Village Story : जिवलग

Rural Story : कलावतीची काहीतरी आठवण आपल्यापाशी असली पाहिजे या विचाराने उचल खाल्ली. आजोरा चाळायला सुरुवात केली. त्यात एक वस्तू गवसली. जमलेल्या लोकांची नजर चुकवून घुंगरू चेमटून गेलेलं एक पैंजण आणि तांब्याचं कडं उचललं.
Village Story
Village StoryAgrowon
Published on
Updated on

समीर गायकवाड

Story : कलावती जेव्हा इथं आली तेव्हा ती पस्तिशीतली प्रौढा असूनही तिच्या देहावरची गोलाई विशीतल्या तरुणीची होती. केवड्याच्या कायेच्या कलावतीचं उफाड्याचं अंग आटीव दुधाच्या गोळ्यागत गच्च होतं. तिच्या घोटीव देहात रसरशीतपणा होता, चेहऱ्यावरती विलक्षण आव्हान असायचं. अरुंद उभट कपाळावर रुळणारी कुरळ्या केसांची महिरप शोभून दिसे. कपाळावरती गोंदलेलं तुळशीचं पान कुंकवाच्या आड दडायचं.

एखाद्या चुकार दिवशी रामपारी न्हायच्या आधी आपले लांबसडक मोकळे केस मोकळे सोडून दारापाशी उभी असली की तिच्या कपाळावरचं गोंदण चित्त वेधून घेई. तिच्या मासुळी पाणीदार डोळ्यांच्या कैदेतून मुक्तता नसायची. डाळिंबी जिवणीआडून मोत्याच्या दंतपंक्ती डोकावत तेव्हा तिनं बोलतच राहावं असं वाटे. मखमली कंबरेला आवळून बांधलेल्या कंबरपट्ट्याची हालचाल होताच लालबुंद झालेले वळ ठसठशीत दिसत.

मांसल दंडावरचे कडदोरे लक्ष वेधून घेत. त्यात एखाद दुसरा काळ्या कपड्यात गुंडाळलेला ताविज लाल धाग्यात बांधलेला असे. तिने मऊशार काळ्याभोर केसांचा सैलसर अंबाडा बांधलेला असला की त्यावर अबोली मोगऱ्याचे अधाशी गजरे वेटोळे घालून बसलेले असत. हातातली बिल्वरे, अंगठ्या तिच्या समृद्धीच्या खुणा होत्या. माशाची नक्षी असलेली जाडजूड जोडवी बोटात इतकी घट्ट रुतलेली असायची, की निघणं अशक्य वाटावं. विशिष्ट लयीत छुमछुमणारी पैंजणं म्हणजे तिच्या चाहुलीची सुरेल खुण होती.

ती अवचित कधी गावातल्या महादेवाच्या मंदिरात भल्या सकाळीच गेली, की लोक आ वासून बघत. चापूनचोपून नेसलेल्या साडीचा पदर डोक्यावरून घेऊन ती नजाकतीनं चाले. ती गेलेल्या वाटंनं अत्तराचा धुंद सुगंध कितीतरी वेळ दरवळे. गावात तिच्या नावानं कंड्या पिकवल्या जात. वावदूक माणसं मिशीवर ताव देत तिच्याविषयीच्या हवेतल्या गप्पांचं गुऱ्हाळ चालवत राहत. गाव दहा तोंडानं काहीही बोलत राहिलं, तरी तिने गावाची कधी पर्वा केली नव्हती.

तिने गावाशी वैरही केलं नव्हतं आणि कुठलं नातंही जोडलं नव्हतं. तिच्या अलिप्त विश्‍वात ती मश्गुल असायची. तिच्या वागण्या-बोलण्यात कधी चवचालपणा जाणवत नसे. चारित्र्याविषयी शंका यावी असं कुठलं ठाशीव लक्षणही तिच्या ठायी नव्हतं. ‘तशा’ बायकांच्या अंगी असतो तसा उठवळपणाही तिच्यात नक्कीच नव्हता.

मात्र पाहता क्षणी चित्त वेधून घेण्याची ताकद तिच्या सौंदर्यात होती. तिच्याकडे लावण्य होतं, अदाकारी होती, गायकी होती आणि जोडीला दिलदारपणाही होता! पाटलांच्या नातवानं- मदननं- तिला इथं आणलं इतकीच माहिती गावाला होती. तीदेखील स्वतःचा इतिहास कधीच कुणाला सांगत नव्हती. त्या विषयावर बोललेलंही तिला आवडत नव्हतं. ती इथं आल्यानंतर काही महिन्यांतच मदन गाव सोडून निघून गेला होता.

