Paddy Crop : पालघर जिल्ह्यात हळवे भातपीक बहरले

Paddy Crop । पालघर जिल्ह्यात हळवे भातपीक बहरले । paddy crop flourished In Palghar district
Paddy Crop
Paddy CropAgrowon
Published on
Updated on

Palghar News : सध्या पालघर जिल्ह्यात गारवा, पाऊस सरींच्या स्वरूपात बरसत असल्याने भात खाचरात आवश्यक तितकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे भातपिकाला चांगले फुटवे आले आहेत. हळवी भातपिके पोटरीत आली असून, लोंब्या तयार होताना दिसत आहेत. गेल्या हंगामापेक्षा यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात भातलागवड झाली आहे. आता पीक चांगलेच बहरत असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

यंदा खरीप हंगामात पावसाने उशिरा सुरुवात केली. त्यानंतर मधल्या काळात पावसाने उसंत घेतल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार भातबियाणे पेरणीचे संकट आले होते. मात्र, पावसाच्या दमदार पुनरागमनामुळे उशीर का होईना; भातबियाणे पेरणीची कामे पूर्ण झाली. लावणीच्या अंतिम टप्प्यात पुन्हा मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने रोपे कुजण्याचे संकट घोंगावत होते. त्यानंतर पावसाने माघार घेतल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भात लावण्याची कामे पूर्ण झाली.

Paddy Crop
Paddy Farming : जुन्नर तालुक्यात भात लागवडीच्या चारसूत्री पद्धतीत वाढ

जिल्ह्यातील शेतकरी आधुनिक विचारसरणीचा असल्याने आणि अनेक वर्षांपासून भातशेती करत असल्याने भातपिकाचे बारकावे याची पूर्णपणे जाणीव आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुरशीजन्य रोग; तसेच अळ्या, किडी यांच्याबाबतीत दक्ष राहावे. बदलत्या निसर्गाच्या लहरींचा अंदाज घेऊन भातशेतीचे नियोजन करावे, असा सल्ला कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्राचे ॲग्रोनॉमिस्ट डॉ. भरत कुशारे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

भात खाचरात खतांचे नियोजन

हेक्‍टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश अशी खतांची शिफारस करण्यात आलेली आहे.

हळव्या जाती : यामध्ये लागवडीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले ५० टक्के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.

गरव्या आणि निमगरव्या जाती : यामध्ये लागवडीच्या वेळी ४० टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी ४० टक्के नत्र आणि २० टक्के नत्र ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

Paddy Crop
Paddy Crop : पावसाच्या सरींनी हिरवी भातपिके डोलू लागली

संकरित जाती : संकरित जातींसाठी हेक्‍टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश या प्रमाणात खतांची शिफारस आहे. लागवडीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले २५ टक्के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि उर्वरित २५ टक्के नत्र लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

सद्यस्थितीत समाधानकारक पाऊस पडत असल्याने भात खाचरात आवश्यक तितका पाणीसाठा आहे. हळवे भातपीक पोटरीत आले असून, दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाच्या उघडीपमुळे आंतर मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. दाणे भरण्याच्या कालावधीत पावसाने साथ दिल्यास यंदा चांगले उत्पादन येऊ शकते. कृषी विभागाचे अधिकारीही भातशेतीच्या क्षेत्राला भेटी देऊन वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत.
- सुनील राजड, शेतकरी, गांगणगाव
सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सप्टेंबरमध्ये देशात सरासरीच्या १०९ टक्के पावसाची शक्यता आहे. मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्टिंग मॉडेलनुसार हंगामाच्या शेवटी ला-निनो परिस्थिती विकसित होण्याची शक्यता अधिक आहे. विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार ५ ते १२ सप्टेंबर आणि १२ ते १९ सप्टेंबरदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
- रिजवाना सय्यद, हवामान शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
भातशेतात बांधबंधिस्ती करून पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. गरज पडल्यास बाहेरील स्रोतातून पाणी द्यावे. विशेषतः हळवी व काही ठिकाणी निम गरव्या भात शेतात पाणी नसल्याने तणांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तिथे कोळपे वापरून किंवा हाताने तण नियंत्रण ठेवावे. सध्या भातलागवड होऊन २५ दिवस झाले असतील, किंवा फुटवा फुटण्याची अवस्था असेल, तिथे नत्र खतांचा दुसरा हप्ता ३५ किलो युरिया प्रतिएकरी द्यावा. जमिनीत ओलावा आवश्यक आहे. सेंद्रिय भातलागवड असेल तर १५ दिवसांनी जीवामृत २०० लिटर प्रतिएकर चार वेळेस द्यावे.
- डॉ. भरत कुशारे, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, डहाणू

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com