Village Story : माउलीची कृपा

Rural Story : बापूकाकांनी आयुष्यभर इतके कष्ट केले होते, की त्यांचे तळहात कमालीचे खडबडीत झाले होते. कुणी त्यांच्याजवळ गेलं की ते त्याच्या गालावरून हात फिरवत आणि आशीर्वाद देत. त्या स्पर्शात निरागस मायेचं सच्चे प्रेम होतं, ज्यातून मिळणारं चैतन्य अद्‍भुत होतं.
Village Story
Village StoryAgrowon
Published on
Updated on

समीर गायकवाड

एकत्र कुटुंब पद्धतीच्या संस्कारात वाढलेल्या कोरक्यांच्या कुटुंबात गतपिढीत आठ मुलं होती. त्यातलेच एक बापूसाहेब, ज्यांना सगळं गाव बापूकाका म्हणे. काकांचं जगणं खूप काही भव्यदिव्य वा उत्कट नव्हतं. त्यांना जो कुणी भेटेल त्याला कायमचं काळजात सामावून घेणारं कमालीचं मायाळू होतं. गावातल्या छोटेखानी शाळेत इतर सर्व भावंडं शिकली सवरली पण बापूकाकांना मात्र पाटी-पेन्सिलीवर जीव लावता आला नाही. त्यांचा सगळा जीव शेतीवाडीवर. शेतापलीकडच्या माळातलं विश्‍व त्यांच्या प्रतीक्षेत झुरत असावं. कारण वडिलांनी म्हणजे दौलतरावांनी त्यांना शाळेत धाडलं की ते परस्पर तिथून निघून येत असत. कधी शेणाच्या गोवऱ्या थापायला, तर कधी गुरे वळायला जात. बऱ्याचदा ते गुपचुप घरीही निघून येत, चंद्रभागा आईला तिच्या सर्व कामात मदत करत. ही बायकांची कामं आहेत, ती मी का करू असा त्यांचा सवाल नसे. त्यांचा गौरवर्ण शेतात राबून करपला होता. मध्यम अंगचणीचे बापूसाहेब प्रसन्न मुद्रेचे होते. हसरा गोल चेहरा, रुंद कपाळावर विराजलेला अष्टगंध, सदैव पाणी भरून आल्यागत वाटणारे बोलके डोळे, तरतरीत नाक आणि प्रेमळ स्निग्ध आवाज. डोईवर सदैव पांढरी शुभ्र गांधी टोपी, अंगात स्वच्छ नेटकी बंडी आणि त्यावर शुभ्र सदरा असे, धवल स्वच्छ धोतर आणि पायात कातडी काळे बूट. अशा वेशातले बापूकाका गावाचं लाडकं व्यक्तिमत्व होतं.

दौलतराव कोरक्यांच्या शेतात राबणाऱ्या कष्टकरी हातांसाठी भाकरी घेऊन जाण्याचं काम त्यांच्याकडे असे. गावातल्या घरापासून शेतापर्यंतचं अंतर दोन कोसांचं होतं. वाटेत वेशीजवळ मारुतीरायाचं देऊळ लागे, त्याला हात जोडून वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक माणसाची खबरबात घेत डोक्यावरची चुंबळ न हलू देता, त्यावर ठेवलेली उतळी अलगद सांभाळत त्यांची स्वारी पुढे निघे. या उतळीत डझनावारी माणसांचं जेवण असे. त्यातल्या खाद्यपदार्थांची लज्जतच वेगळीच राही. काही अंतर कापून गेल्यानंतर मुंगीच्या धोंड्याला डावं घालून पीरसाहेबचा दर्गा लागत असे. दर्ग्याकडे पाहत पायातले बूट काढून भक्तिभावाने नमस्कार करून झाला की डोक्यावर आलेली उन्हं त्यांची विचारपूस करीत, घामांच्या धारांनी सदरा ओला झालेला असे, रानाच्या दिशेने पाय झपाझप पडत. वाटेने सोबतीस कुणी नसलं, की ‘हरीमुखे म्हणा’चा जप करत ते पुढे गेलेले असत. वाटेनं लागणाऱ्या तुरळक वस्त्यावरची माणसं त्यांची आस्थेनं वाट बघत असत. याचं एक कारण म्हणजे त्यांच्या कंबरेला असणारी पानाची चंची.

Village Story
Village Story : एक मंतरलेली सांजवेळ...

