डॉ. एस. डी. सावंत, डॉ. इंदू सावंत
Grape Management : सांगली विभागामध्ये कवलापूर, सोनी, मणेराजुरी या भागांमध्ये माणिक चमन, सोनाका, सुपर सोनाका तसेच तत्सम थॉमसन सीडलेसचे क्लोन आहेत. यांचे मणी लांब असतात. अशा द्राक्ष जातींची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. काही दिवसांपूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. बऱ्याच बागा मण्यात पाणी भरलेल्या स्थितीपासून ते तयार होण्याच्या अवस्थेत होत्या.
पावसामुळे घडातील मणी तडकून नुकसान झाले. यातून वाचलेल्या बागेमध्ये मण्यांमध्ये काळे डाग दिसायला लागले. हे डाग वाढत गेले. या डागांमुळे काढणीच्याजवळ असलेल्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उशिराच्या बागांमध्ये हे डाग दिसायला लागले. हे नुकसान थांबविण्यासाठी बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात फवारण्या केल्या.
तरीदेखील नुकसान आणि मण्यांवरील डाग कमी होत नसल्याने आम्ही या विभागात पहाणी दौरा केला. या पाहणीमध्ये गोळा केलेले द्राक्षाचे नमुने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील डॉ. सुजय साहा, डॉ. सोमनाथ होळकर यांनी तपासले. याबाबत झालेल्या चर्चेनंतर समोर आलेल्या गोष्टींचा आढावा पुढीलप्रमाणे...
जास्त नुकसान झालेल्या बागेतील जमिनी काळ्या आहेत. या जमिनीत पावसाचे पाणी जास्त काळ साचते. १५ ते २० दिवसांच्यापूर्वी झालेल्या पावसाची ओल या जमिनीत आजही टिकून आहे. वाय ट्रिलाययेसवरील बागेमध्ये कॅनॉपी जास्त दाट प्रमाणात आहे. द्राक्षांची पाहणी करण्यासाठी दोन ओळीत शिरल्यास एखाद्या बोगद्यामध्ये गेल्यासारखे वाटत होते. आतमध्ये आद्रता जास्त होती. या दोन्ही बाबी पावसानंतर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरल्या.
मण्यावरील डाग बुरशीजन्य आहेत की जिवाणूजन्य हा वादाचा मुद्दा होता. परंतु दोन्ही रोगांसाठी जास्त आर्द्रता हे कारण योग्य आहे. आर्द्रता कमी करण्यासाठी बागेत खेळती हवा असणे आवश्यक आहे. त्यासाठी कॅनॉपी विरळ करणे आवश्यक आहे. दाट कॅनॉपीमध्ये जास्तीच्या फवारणी केल्यामुळे जास्त पाणी जाते.
खेळती हवा नसल्याने कॅनॉपीमध्ये आर्द्रता वाढते, त्यामुळे रोग वाढीस चालना मिळते. मण्यांची लांबी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या संजीवकांचा वापर केला जातो.यामुळे मणी तडकण्याचे प्रमाण वाढते. जास्त आद्रतेमुळे मण्यांवरील रोगांचे प्रमाण वाढते.
बागायतदारांनी काय करावे?
आमच्या पाहणी दौऱ्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली, की प्रामुख्याने २० ते २५ दिवसांपूर्वी जेव्हा पाऊस झाला, त्या वेळी मण्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तोच प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. बागायतदारांनी नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशके, ॲन्टिबायोटिक्स (प्रतिजैविके), थायोफिनेट मिथिल, कार्बेन्डाझिम आदी बुरशीनाशकांची भरपूर फवारणी केलेली आहे. यामुळे बुरशी किंवा जिवाणू दोन्ही नियंत्रित झालेले आहेत. जेथे रोग हळूहळू वाढत आहे तेथे कॅनॉपी, आद्रता आणि संजीवकांचा वापर कमी जास्त झालेला आहे. याकडे बागायतदारांनी लक्ष द्यावे.
जास्त खराब झालेले घड काढून टाकणे, बाकीच्या घडातील खराब मणी काढून फवारणी घेणे चालूच आहे. काढलेले घड, मणी शक्यतो बागेच्या बाहेर पुरून टाकावेत. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव करणाऱ्या घटकांची संख्या बागेत कमी होतील.
