
Soil Health : गेल्या काही दशकांपासून सातत्याने हवामानामध्ये बदल होत आहे. पृथ्वीच्या तापमानात देखील वाढ होत आहे. यासाठी मुख्यत्वे वातावरणात निर्माण होणारे हानिकारक हरितगृह वायू जसे की कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड हे जबाबदार असल्याचे मानले जाते. नैसर्गिक संसाधनांचे अत्याधिक शोषण, वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, वाहतूक आदी कारणांमुळे अनेक हानिकारक हरितगृहवायूंची निर्मिती होते.
हरितगृह वायू उत्सर्जनात कृषी क्षेत्राचा देखील मोठा वाटा आहे. शेतीमधील तीव्र मशागत, पिकांचे अवशेष जाळणे, खत व कीटकनाशकांचा अतिवापर तसेच पशुपालन हे कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन यांसारख्या हरितगृह वायूंचे प्रमुख स्रोत आहेत. हे वायू वातावरणात मिसळल्याने हवामान बदल आणि पृथ्वीचे तापमान वाढत आहे.
कर्ब संचयन
कर्ब संचयन म्हणजे वातावरणात उपलब्ध असलेल्या कर्ब किंवा कार्बन जमिनीत दीर्घकाळासाठी साठवून ठेवणे होय. या प्रक्रियेमध्ये जमिनीमध्ये आणि जमिनीवर कर्बाचे प्रमाण विविध स्रोतांमधून वाढविले जाते.
यामुळे शेत जमिनीतून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनचे प्रमाण कमी करण्यात मदत होते. जमिनीत कर्बाचा साठा केल्याने जमिनीचे आरोग्य सुधारते. हरितगृह वायूमुळे होणाऱ्या तापमान वाढीत घट होते. शेत जमिनीतील कर्ब संचयन वाढविणाऱ्या पिकांमध्ये प्रामुख्याने भात, गहू, ऊस आणि बांबू या पिकांचा समावेश होतो.
कर्ब संचयनाचे फायदे
कर्ब संचयनामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.
मातीतील कर्ब संचयनामुळे जमिनीची उत्पादकता वाढते.
मातीतील कर्ब संचयनामुळे खराब झालेल्या जमिनीचे पुनर्वसन होण्यास मदत होते.
जमिनीचे आरोग्य सुधारते.
मातीमध्ये कर्ब संचयन केल्याने वातावरणातील कार्बन डायऑक्साइड सारख्या हानिकारक हरितगृहांचे प्रमाण कमी होते.
कर्ब संचयनामुळे पीक उत्पादनात वाढ होते, खतासाठी होणारा खर्च कमी होतो. जमिनीची सुपीकता वाढीस लागते. जमिनीचे गुणधर्म सुधारतात.
जमिनीतील कर्ब संचय वाढवण्यासाठी व्यवस्थापन
जमिनीमधील कर्ब संचय वाढविण्यासाठी सुधारित कृषी व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. कर्ब कमी झालेल्या जमिनीमध्ये पारंपरिक पद्धतीऐवजी विविध सुधारित शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब केल्यास मातीतील कर्बाचे प्रमाण सुधारण्यास मदत होते.
शून्य मशागत
यंत्रांच्या साह्याने जमिनीची खोल मशागत केल्याने पोत खराब होतो. त्यासोबत जमिनीत असलेल्या कर्बाचा साठा नष्ट होतो.
नांगरणी पूर्णपणे टाळून किंवा शून्य मशागतीचा अवलंब केल्यास जमिनीतील कर्बाचे रक्षण होण्यास मदत होते. शून्य मशागतीमुळे जीवाश्म इंधनाचा वापर देखील कमी होतो. कार्बन डायऑक्साईड सारखे हानिकारक हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होते.
आंतरपिके,पीक पद्धतीत बदल
सातत्याने एकाच पिकाची लागवड केल्याने जमिनीतील जैवविविधतेत घट होते. म्हणून पीक पद्धतीत प्रत्येक वर्षी बदल करावा. त्यामुळे जमिनीमध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. पीक पद्धतीत बदल केल्यास जमिनीमध्ये असणाऱ्या कर्बाचे प्रमाण टिकून राहते.