Village Story
Village Story : पावसाळी सूर्यफुलं...

मदन निघून गेल्याचं खापर तिच्यावर फोडणं कठीण होतं, कारण तिनं आपल्या सौंदर्याचे फासे कधी कुणावर टाकले नव्हते नि कुणाला जाळ्यातही गुंतवलं नव्हतं. तरीही तिच्या दारी लोकांची वर्दळ असे. त्यातही एक खास बात म्हणजे तिच्याकडे एकदा गेलेला पुरुष पुन्हा पुन्हा तिच्या उंबरठ्यापाशी दिसे. कुणी पैसेवाला गबरगंड असल्यानं त्याला लुबाडावं, कुणी एकदम फटीचर आहे म्हणून त्याला दारातही उभं करून घेऊ नये अशी तिची नियत नव्हती. तिची कदर करणारा हरेक माणूस तिच्या लेखी समान होता.

या सर्वांच्या गर्दीत गणू लक्षात राहण्याजोगा होता. नेर्ल्याचा गणू कायम तिच्या इथं पडीक असायचा. चिलटं, माश्‍या त्याच्या लाळगळत्या तोंडाभोवती घोंघावत राहायच्या, तो मात्र आशाळभूतपणे डोळे अर्धवट मिटलेल्या अवस्थेत बसून राहायचा. आली-गेली माणसं त्याच्याकडून हवी ती खबरबात मिळवत. कोण येऊन गेलं, कधी येऊन गेलं, कलावतीला कुणी काय भेटवस्तू दिली याची सगळी बित्तंबातमी त्याच्याकडे असे. त्या बदल्यात ते त्याला पैसे देत. त्यावर त्याचे श्‍वास सुरू राहत आणि शौकही पुरे होत. त्यानं त्याच्या घरी लेकराबाळांपाशी परत जावं म्हणून कलावतीनं खूप प्रयत्न केले, पण त्यात अपयश आलेलं.

झिपरीचा माळ वगळता बाहेर कलावती क्वचित दिसे. त्यामुळं स्वतःला सभ्य म्हणवून घेणारी मंडळी तिच्या लावण्यकथांवरच आपली तहान भागवत. लोकांमध्ये तिच्याविषयी जशी तिरस्काराची भावना होती, तसंच एक अनामिक आकर्षणही होतं. आलम दुनिया तिच्यावर फिदा होती आणि ती मात्र सोरट्याच्या सुऱ्यावर जीव टाकून होती.

सूर्यकांत सोरटे हा पिळदार ताशीव अंगाचा तरणाबांड कोवळा पोर अन् ही पस्तिशीतली! कसा त्यांचा मेळ बसणार? आखीव-रेखीव बांधणीच्या कलावतीनं भेट दिलेलं जाडजूड तांब्याचं कडं सुऱ्याच्या दणकट हातांत शोभून दिसे. त्यांच्या प्रेमकथेत ट्विस्ट होता. नाकापुढं बघून चालणाऱ्या सुऱ्यापर्यंत कलावतीच्या चिठ्ठ्या कधी पोहोचल्याच नाहीत. जवळपास तीनेक वर्षे कलावती त्याच्यासाठी गळ टाकून होती, पण सुऱ्या काही केल्या तिला गवसला नाही.

गावात बऱ्याच वर्षांपासून अण्णा शेळकेंची एकहाती सत्ता होती. मात्र तब्बल चार दशकांनंतर ग्रामपंचायतीत विरोधकांचे पॅनेल निवडून आले. त्यांनी झिपरीच्या माळावरचे गोरखधंदे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आठवड्यात सगळं सामानसुमान टेम्पोत घालून कलावतीला गाव सोडून परागंदा व्हावं लागलं. सर्कशीतल्या जनावराकडं बघावं तसं लोक तिला न्याहाळत होते, काही नजरेनेच चाटत होते. जाताना देखील तिने सुऱ्यासाठी गण्यापाशी चिठ्ठी दिली. जड मनाने कलावती गाव सोडून गेली. तिच्या जाण्याने माळ ओस पडला. त्यातलं सत्त्व गेलं. लोकांची येजा बंद झाली. तिथं केवळ झाडांची सळसळ, पशु-पक्ष्यांचे आवाज उरले.