पान हा त्यांचा एकमेव शौक होता. घरचेच दुकान असल्याने त्यांच्या त्या चंचीत सदैव भरपूर हिरवीकंच कोवळी पाने, कळीदार चुना, काताची छोटी पितळी डबी, वजनदार अडकित्ता आणि कच्च्या सुपाऱ्या असत. चंची उघडताच ‘पानगप्पां’ना सुरुवात होई. बेताने देठ खुडत पानावर चुना कात लावला जाई, अडकित्त्याने कर्रकर्र आवाज करत सुपारी कातरली जाई. पानासोबत गप्पाही रंगत. गप्पा उरकल्या की वाटेत लागणाऱ्या नागोबाच्या देवळाला लांबूनच हात जोडून वेग वाढवत ते शेताकडे रवाना होत. कामावरचे गडी आणि खुरपणीला असलेल्या मजूर स्त्रिया एकत्र बसल्याशिवाय ते जेवत नसत. जेवणे होताच पुन्हा पानगप्पा होत. थोड्याशा विश्रांतीनंतर मंडळी पुन्हा कामाला लागत. काकाही त्यांच्याबरोबर काम करत. पत्नी कृष्णामाई शेतात येताच त्यांच्या कामाचा झपाटा वाढे. उन्हे तिरपी झाली की सगळी कष्टकरी मंडळी गावाकडे रवाना होत. तर काकांना प्रतीक्षा असे चरायला गेलेली गुरे परतण्याची.

बापूकाका गोठ्यात येताच सगळी गुरे सावध होत. आपल्या अंगावरून धन्याचा हात फिरावा ही त्यांची आस असे. काकांचा या जित्राबांवर विलक्षण जीव होता. एखादं जनावर आजारी असल्यावर त्यांना घास उतरत नसे. नांगरणीला जुंपलेले बैल वा शेतात वाढलेली भटकी कुत्री असोत त्यांची भाषा काकांना समजे. गायी-म्हशींपुढे आमुण्याची पाटी ठेवून काका मांडीत चरवी घेऊन धार काढायला बसले, की गायींचे तटतटलेले आचळ फुलून येई. भागीरथी गाय तर काकांचा हात अंगी पडल्याशिवाय धारच देत नसे. एखाद्या गायीचं वासरू मेलेलं असलं की तिचं दुध आटू नये म्हणून तेच वासरू पेंढा भरून तिच्या पुढ्यात मांडलं जाई. त्या वासराकडे बघत ती गाय दूध देई आणि त्या वेळी यांच्या डोळ्याला धार लागलेली असे. धारोष्ण दुधाच्या धारांनी चरवी गच्च भरे. हे दृश्य इतके रम्य असे, की अस्ताला जाणारा सूर्यही थबकून रेंगाळे. काकांच्या हातचा धारोष्ण दुधाचा चहा स्वर्गीय आनंदाचा असे. लिंबाची पाने, गवती चहा टाकून मातीने सारवलेले पातेले चुलीवर ठेवले रे ठेवले की चहाचा वास दूरदूरपर्यंत जाई. त्या चवीला काकांच्या मायेचा अनोखा स्पर्श होता.

Village Story
Village Story : चऱ्हाट: रानात तात्यांबरोबर मारलेल्या निवांत गप्पा

शेतातलं खळं वा अवघडलेल्या गायीचं वेत असो वा गोष्ट पीकपाण्याची असो त्यांचे आडाखे अचूक ठरत. शेतात गुऱ्हाळ असलं की भल्यामोठ्या कायलीत उसाचा उकळता रटरटता रस लांबलचक उलथण्याने हलवत असताना मध्येच चुल्हाणाकडे लक्ष देणं, चिपाडाचा ढीग लावणं, कडबाकुट्टी करणं, ज्वारीची काढणी झाल्यावर कडब्याची गंज रचणे अशी कैक कामे ते लीलया करत. ते बांधावरून चालू लागले की पिकं त्यांच्याशी बोलत, त्यांनाही त्यांची भाषा कळे. दंडातून जाणारं पाणी जसे नेमक्या वाफ्यात जाई तसेच त्यांच्या मनातल्या नात्यागोत्यांचं होतं. बैलगाडीचं रूमणं हातात घेऊन त्यांनी त्यांचं बळीराजाचं जिणं मिरवलं नाही पण प्रसंगी चाकाची धाव निघाली तर आपल्या ताकदीवर बैलगाडी जागेवर पेलून धरायची ताकद एके काळी जोपासली होती. अलीकडील काही वर्षांत इंद्रिये थकल्यावर त्यांना परगावी न्यायचे टाळले जाऊ लागले तेव्हा त्यांनी कुणाजवळ हट्ट धरला नाही. पण कुणी बाहेरगावी जाऊन आले की त्याला ते बित्तंबातमी विचारत. अखेरच्या दिवसांत त्यांना शेतात जाता आलं नाही. त्यांचे सगळे लक्ष शेतात लागून असे. हरेक माणसाजवळ ते पीकपाण्याची चौकशी करत, जुन्या गड्यांची नावे घेऊन गतकाळातील आठवणी काढत.

