
Residue-Free Farming : अलीकडील काळात सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त शेतीवर अनेक शेतकऱ्यांनी भर दिला असून सेंद्रिय, जैविक निविष्ठांचा वापर त्यादृष्टीने वाढला आहे. त्याचबरोबर रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरामुळे मातीची सुपीकता घटली आहे. तर रासायनिक कीडनाशकांच्या बेसुमार वापरामुळे पर्यावरणाचीही हानी होत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे.
या केंद्रामार्फंत विविध जिवाणू खते (संवर्धके) तसेच ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक व अन्य काही उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. विभागाच्या प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शक, फर्मेंटर, आयसोलेशन चेंबर, शीतगृह, सीफयू (कॉलनी काउंटर), पॅकिंग हाउस व अन्य आवश्यक साहित्य-सामग्रीसह वनस्पती रोगशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञही कार्यरत आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, माजी विभाग प्रमुख डॉ. ए. एन. पसलावार यांचे मार्गदर्शन या विभागाला मिळत आहे. विभाग प्रमुख तथा प्रमुख शास्त्रज्ञ अनिता चोरे, वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. योगेश इंगळे, कृषी विद्याशाखेचे सहायक प्राध्यापक डॉ. परिक्षित शिंगरूप अशी तज्ज्ञ मंडळी येथे कार्यरत आहेत.
विद्यापीठाची काही उत्पादने
रायझोबियम - हे जिवाणू सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करून पिकास मिळवून देतात. विशेषतः डाळवर्गीय हरभरा, उडीद, मूग, तूर, उडीद, सोयाबीन आदी पिकांसाठी हे जिवाणू संवर्धक फायदेशीर आहे.
अॅझोस्पिरिलम - सहयोगी सहजीही पद्धतीने नत्र स्थिरीकरण करणारे हे जिवाणू आहेत. धान (भात), मका, ऊस, भाजीपाला, फळे व फूल पिकांसाठी ते फायदेशीर आहेत.
अॅझोटोबॅक्टर - असहजीवी पद्धतीने हे जिवाणू नत्राचे स्थिरीकरण करतात. तृणधान्य, भाजीपाला, फळे, फूल पिके आदींमध्ये वापर करता येतो.
फोस्फोबॅक्टर - पीएसबी (PSB)- मातीतील अविद्राव्य स्फुरद पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम हे जिवाणू करतात. सर्व प्रकारच्या पिकांमध्ये त्याचा उपयोग होतो.
पालाश विद्रावक जिवाणू (KSB)- पिकाला पालाश (पोटॅशिअम) उपलब्ध करून देणारा हा जिवाणू आहे. भाजीपाला, फळबागा, तृणधान्य आदी विविध पिकांमध्ये वापर करता येतो.
एनपीके कॉन्सॉरशिया- (नत्र, स्फुरद व पालाश- एकत्रित जिवाणू)
ॲझोटोबॅक्टर, पीएसबी व केएसबी यांचे मिश्रण.
ट्रायकोडर्मा- जैविक बुरशीनाशक
माफक किमतीत उत्पादने
विद्यापीठाचे आपल्या प्रक्षेत्रात कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र (ATIC) कार्यरत आहे. त्या ठिकाणी शेतकरी स्वतः येऊन उत्पादने खरेदी करतात. विद्यापीठामार्फत पूर्वमॉन्सून मेळावा, शिवार फेरी, ॲग्रोटेक प्रदर्शन आदींचे आयोजन दरवर्षी होते. अशा कार्यक्रमांसह आकाशवाणी केंद्रावरूनही उत्पादनांचा प्रसार करण्यात येतो. कृषी विद्यापीठाने अत्यंत माफक दरांत सर्व उत्पादने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली आहेत.
जिवाणू खते पावडर स्वरूपात प्रति किलो १०० रुपये, तर द्रवरूप स्वरूपात २०० रुपये, तर ट्रायकोडर्मा पावडर स्वरूपात १५० रुपये तर द्रवरूप रूपात २०० रुपये असे दर आहेत. दरवर्षी जैविक खतांची दोन हजार लिटरपेक्षा अधिक, तर ट्रायकोडर्माची पाच हजार लिटरपेक्षा अधिक निर्मिती व विक्री केली जाते.
सन २०२०-२१ मध्ये तीनशेपर्यंत शेतकऱ्यांना उत्पादनांची विक्री झाली होती. दरवर्षी त्यात वाढ होत
सन २०२३-२४ मध्ये २७०० तर २०२४-२५ मध्ये ३२०० शेतकऱ्यांना उत्पादनांची विक्री झाली आहे.
डॉ. योगेश इंगळे ९४२२७६६४३७ (वनस्पती रोगशास्त्र विभाग)
डॉ. परिक्षित शिंगरूप ७५८८९६२२१५ (कृषी विद्याशाखा विभाग)
शेतकऱ्यांचे अनुभव
चांदूर (ता. जि. अकोला) येथील संदीप लांगोटे यांनी खरिपात सव्वादोन एकरांतील कांदा पिकाचे नियोजन केले होते. कांदा वाढीला लागला त्या वेळी तो पिवळसर पडत होता. रोपे वाळत होती. त्यांनी कृषी विद्यापीठाशी संपर्क साधला. त्यानुसार पिकाला दोन ते तीन वेळा एनपीके कॉन्सॉरशिया, ट्रायकोडर्मा यांचा वापर आळवणी, तुषार सिंचन यांच्याद्वारे केला. एकूण व्यवस्थापनही त्यांनी चोख ठेवले. त्यामुळे एकात्मिक पद्धतीतून कांदा चमकदार, टणक झाला. सध्या तो साठवून ठेवला आहे.
संदीप लांगोटे ८७९३७०९११७
कोंडोली (ता. मानोरा, जि. वाशिम) येथील गोपाल पवार म्हणाले, की माझे वडील व भाऊ शेतीची मुख्य जबाबदारी पाहतात. शेंगा धरण्याच्या अवस्थेत तूर उधळते ही आमची कायमचीच समस्या झाली आहे. त्यावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने जवळपास १० हजार रुपये किमतीचे ट्रायकोडर्मा व अन्य निविष्ठा कृषी विद्यापीठातून घेऊन वापर केला. ट्रायकोडर्मा शेणखत व आळवणीद्वारे दिल्याचा उपयोग झाला. व्यवस्थापनही चांगले ठेवले. एकरी सहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. मागील वर्षी ही समस्या जाणवलेली नाही. संत्रा पिकातही त्याचा वापर करतो आहोत. आता बीजप्रक्रियेसाठीही या उत्पादनांचा वापर करणार आहे.
गोपाल पवार ९५६१५३९४७२
वाडेगाव, जि. अकोला येथील सुनील चोपडे म्हणाले, की साडेतीन एकरांत १८ वर्षांची व एक एकरातील ८ ते ९ वर्षांची अशा लिंबाच्या दोन बागा आहेत. झाडे वाळणे, बहर न फुटणे, फुटला तरी उत्पादन कमी अशा समस्या जाणवत होत्या. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ट्रायकोडर्मा व अन्य जैविक निविष्ठांचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले. त्याचे चांगले परिणाम आता दिसत आहेत. मागील वर्षी वाडेगाव परिसरात अनेक बागांमध्ये लिंबाला बहार फुटला नव्हता. मात्र योग्य व्यवस्थापनातून मी हे पीक यशस्वी केले. सुमारे सहा लाखांचे उत्पन्न मिळवले. सहा- सात वर्षांपासून बागेत नियमितपणे या निविष्ठांचा वापर सुरू ठेवला आहे.
सुनील चोपडे ९७६४५२९०२०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.