिरीचे पाणी जास्त खारवट असल्यास नियमित जमिनीस वापरू नये.
माती व पाणी नेहमी तपासून जमिनीचे भौतिक आणि रासायनिक बदल याबद्दल मृदाशास्त्राज्ञांकडून माहिती मिळवावी.
सूक्ष्म जलसिंचन व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
डॉ. राहुल नवसरे, ८३९०१०४२८४
(मृदा व कृषी रसायन शास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय लोणी, जि. नगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.