
गहिनीनाथ ढवळे
सेंद्रिय कर्बामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा होऊन जमिनीचे आरोग्य चांगले राहते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्नद्रव्य सेंद्रिय स्वरूपात घेत नाहीत. ज्या वेळी सूक्ष्मजिवांकडून सेंद्रिय घटकांचे विघटन होते, त्यानंतरच असेंद्रिय (रासायनिक) स्वरूपात सर्व अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
आपल्याला पिढ्यान्पिढ्या जमिनीच्या माध्यमातून अधिकाधिक पीक उत्पादन घ्यावे लागते. म्हणूनच जमिनीची चिरस्थायी उत्पादकता नियंत्रित ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्बाच्या योग्य व्यवस्थापनास महत्त्व आहे. ३) राज्यातील माती परीक्षण अहवालाचा तुलनात्मकदृष्ट्या अभ्यासावरून असे आढळले की सेंद्रिय कर्ब, एकूण नत्र, उपलब्ध स्फुरद आणि उपलब्ध पालाशचे जमिनीतील प्रमाण कमी झाले आहे. याचाच अर्थ असा की सेंद्रिय कर्बाचा प्रत्यक्ष परिणाम उपलब्ध नत्र आणि उपलब्ध स्फुरदाच्या साठ्यावर आणि अप्रत्यक्षरीत्या उपलब्ध पालाशच्या प्रमाणावर झाला आहे
कोणत्याही पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी हवामान, जमीन, पाणी, रोग, कीड आणि पीक व्यवस्थापन यांची सांगड व्यवस्थित घालावी लागते. यातील हवामान, पाण्याची उपलब्धता, रोग आणि कीड यांचा निसर्गाशी थेट संबंध असून, त्वरित त्याचे परिणाम दिसतात. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. तुलनेने जमिनीच्या आरोग्याकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. आपल्या शेतीतून शाश्वत उत्पादन मिळवायचे असेल तर जमिनीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे.
जमिनीची सुपीकता
जमिनीची सुपीकता म्हणजे त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण) आणि उत्पादकता म्हणजे पिकाचे मिळणारे उत्पादन. या दोन वेगळ्या बाबी आहेत. सुपीकतेचा आणि उत्पन्नाचा सरळ संबंध आहे. जमिनीच्या सुपीकतेचे जैविक, भौतिक आणि रासायनिक असे तीन प्रकार पडतात.
जैविक सुपीकता ः जमिनीत असणारे उपयुक्त जिवाणू. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या जितकी जास्त तितकी जमीन सुपीक असे मानले जाते.
भौतिक सुपीकता ः जमिनीत असणारी मोकळी हवा, जमिनीची जलधारणा क्षमता, निचरा यांचा समावेश होतो. पिकांच्या मुळांच्या निरोगी आणि भरघोस वाढीसाठी हे गुणधर्म महत्त्वाचे आहेत.
रासायनिक सुपीकता ः पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांची उपलब्धता समजते. माती परीक्षणानंतर आपल्या जमिनीचा सामू, क्षारांचे प्रमाण, उपलब्ध अन्नद्रव्ये किती हे कळते. उपलब्ध अन्नद्रव्यांमध्ये मुख्य, दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्ये हे त्यांच्या पिकासाठी आवश्यकतेनुसार ठरतात. त्याच प्रमाणे जमिनीतील सेंद्रिय कर्ब, मुक्त चुना यांची माहिती मिळते.
आपल्या पिकाच्या उत्तम उत्पादकतेसाठी वरील तिन्ही प्रकारच्या सुपीकता जमिनीमध्ये असल्या पाहिजेत. या तिन्ही सुपीकता उत्तम ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण. सेंद्रिय कर्ब हा शाश्वत शेतीचा गाभा आहे.
सेंद्रिय कर्बाचे फायदे
जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते. घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणातील पोकळी वाढते. परिणामी जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो.
मातीची धूप कमी होते. मातीची जडणघडण सुधारते. रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते.
नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो. रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो.
स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी स्फुरदाची उपलब्धता वाढते.
जमिनीचा सामू उदासीन (६.५ ते ७.५) ठेवण्यास मदत होते. आयन विनिमय क्षमता वाढते.
चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.
जमिनीची आघात प्रतिबंधक क्षमता वाढते.
सेंद्रिय कर्बाच्या जमिनीतील अस्तित्वामुळे सूक्ष्मजीव व जिवाणूंचा जननक्रियेस गती प्राप्त होते. जैविक संख्येत वाढ होते.
जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंना सेंद्रिय कर्बाद्वारे ऊर्जा पुरवली जाते. जिवाणूंची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
सेंद्रिय कर्बामुळे विकरांचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो. उदा. युरिएज सेल्युलोज.
सेंद्रिय कर्ब वाढविण्याच्या उपाययोजना
जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरेसा पुरवठा करणे हा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा योग्य उपाय आहे. उदा. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, कोंबडी खत, प्रेसमड केक, प्रेसमड केकचे कंपोस्ट, हिरवळीची पिके, अखाद्य पेंडी (निंबोळी पेंड, करंज पेंड, सरकी पेंड)
पिकांच्या संतुलित पोषणासाठी , वाढीव उत्पादनासाठी आणि त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य सातत्याने टिकून राहण्यासाठी प्रामुख्याने संतुलित खतांचा वापर केला पाहिजे.
एक सेंद्रिय खत उपलब्ध नसेल, दुसऱ्या सेंद्रिय खतांचाच पर्याय योग्य ठरतो. उदा. उसाचे पाचट न जाळता शेतातच कुजवणे. पिकांची फेरपालट करून नत्र स्थिरीकरण करणारी पिके घेणे.
हिरवळीच्या पिकांचा (उदा. ताग, धैंचा, चवळी इ.) सेंद्रिय कर्ब वाढण्यास खूप फायदा होतो. पीक पद्धतीत या पिकांचा आवर्जून समावेश करावा. योग्य वेळी ही खते जमिनीत गाडावीत. पीक पद्धतीमध्ये एकच पीक सातत्याने घेऊ नये. त्यात वेळोवेळी बदल करावेत. पिकाची फेरपालट केली गेली पाहिजे.
सेंद्रिय कर्ब जमिनीच्या वरच्या थरात अधिक असून, या थराची धूप होणार नाही, याची काळजी घ्यावी. कमीत कमी नांगरट करावी. बांधबंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करावी.
- गहिनीनाथ ढवळे, ९५५२५१८३२१
(लेखक महाधन ॲग्रीटेक लि. पुणे येथे सरव्यवस्थापक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.