Pandita Ramabai: स्त्रियांचे भूषण : पंडिता रमाबाई

Women’s Education: पंडिता रमाबाई या स्त्री शिक्षण आणि समाजसुधारणेच्या प्रबळ समर्थक होत्या. त्यांनी विधवा स्त्रियांसाठी शारदा सदन आणि अनेक सामाजिक संस्थांची स्थापना करून महिलांच्या सशक्तीकरणासाठी मोलाचे योगदान दिले.
Pandita Ramabai
Pandita RamabaiAgrowon
Published on
Updated on

सौ. सुरेखा बोऱ्हाडे

Indian History: स्त्री शिक्षण क्षेत्रात पंडिता रमाबाई यांचे कार्य खूप मोलाचे आहे. बाल-विवाह, पुनर्विवाहास बंदी आदी घातक चालीरीती व दुष्ट रूढी यांतून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इ. ठिकाणी ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना केली.

पंडिता रमाबाई यांचा जन्म २३ एप्रिल १८५८ ला कर्नाटक येथील गंगामूळ या ठिकाणी झाला. रमाबाई यांचे वडील प्रख्यात समाजसेवक होते. त्या काळी स्त्रियांना संस्कृत शिकण्याची परवानगी नव्हती. परंतु रमाबाई यांच्या वडिलांनी त्यांना संस्कृत शिकवले. कालांतराने त्यांचे वडील निर्धन झाले व या दुःखात त्यांचे निधन झाले. पुढे भारतात फिरत असता त्या कोलकाता या ठिकाणी पोहोचल्या.

Pandita Ramabai
Success Story: मसाल्याचा सुगंध, यशाचा गंध: ‘अर्चना मसाले’ची कहाणी

भारतीय ज्ञान आणि संस्कृत भाषेमध्ये त्या कुशल होत्या. त्यामुळे त्यांना तेथे पंडिता व सरस्वती अशी उपाधी देण्यात आली. तेथे त्यांच्या विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या आज एकमेव महिला होत. बंगाली स्त्रियांनीही त्यांना ‘भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण’ म्हणून मानपत्र दिले. कोलकाता येथे त्यांचा केशवचंद्र सेन यांच्याशी संबंध आला आणि हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनात काहूर उठले. धर्माविषयी परिवर्तनशील विचार त्यांच्या मनात आले.

१३ ऑक्टोबर १८८० ला पंडिता रमाबाईंनी बापू बिपिन बिहारीदास यांच्याशी विवाह केला. या विवाहामुळे नातेवाइकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. विवाहाच्या अवघ्या दोन वर्षांनंतर त्यांचे पती बापू बिपिन बिहारीदास यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर न्या. म. गो. रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पुण्याला आपली मुलगी मनोरमासह आल्या. ३० एप्रिल १८८३ ला त्या भारतातून इंग्लंडला आपली मुलगी मनोरमा हिच्यासह गेल्या.

पंडिता रमाबाई यांनी ३० सप्टेंबर १८८३ रोजी ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला. रमाबाईंनी येथेच चेल्टनहॅममध्ये शिक्षिकेचे शिक्षण घेतले. १७ फेब्रुवारी १८८६ मध्ये त्या इंग्लंडवरून अमेरिकेस प्रवासास निघाल्या. भारतातील प्रथम महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभात सहभागी होण्यासाठी त्या अमेरिकेत गेल्या. पुढे त्या जपानला गेल्या. चीनमधील हाँगकाँग येथेही पोहोचल्या. तेथून त्या जानेवारी १८८९ मध्ये भारतात परत आल्या.

Pandita Ramabai
Agriculture Success Story: केवळ १२ गुंठ्यात भाजीपाला उत्पादन! सुमनबाईंचा संघर्ष आणि यशाचा प्रवास

शारदा सदनची स्थापना

भारतात आल्यावर त्यांनी स्वतःला स्त्री शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले. यासाठी ११ मार्च १८८९ ला मुंबई या ठिकाणी शारदा सदनची स्थापना केली. हे सदन विधवा महिलांसाठी स्थापन करण्यात आले होते. शारदा सदनमध्ये महिलांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अशा दोन स्वरूपात अभ्यासक्रम उपलब्ध होता. पुढे शारदा सदनचे स्थलांतर पुणे या ठिकाणी करण्यात आले. शारदा सदनच्या पुण्याच्या सल्लागार मंडळात न्या. महादेव गोविंद रानडे व गोपाळहरी देशमुख हे होते.

शारदा सदनच्या दुसऱ्‍या वर्धापनदिनी स्त्री- पुरुष मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षा पंडिता रमाबाई या होत्या. शारदा सदनमधील काही मुलींनी ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला होता, यातूनही बरेच वाद झाले होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १८९३ ला शारदा सदनमधील विधवा गोदुबाई हिच्याशी विवाह करून विधवा पुनर्विवाहाचा एक आदर्श घालून दिला. रमाबाईंनी पुण्यात आर्य महिला समाज स्थापन केले. स्त्रियांची अत्याचारापासून सुरक्षेेसाठी त्यांनी या समाजाची स्थापना केली.

कैसर-ए- हिंद

रमाबाई यांच्या पुण्याला सभा भरत, त्यांची भाषणे ऐकण्यासाठी लोक जमा होत असत. परंतु त्यांनी एक अट ठेवली होती ती म्हणजे माझ्या सभेला येताना पुरुषांनी त्यांच्या पत्नीस किंवा त्यांच्या घरातील कोणत्याही स्त्रीस सोबत आणावे. १८९७ मध्ये रमाबाईंनी मुक्ती सदनची स्थापना केली होती. अंध मुली व स्त्रियांसाठी मुक्ती मिशनमध्ये हा स्वतंत्र विभाग होता. येथे रमाबाईंची मुलगी मनोरमा हिने शिकविण्याचे कार्य केले.

ही भारतातील पहिली अंधांसाठींची शाळा होय. समाजकार्याबरोबरच अनेक विषयांवर सुधारणात्मक, वैचारिक लेखन रमाबाई पंडित यांनी केले. पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनसमोर साक्ष दिली. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये स्त्रियांना सदस्यत्व मिळावे, यासाठी देखील मागणी केली. १८८९ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये देखील त्या सहभागी झाल्या. १९ डिसेंबर १९१९ रोजी ब्रिटिश सरकारने त्यांनी स्त्री शिक्षणाच्या संदर्भात केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘कैसर- ए -हिंद’ ही पदवी दिली. पंडिता रमाबाई यांचा मृत्यू ५ एप्रिल १९२२ रोजी झाला.

९१५८७७४२४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com