Vegetable Production : भाजीपाला उत्पादनातील अन्य संधी

Vegetable Farming : शेतकरीही बीजोत्पादन करू शकतो. मात्र त्‍याची प्रक्रिया, प्रतवारी, वितरण, विक्री व्‍यवस्‍था, साठवण या सर्व बाबी त्या शेतकऱ्याला कराव्या लागतात.
Vegetable Production
Vegetable ProductionAgrowon
Published on
Updated on

डॉ. अरविंद सोनकांबळे, डॉ. सोनाली वानखडे

भाग ३

Indian Agriculture :

बीजोत्पादन :

भाजीपाल्याचे बियाणे उत्पादित करण्याचा व्यवसायही मोठा आहे. त्यासाठी बियाणे कायद्यातील कलम ९ अनुसार कोणत्‍याही शेतकऱ्याला बीजोत्‍पादन क्षेत्राची नोंदणी करता येते. पेरणीनंतर १५ दिवसांत बीजोत्‍पादन क्षेत्राची नोंदणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे करावी लागते. त्यासाठी विहित नमुन्‍यात अर्ज भरून तो नोंदणी शुल्‍कासह जिल्‍हा बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याकडे रीतसर सादर करावा लागतो. या स्वतः शेतकरीही बीजोत्पादन करू शकतो.

मात्र त्‍याची प्रक्रिया, प्रतवारी, वितरण, विक्री व्‍यवस्‍था, साठवण या सर्व बाबी त्या शेतकऱ्याला कराव्या लागतात. या सर्वांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यास शेतकऱ्यांनी राज्‍य बियाणे महामंडळ, राष्‍ट्रीय बियाणे मंडळ किंवा खासगी बियाणे कंपन्‍यांकडे नोंदणी करावी लागते. विविध कंपन्या सातत्याने नवीन वाण विकसित करत असतात. त्यांनाही सर्व प्रमाणकांचे पालन करून उत्तम प्रकारे बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची आवश्यकता असते. अशा कंपन्यांशी संपर्क साधून नियमाप्रमाणे बीजोत्पादन करणे शक्य आहे. बीजोत्पादनातून अधिक फायदा होतो.

परदेशी भाज्यांची लागवड :

अलीकडे मोठ्या शहरात परदेशी भाज्यांची मागणी वाढत आहे. मोठमोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सकडून परदेशी भाज्यांना नियमित मागणी असते. मात्र लागवडीपूर्वीच या मागणीचा व्यवस्थित अंदाज घेणे आवश्यक आहे. कारण स्थानिक बाजारपेठेमध्ये अद्याप लोकांकडून या भाज्या स्वीकारल्या जातीलच असे नाही. सर्व बाबी जाणून घेऊनच लेट्यूस, झुकिनी, ब्रोकोली, चायनीज कॅबेज, ॲस्परागस, सेज, सबर्ब, आर्टिचोक, टर्निप, स्वीट कॉर्न, लिक, पार्सेली यांसारख्या परदेशी भाज्यांची लागवडीचे नियोजन करावे.

Vegetable Production
Forest Vegetable : बखर रानभाज्यांची : समृद्ध करणारा प्रवास

रानभाज्यांची लागवड

वास्तविक पाहता फारशी निगा न राखता नैसर्गिकरीत्या उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर रानावनात, माळरानावर, शेताच्या बांधावर या भाज्या वाढलेल्या दिसून येतात. या भाज्यांमध्ये लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे विपुल प्रमाणात असल्याने त्या आरोग्यासाठी उपयुक्त समजल्या जातात. आघाडा, माळा, कर्डू, दवणा, काटेसावर, टाकळा, आंबाडी, भोकर, वागोटी, भोवरी, काटेमाथ, गुडवेल, फांजीरा, हदगा या प्रकारच्या २५ हून अधिक भाज्या सापडतात. आपल्या परिसरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांकडून मागणी असलेल्या भाज्यांच्या लागवडीचेही नियोजन करता येते. महाराष्ट्र शासनही अशा रानभाज्यांच्या लागवडीस प्रोत्साहन देते.

