Gudi Padwa : पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी

Article by Manisha Ugale : हिंदू नववर्षाचा पहिला मोठा सण म्हणजे गुढीपाडव्याचा! पराक्रमी शालिवाहन राजाने स्वतःच्या नावाचे संवत्सर सुरू केले, त्याच संवत्सराचा हा पहिला दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवशी उभारण्यात येणारी गुढी हे विजयाचे, शौर्याचे आणि समृद्धीचे प्रतीक असते.
Gudi Padwa
Gudi PadwaAgrowon

मनीषा उगले
ugalemm@gmail.com


मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः॥ (गीता १०.३५)
सृष्टीतील स्वतःच्या विभूतीच्या खुणा दाखवताना श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘‘महिन्यांमध्ये मी पवित्र असा मार्गशीर्ष मास आहे तर ऋतूमध्ये सर्वश्रेष्ठ असा कुसुमाकर वसंतही मीच आहे. अशा या ऋतुराज वसंताने सध्या रंगपंचमी खेळायला सुरुवात केलेली आहे. पळस, पांगारा आणि चाफा अंगभर फुलून आले आहेत. सुवर्णवृक्ष बहावा अंगभर हळद लावून बसलाय. त्वेषाने फुललेल्या लालजर्द गुलमोहर आणि नीलमोहराच्या फुलांचे घोस डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.

वड आणि पिंपळासह कितीतरी झाडांच्या अंगभर पोपटी पालवी लवलवताना दिसते आहे. आम्रतरुंवर बाळकैऱ्या वाऱ्याने मजेने झोके घेताहेत. आणि वाऱ्याच्या झुळकेसरशी खाली भिरभिरत येणाऱ्या पिवळसर पांढऱ्या फुलांची चादर कडुनिंबाखाली रोज नव्याने अंथरली जातेय. एखाद्या डौलदार मोराने आपला भव्य पिसारा पूर्णपणे उघडून रंगांची जादू दाखवावी तशी भर उन्हाळ्यात निसर्गाने आपली करामत दाखवायला सुरुवात केली आहे. अशा सृजनाचा संस्पर्श झालेल्या चैतन्यमय वातावरणात हिंदू नववर्षाचा पहिला मोठा सण आज आला आहे तो गुढीपाडव्याचा!

आजच्याच दिवशी चौदा वर्षांचा वनवास संपवून श्रीराम अयोध्येला परत आले होते. त्या दिवशी अवघ्या अयोध्येत आनंद साजरा झाला होता, घराघरांवर गुढ्या शोभायमान झाल्या होत्या. शालिवाहन राजाने मृतप्राय झालेल्या सहा हजार सैनिकांच्या मनांना संजीवनी दिली आणि शकांचा पराभव केला तोही दिवस आजचाच होता. खरे तर शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार करून त्यात प्राण भरला होता, अशी दंतकथा प्रचलित आहे.

पण तिचा शब्दशः अर्थ घेणे योग्य नाही. या पराक्रमी शालिवाहन राजाने स्वतःच्या नावाचे संवत्सर सुरू केले. त्याच संवत्सराचा हा पहिला दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा! या दिवशी उभारण्यात येणारी गुढी हे विजयाचे, शौर्याचे आणि समृद्धीचे प्रतीक असते. ते वाईटावरील चांगल्याच्या, 'असत्'वरील 'सत्'च्या विजयाचेही प्रतीक आहे. भारतीय वा वाङमयातील रामायण, महाभारत, लीळाचरित्र या ग्रंथांतून तसेच संतसाहित्यातूनही गुढीचे उल्लेख केलेले आढळून येतात.

Gudi Padwa
Nanded APMC : हळदीसाठी प्रसिद्ध नांदेडची बाजार समिती

भारतीय लोकसंस्कृतीतील बहुतांश सण हे ऋतुचक्राशी निगडित आहेत. तसेच ते कृषी संस्कृतीशीही संबंधित आहेत. ही लोकसंस्कृती मातृपूजक संस्कृती असून ती अनेक प्रतिमा-प्रतीकांनी समृद्ध झालेली आहे. निसर्गातल्या अमूर्त शक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करताना मानवाला प्रतीकांचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्याद्वारे त्याला आपल्या भावना व्यक्त करता येतात. मानवाच्या सर्जनशील प्रज्ञेतून अभिव्यक्त झालेले असेच एक मनोहारी प्रतीक म्हणजे गुढी.

पाडव्याच्या सणाला घरोघरी उभारली जाणारी ही गुढी मातृपूजेचे प्रतीक आहे. या दिवशी गुढीला स्त्रीस्वरूपा समजून सजवले जाते. तिला भरजरी नववस्त्र नेसवून वरती खण बांधला जातो. तिच्या गळ्यात साखरेच्या गाठींचा दागिना घालण्यात येतो. कडुनिंबाची डाहळी बांधून आणि चाफ्याच्या फुलांची माळ घालण्यात येते. काठीच्या उंच बाजूच्या टोकावर तांब्याचा गडू पालथा घातला जातो. त्यावर कुंकुमतिलक रेखाटला की ही गुढी पाटावर उभी करून तिचे पूजन करण्यात येते.

तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. चाफ्याची फुले आणि नाजूक फुलांनी बहरलेला कडुनिंब ही वंशवृद्धीची, सृजनाची प्रतीके आहेत. कडुनिंबाची पाने रोगनाशक असतात हे तर सर्वज्ञात आहे. धान्यांची साठवण करतानाही त्यात ही पाने घालण्याची पारंपरिक पद्धत आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. एव्हाना रब्बी हंगामाचे धान्य मळणी होऊन घरातल्या कणग्यांत साठवले गेलेले असते. त्याचीही पूजा यावेळी करायची असते.
या दिवशी चैत्रात बहरणारा कडुनिंबाचा मोहोर, खोबरे, हरभऱ्याची डाळ, आंब्याचा मोहोर आणि चिंचा इत्यादींत गूळ घालून केलेली आंबटगोड चटणी आवडीने खाल्ली जाते. एका स्त्रीगीतात म्हटलेय,

Gudi Padwa
Success Story : दर्जेदार फळबाग शेतीचा झाला सन्मान

गुढीपाडव्याला कडुनिंब खाती
आधी कडू मग प्राप्ती अमृताची।।

गुढीपाडव्याचा हा सण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील इतरही राज्यांत साजरा होतो. कर्नाटकात या दिवशी गरम पाण्यात निंबाची पाने टाकून स्नान करण्याला महत्त्व आहे. पश्चिम बंगालमध्ये या दिवशी घरे सजतात ती तांबूसकोवळ्या पानाफुलांनी. घरांसमोर मोठमोठ्या रांगोळ्या घातल्या जातात. दुर्गापाठाचे पठण झाले की तांदळापासून बनवलेल्या पदार्थांच्या मेजवानीवर ताव मारला जातो.

आपल्या कृषी संस्कृतीतील काही सण हे सुफलनविधी आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील आदिवासींचे जे सण चैत्र आणि भाद्रपद महिन्यात येतात, ते सुफलीकरणाशी निगडित आहेत. मध्य प्रदेशातील ठाकूर समाजात चैत्री नवरात्र बसविण्याची प्रथा आहे. पाटावर नवधान्यांच्या राशी मांडून कलशपूजा केली जाते. ही पूजा नऊ दिवस चालते. अखेरच्या दिवशी नऊ कुमारिकांचे पूजन करून प्रसाद वाटायचा असतो.

स्त्री जशी सृजनाची कारक असते, तशी भूमी देखील सृजनकर्ती असते. हे भूमाते, आम्ही पेरलेले बियाणे जोमाने वाढू दे, पीकपाणी भरपूर पिकू दे आणि आम्हाला बरकत येऊ दे अशी मूक प्रार्थनाच जणू या पूजाविधीतून निसर्गाकडे केली जाते. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करायची, नव्या कार्यांचे संकल्प करायचे आणि नवीन वस्त्रे परिधान करायची असतात. सुवर्णखरेदीसाठीही आजच्या दिवशी सराफा बाजारात मोठी झुंबड उडते.

गुढीपाडव्याच्या सणाने वर्षाची होणारी अशी प्रसन्न सुरुवात माणसांना ऊर्जा देणारी असते. सृष्टी जशी आपले जूनेपण टाकून नव्या उन्मेषाने सृजनाच्या या महापर्वाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध झालेली असते, त्याचप्रमाणे आपणही आपली मरगळ झटकून नव्या उत्साहाने जीवनाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हायचे असते.

मांगल्याची उंचच उंच गुढी घरावर दिमाखात मिरवणाऱ्या या सणाची स्त्रीगीतांतून अतिशय लोभस वर्णने आलेली आहेत. साने गुरुजींनी संकलित केलेले पाडव्याच्या सणाचे एक ओवीगीत फार गोड आहे.

पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
वर खण जरिकाठी उषाताईचा
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
चांदीची वर लोटी गोपूबाळाची
गुढी पाडव्याला उंच उभवती
कुळाची कीर्ती जावी दाही दिशा
गुढी पाडव्याला घरोघरी गुढी
पडू दे माझी कुडी देवासाठी

आमच्या कुळाला कीर्ती येऊ दे आणि आमचे मस्तक तुझ्यासारखे अभिमानाने उन्नत राहू दे, हे मागणे आज गुढीपाशी मागायचे असते. कृषी संस्कृतीने आपल्या ओंजळीत टाकलेले मौल्यवान संचित म्हणजे सणउत्सव. या सणांनी मानवी समूहांना समाजपण प्राप्त करून दिले आहे. माणसे आतून बाहेरून जोडली गेली की त्यांना समाजपण लाभते.

त्याने माणसाचे एकाकीपण कमी होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला सणांची उस्तवारी करायला वेळ नसतो, हे खरेच. पण हे सणउत्सव आपण केवळ परंपरेचे देणे म्हणून पुढे न्यायचे नाहीत, तर आनंदी होण्याची, समाज म्हणून स्नेहभावाने एकत्र येण्याची अर्थपूर्ण निमित्ते म्हणून ते जपले आणि साजरे केले पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com