उदा. ऊस + सोयाबीन, ऊस + सूर्यफूल, ऊस + कडधान्ये (हरभरा, मूग, चवळी)
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
युरिया, अमोनियम नायट्रेट यांसारख्या रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे अर्सेनिक, पारा यांसारखे हानिकारक धातू आणि कार्बन डायऑक्साइड सारखे हरितगृह वायू वातावरणात मिसळतात. त्यामुळे रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
शेणखत, गांडूळ खत अशा सेंद्रिय खतांचा वापर करावा. यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये वाढ होते. अझोस्पिरीला, मायकोरिइझा, ॲसिटोबॅक्टर, जिवामृत, निंबोळी पेंड यांसारख्या जैव खतांच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, त्याचबरोबर अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास देखील मदत होते.
ताग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या खतांमुळे जमिनीतील कर्ब संचयनात वाढ होते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. हिरवळीच्या पिकांमुळे जमिनीवर आच्छादन तयार होऊन तापमान नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
पाणी व्यवस्थापन
जमिनीमध्ये कर्ब संचयनाचे प्रमाण वाढवण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
ऊस पाचट किंवा गहू, भात यांसारख्या पिकांच्या अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर केल्याने ओलावा टिकून राहतो. ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी दिल्यास पाण्याची बचत होते. जमिनीचे धूप कमी होते. योग्य पाणी व्यवस्थापन केल्याने जमिनीतील कर्बाचा संचय आणि पिकांचे उत्पादन वाढते.
पीक अवशेष व्यवस्थापन
जमिनीमधील कर्ब संचयन वाढविण्यासाठी ऊस, भात, गहू यांसारख्या पिकांच्या अवशेषांचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. बहुतांश जण पीक अवशेषांचे योग्य व्यवस्थापन न करता ते अवशेष जाळतात. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळतो.
पिकांचे अवशेष जाळल्याने जमिनीतील सूक्ष्मजिवांवर परिणाम होतो. जमिनीतील पोषणतत्त्वे नष्ट होतात. पिकांचे अवशेष न जाळता ते मातीत गाडल्यास जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, कर्बाचे प्रमाण वाढते.
कार्बन क्रेडिटच्या अभ्यासाची गरज
जमिनीतील कर्ब संचयन वाढविण्यासाठी योग्य कृषी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्याने जमिनीचे आरोग्य सुधारते. शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्बन क्रेडिटकडे एक महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जात आहे.
एक कार्बन क्रेडिट म्हणजे एक टन कार्बनचे उत्सर्जन. एखाद्या देशातील उद्योगांनी मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन केल्यास आणि त्यानंतरही जर संबंधित कंपनीला आपले कार्य सुरू ठेवायचे असल्यास त्या देशाला इतर देशांकडून कार्बन क्रेडिटची खरेदी करावी लागते. शेतकरी विविध कृषी व्यवस्थापन पद्धतीच्या साह्याने वातावरणातील कर्ब शेतजमिनीत साठवून नंतर ते कार्बन क्रेडिटच्या स्वरूपात वेगवेगळ्या कंपन्यांना विकू शकतात.
सुधारित कृषी व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्याने जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत
होते. तसेच शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटद्वारे अतिरिक्त उत्पन्नदेखील मिळेल. शेतकरी या व्यवस्थापन पद्धतींचे पालन करत असले तरीही त्यांना शेतीतील कार्बन फूटप्रिंट, कर्ब संचयन, सुधारित व्यवस्थापन पद्धतीचा कार्यक्षम वापर आणि शेतजमिनीतील कर्ब संचयनाचे फायदे याबद्दल जागृत करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, मृदा आरोग्य कार्ड योजना याचबरोबरीने कार्बन क्रेडिट
ट्रेडिंग योजना जमिनीतील कर्ब संचय वाढवण्यासाठी नियोजनात आहे. ग्रामीण शेतकरी, तरुणांसाठी ही उद्योजकतेची संधी म्हणता येईल. या संधीचा फायदा घेण्यासाठी
शेतकऱ्यांमध्ये कर्ब संचयन आणि कार्बन क्रेडिट मार्केट याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
- प्रणाली कुलकर्णी, ९१४६४७८७३१
- डॉ. मिलिंद अहिरे, ७५८८५१३३४१
(कृषी विस्तार शिक्षण विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.