सेंद्रिय शेती

रोजच्या दैनंदिन आहारामध्ये भाजीपाल्याचा समावेश असतो. त्यामध्ये रासायनिक कीडनाशकांचे अंश आढळू नयेत, म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे पूर्णपणे रासायनिक खते किंवा कीडनाशकांच्या वापराविना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याची शेती हाही पर्याय शेतकऱ्यांसमोर खुला आहे. सेंद्रिय भाजीपाल्याच्या थेट विक्रीचा पर्याय तपासून पाहावा. योग्य दर आणि विक्रीची व्यवस्था असल्यास सेंद्रिय शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. ग्राहकांसाठी तो आरोग्यदायी पर्याय ठरतो.

भाजीपाला पिकांमध्ये सुधारित व आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक तत्त्वावर भाजीपाला पिकांची लागवड करण्यास चांगला वाव व भरपूर संधी उपलब्ध आहेत..

Vegetable Production
Vegetable Farming : व्यावसायिक भाजीपाला लागवडीचे नियोजन

भाजीपाला निर्यात

ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थाच्या निर्यातीस मोठा वाव आहे. सध्या निर्यात होणाऱ्या भाज्यांमध्ये बटाटा, लसूण, कांदा, काकडी, हिरवी मिरची, मुळा, भोपळा, कारले, भंडी, कोबी व फ्लॉवर यांचा समावेश होतो.

भाज्या आयात करणाऱ्या देशांमध्ये युरोपातील देश, सौदी अरेबिया, कुवेत, इराक आणि आखाती देशांचा समावेश होतो. भाजीपाला निर्यातीसाठी देशनिहाय वेगवेगळे मापदंड आहेत. त्यानुसार सर्व निकषांचे पालन करून उत्पादनाचे नियोजन करावे लागते.

निर्यातीसाठी पिकांचे गुणवत्ता मानांक

भेंडी : फळे नाजूक व रंग हिरवा, कोवळी लुसलुशीत ६ ते ७ सें.मी. लांब, साठवणीस योग्य, एकसारख्या आकाराची, डागविरहित, कोणत्याही प्रकारची इजा झालेली नसावी.

मिरची : गर्द हिरव्या रंगाची, तिखट, साठवणीस योग्य, फळाचा आकार एकसारखा असावा. मिरची ६ ते ७ सें.मी. लांब असावी.

कारले : रंग हिरवा, २५ ते ३० सें.मी. लांबीची असावी. मान बारीक असावी. हिरवी काटेरी असल्यास अधिक चांगले.

गवार : हिरव्या रंगाची ७ ते १० सें.मी. लांब असावी आणि कोवळी लुसलुशीत असावी. बी धरलेली असू नये.

दुधी भोपळा : २५ ते ३० सें.मी. लांबीचा, दंड गोलाकार, ड्रमच्या आकाराचा आणि फिकट हिरव्या रंगाचा असावा.

टोमॅटो : गोल, मध्यम आकाराचे अगर अंडाकृती असावे. रंगाने लालसर, पूर्ण पिकण्याच्या अगोदरची अवस्था, तसेच वरची साल सुरकुतलेली नसावी तर तजेलदार आकर्षक असावी. टोमॅटोचे फळ डागविरहित असावे.

कांदा : मोठा आणि लहान अशा दोन्ही आकारांच्या कांद्याची निर्यात करता येते. मोठ्या कांद्याचा आकार ४ ते ६ सें.मी. असावा. गडद ते फिकट लाल रंग, गोलाकार, तिखट. अगदी लहान कांद्यास म्हणजे २ ते ३ सें.मी. आकार. लाल रंगाच्या गोलाकार कांद्यास खूप देशांतून मागणी आहे.

लसूण : गोलाकार, पांढऱ्या रंगाचा ५ सें.मी. व्यासापेक्षा मोठा आकार, मोठी पाकळी, एका गड्ड्यात १० ते १५ पाकळ्या असाव्यात.

बटाटा : ४.५ ते ६.० सें.मी. आकाराचा पांढरट अंडाकृती असावा. वरची साल आकर्षक असावी.

शेवगा : शेंगा ५० ते ६० सें.मी. लांबीच्या व गरयुक्त असाव्यात तसेच एकसारख्या जाडीच्या आणि लांबीच्या असाव्यात.

कलिंगड : २ ते ३ किलोची, आतील गर लाल, कमी बियांची फळे असावीत.

डॉ. अरविंद सोनकांबळे, ९६५७७ २५८५७

(भाजीपाला शास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com