Village Story
Village Story : हरवलेली सांज

कलावती गेल्यानंतर महिन्याभराने गण्याची गाठ सुऱ्याशी पडली तेव्हा त्याला चिठ्ठीतून कलावतीचं प्रेम उमगलं. आधीच्या चिठ्ठ्यांचीही माहिती मिळताच तो थक्क झाला. हिरा आपल्या शोधात होता नि आपण अनभिज्ञ होतो ही जाणीव त्याला खाऊ लागली. रोजंदारीनं कामावर जाणारा सुऱ्या आता तिच्या शोधात गावोगाव फिरू लागला, त्यापायी त्याची सगळी कमाई खर्ची पडली. सारखे खाडे होऊ लागल्यानं काम सुटलं.

घरातलं लक्ष कमी झालं, भावांबरोबर भांडणे होऊ लागली. हातातोंडाची गाठ पडेनाशी झाली तरी देखील कलावती काही केल्या त्याच्या डोक्यातून जात नव्हती. अशीच काही वर्षे गेली. दरम्यानच्या काळात छातीचं खोकडं झालेला गण्या मरून गेला आणि त्याची जागा सुऱ्याने घेतली. पाटलांच्या भग्न वाड्यापाशी तो ईळभर फुल्ल होऊन पडून असायचा.

कुठून तरी कलावतीला याची भनक लागली. तिच्या काळजाचं पाणीपाणी झालं. सुऱ्यासाठी तिला परतायचं होतं, पण गावांनं बंदी केलेली होती. तरीही वेषांतर करून ती एका रात्री परतली. ती परतली पण तिचं चैतन्य हरपलेलं होतं, सौंदर्य लोप पावलं होतं. अनेकांनी ओरबाडल्यामुळे तिचं नुसतं चिपाड झालेलं.

ते दोन दिवस त्या दोघांनी स्वर्गसुखात काढले. कलावतीचं तिथं राहणं धोक्याचं होतं. तिला परतणं क्रमप्राप्त होतं. देहाचा पालापाचोळा झालेला सुऱ्या तिच्याविना जगू शकला नसता. तिसऱ्या दिवशी गर्द पहाटे एका रिक्षातून ती त्याला अलगद घेऊन गेली. गावाची जिरवल्याच्या भावनेने ती गेली, पण नियतीने दोघांना चकवलं.

तांबडफुटीच्या वेळेस हायवेवर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्याचा जर्जर देह तिच्या छिन्नविच्छिन्न बाहूत विसावला. दोघांची तगमग थांबली. बातमी गावात पोहोचली. सर्वत्र सुस्कारे निघाले. बेऔलाद कलावतीला जग्गूने अग्नी दिला. सुऱ्याची चिताही तिच्याशेजारीच धडाडून पेटली. त्यांचं हे मिलन कुणी अडवू शकलं नाही.

मागच्या वर्षी झिपरीच्या माळावरचं सगळं रान लेवलिंग करून तिथं प्लॉटिंग केलं गेलं. जेसीबीने वाड्याचे अवशेष पाडले गेले. गावातली नव्या पिढीची पोरं मोबाइलमध्ये शूट करत होती, जुनी माणसं पडल्या चेहऱ्याने उभी होती, नेणती कर्ती सवरती मंडळी मात्र मनातल्या मनात काही ना काही पुटपुटत हजर होती. गावातल्या घराघरांतील बायकांमध्ये दबक्या आवाजात कलावतीची चर्चा होत होती. वाडा भुईसपाट झाला, लगतच कलावतीचं खोपटही आजोऱ्यात जमा झालं. घरी बसून राहू वाटलं नाही म्हणून मीही तिथं गेलो. लोकांचे चेहरे वाचत उभा राहिलो. मनात लाखों भावनांचा कल्लोळ होता.

कलावतीने जीव लावला होता, भाऊ मानलं होतं. तिची काहीतरी आठवण आपल्यापाशी असली पाहिजे या विचाराने उचल खाल्ली. आजोरा चाळायला सुरुवात केली. त्यात एक वस्तू गवसली. जमलेल्या लोकांची नजर चुकवून घुंगरू चेमटून गेलेलं एक पैंजण आणि तांब्याचं कडं उचललं. ते पटकन खिशात घालून झपाझप ढांगा टाकत घरी आलो. जुन्या संदुकीत या चिजा जपून ठेवल्यात. एखाद्या उदास रात्री त्यातून कधी कधी कलावतीचे स्वर कानी पडतात, तर कधी जर्जर सुऱ्या तिच्या आर्त मिठीत दिसतो. लोक म्हणतात झिपरीचा माळ शांत झालाय; पण वास्तव वेगळंय. अजूनही रात्री तिथं कलावतीची मैफल भरते. एकमेकांसाठी झुरणारे जिवलग विभक्त करू नयेत हेच खरं!

समीर गायकवाड ८३८०९७३९७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com