काकांच्या खिशात नोटांनी भरलेले पाकीट नसायचे, पण त्यांच्याकडे आनंदाची जी शिदोरी होती ती कुणाकडेच नव्हती. त्यांना वाचायला लिहायला येत नसले तरी हरिपाठ मुखोद्गत होता. अभंग, गवळणींची त्यांना विशेष आवड होती. त्यांनी आयुष्यात अनेक दुःखं पचवली होती. त्यांच्या दोन मुलींना अकाली वैधव्य प्राप्त झालं, एकुलत्या एक मुलाला दीर्घ काळानंतर झालेलं मूल दगावलं, आयुष्यभर ज्या पत्नीने सुखदुःखाच्या हरेक क्षणात खंबीर साथ दिली, तिने चारेक वर्षांपूर्वी इहलोकीचा प्रवास संपवला, शेतात काही वर्षे दुष्काळ पडला, काळजाला चटका लावणाऱ्या कित्येक घटना घडल्या. पण यावर त्यांनी कधी आक्रस्ताळा शोक व्यक्त केला नाही की ऊर बडवून घेतला नाही. कुणी त्यांना धीर द्यायला गेलं तर त्यालाच ते म्हणत, ‘‘सगळी माउलीची कृपा !"

त्यांच्या अंगी कमालीचा सोशिकपणा होता. अखेरच्या महिन्यात त्यांच्या हालचालींवर काहीशा मर्यादा आल्या असल्या, तरी त्यांची स्मृती शाबूत होती. ते स्वतः आजारी असूनही आल्यागेलेल्यांची विचारपूस करत. अखेरचे दोन-तीन दिवस ते अंथरुणाला खिळून होते तेव्हा कोरक्यांच्या घरात कुणाचाच जीव थाऱ्यावर नव्हता. मागच्या काही खेपेस त्यांनी मृत्यूला चकवा दिला होता. पण या वेळेस त्यांनी सर्वांना चकवले. टाळमृदंगाच्या गजरात त्यांच्या चितेला अग्नी दिल्यानंतर देहातून त्यांचा जीव मुक्त झाला तेव्हा शेताच्या वाटेनं अद्‌भुत प्रकाशाची रेष उमटत गेली, वाटेतली माती शहारली, पानंफुलं थरारली, विहिरीच्या पाण्यावर तरंग उमटले, स्तब्ध झालेली झाडं तरारून गेली, वारा चौफेर उधळला, वस्तीवरल्या घराच्या छपरानं अंग झटकलं, आईवडिलांच्या समाधीशेजारच्या चाफ्याला भरून आलं आणि गोठ्यातल्या गायीम्हशींच्या डोळ्यात चंद्र पाझरू लागला. या चराचराची गळाभेट घेऊन त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला. माणुसकीचा अद्‌भुत अध्याय संपला, कुणापुढेही न मांडल्या गेलेल्या भरजरी दुःख वेदनांच्या भाराने श्रमलेल्या जिवाला शांती लाभली.

बापूकाकांनी आयुष्यभर इतके कष्ट केले होते की त्यांचे तळहात कमालीचे खडबडीत झाले होते. कुणी त्यांच्याजवळ गेलं की ते त्याच्या गालावरून हात फिरवत आणि आशीर्वाद देत. त्या स्पर्शात निरागस मायेचं सच्चे प्रेम होतं, ज्यातून मिळणारं चैतन्य अद्‌भुत होतं. त्यांच्या खडबडीत हातांचा तो स्पर्श लाभावा म्हणून कोरक्यांच्या घरादाराचा जीव व्याकुळ झाला. मात्र त्यासाठी त्यांना झुरावं लागलं नाही कारण शेतात जाताच वाऱ्याच्या झुळकेवर त्या स्पर्शाची पुनरानुभूती येते. ही त्या बापू‘माउलीचीच कृपा’ होय!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com