उशिराच्या बागांची काळजी घेणे आवश्यक आहे. येत्या २० ते २५ दिवसातील वातावरण जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगांसाठी पोषक नाही. दोन्ही रोगांच्या वाढीसाठी उबदार वातावरण लागते. येत्या काळातील हवामान अंदाज असा आहे की, १५ ते २० दिवस पाऊस नाही, थंडी वाढणार आहे.
या वातावरणात झान्थोमोनास किंवा कोलिटोट्रीकम दोन्ही वाढणार नाहीत. त्यामुळे येत्या काळात ताम्रयुक्त बुरशीनाशक किंवा ॲन्टिबायोटिक्सच्या (प्रतिजैविक) फवारण्या कटाक्षाने टाळाव्यात. अशा जास्त फवारणीमुळे वेली कमकुवत होतात.
थंडीच्या दिवसांत भुरीचा धोका जास्त असतो. उशिराच्या बागांमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी ट्रायाझोल गटातील (हेक्झाकॉनॅझोल किंवा तत्सम) बुरशीनाशकांची फवारणी केल्यास भुरीच्या बरोबरीने कोलिटोट्रिकम देखील नियंत्रणात येईल.
ताम्रयुक्त बुरशीनाशक आणि ॲन्टीबायोटिकचा(प्रतिजैविके) वापर कमी केल्यास ट्रायकोडर्मा, सुडोमोनास किंवा बॅसिलस या जैविक उपायांचा वापर शक्य आहे. अशा प्रकारचे जैविक नियंत्रण भुरीसोबत घडावरील बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य डाग नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरतील.
मण्यांवरील डाग कशामुळे?
बागेमध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या फवारण्या झाल्या आहेत. म्हणूनच शंका येते की, मण्यावरील डाग वापरलेल्या रसायनांच्या विषारीपणामुळे (टॉक्सिसिटी) तर नाहीत ना? पाहणी केल्यावर असे दिसले, की हे डाग विषारीपणामुळे नाहीत. सर्वसाधारणपणे विषारीपणामुळे येणारे डाग घडाच्या बाहेरील भागात ज्या बाजूने फवारणी होते, त्या बाजूला असतात. आम्हाला जास्त डाग घडाच्या आतील भागात दिसले.
मण्यावरील डाग बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य करप्यामुळे आहेत. काळे ठिपके आणि तपकिरी रंगाचे पसरणारे ठिपके या प्रकारचे हे डाग आहेत. दोन्ही प्रकारचे डाग हे एकाच कारणामुळे होऊ शकतात. सुरुवातीला काळे ठिपके दिसतात. नंतर ते वाढून एकत्र झाले, की पसरणारे तपकिरी डाग.
रोगाने एकदा पेशी मृत पावल्या, की त्यानंतर त्यावर सायप्रोफायटिक बुरशी किंवा जिवाणू वाढू शकतात. त्यामुळे रोगकारक घटक कोणता आणि सायप्रोफायटिक सूक्ष्मजीव कोणता हे ठरविणे सोपे नाही. प्रयोगशाळेत त्यांना शास्त्रीय पद्धतीने कल्चर करून ठरविणे योग्य आहे. सूक्ष्म लक्षणे आणि फवारणीपासून मिळणारे नियंत्रण यावरून प्राथमिक अंदाज काढता येतो. परंतु लक्षणे एकसारखी किंवा मिश्र लागण असले तर शंका वाढते.
कॅनॉपीमध्ये द्राक्षावरील बुरशीजन्य करपा हा कोलिट्रोटिकम बुरशीमुळे होते. तर जिवाणूजन्य करपा हा झान्थोमोनास या जिवाणूमुळे होतो. हे दोन्ही सूक्ष्मजीव प्रयोगशाळेत घडावरून कल्चर केले गेले आहेत. त्यामुळे शंका वाढल्या आहेत. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये पाठविलेल्या द्राक्ष नमुन्यावरील सूक्ष्म जिवांचे परिक्षण करण्यात आले. त्यामध्ये जिवाणू आणि बुरशी आढळली आहे.
कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.
मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.
- डॉ.एस.डी.सावंत, ९३७१००८६४९
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.