Orchard Plantation : राज्यात दहा हजार हेक्टरने फळबाग लागवडी घटल्या

Horticulture : राज्यात गतवर्षात (२०२३-२४) बहुतांश जिल्ह्यांत पुरेसा पाऊस नाही, दुष्काळी स्थिती आहे. परिणामी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केल्या जाणाऱ्या फळबाग लागवडीत दहा हजार हेक्टरने घट झाली आहे.
Orchard Plantation
Orchard PlantationAgrowon
Published on
Updated on

Nagar News : राज्यात गतवर्षात (२०२३-२४) बहुतांश जिल्ह्यांत पुरेसा पाऊस नाही, दुष्काळी स्थिती आहे. परिणामी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केल्या जाणाऱ्या फळबाग लागवडीत दहा हजार हेक्टरने घट झाली आहे. राज्यात ‘रोहयो’तून ४८ हजार हेक्टरपर्यंत फळबाग लागवड झाली होती. यंदा मात्र ३८ हजार ५५६ हेक्टरवरच फळबाग लागवड झाली आहे. अर्थात, राज्यात दहा हजार हेक्टरने फळबाग लागवड कमी झाली आहे.

दुष्काळाच्या झळा बसत असलेल्या सुमारे नऊ ते दहा जिल्ह्यांमध्ये फळबाग लागवडीवर परिणाम झाला आहे. २०२३-२४ या वर्षभरासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट होते. मात्र वर्षअखेरीस (मार्च २०२४) झालेल्या अहवालानुसार ३८ हजार ५५६ हेक्टरवर (६६.२४ टक्के) फळबाग लागवड झाली आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांत पन्नास टक्क्यांच्या आत लागवड झाली आहे.

Orchard Plantation
Orchard Pruning : फळबागांच्या छाटण्या पावसाअभावी रखडल्या

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड करावी यासाठी शासनाकडून अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे. अल्प व अत्यल्पभूधारक (पाच एकरांच्या आतील) शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (एमआरईजीएस) व पाच एकरांवरील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर योजना राबवली जात आहे. बहुतांश शेतकरी ‘रोहयो’तून लागवड करतात.

राज्यात गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी प्रत्येकी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. राज्यात ८ हजार १०० कृषी सहायक असून, प्रत्येक कृषी सहायकाला रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. आतापर्यंत प्रत्येक वर्षी चाळीस हजार हेक्टरपेक्षा अधिक म्हणजे उद्दिष्टाच्या ८० ते ९० टक्क्यांपर्यंत फळबाग लागवड झाली. त्यामुळे यंदाही (२०२३-२४) राज्यात ६० हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. यंदा मात्र सुरुवातीपासूनच पाऊस नाही. त्याचा लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

Orchard Plantation
Papaya Orchard Management : कडक उन्हामुळे पपई बागेत कोणत्या समस्या येतात?

‘रोहयो’तून फळबाग लागवड करताना एप्रिल, मे महिन्यातच नियोजन करून खड्डे खोदले जातात. पावसाला सुरुवात झाली की जून ते सप्टेंबर कालावधीत जास्तीत जास्त फळबाग लागवड केली जाते. मात्र अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करण्याकडे दुर्लक्ष केले.

कृषी विभागाच्या अहवालानुसार राज्यात यंदा (२०२३-२४) मार्च अखेरीत ३८ हजार ५५६ हेक्टरवर (६६.२४ टक्के) फळबाग लागवड झाली आहे. परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, नगर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत यंदा पन्नास टक्क्यांच्या आत लागवड झाली आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने त्याचा फळबाग लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

फळबाग लागवडीची स्थिती

- उद्दिष्ट ः ६० हजार हेक्टर

- अर्ज केलेले शेतकरी व क्षेत्र ः ९२ हजार ९६६ (७३ हजार ३३६ हेक्टर)

- तांत्रिक मान्यता ः ६८,४३६ हेक्टर

- प्रशासकीय मान्यता ः ६७,९७३ हेक्टर

- खड्डे खोदलेले क्षेत्र ः ४०,१११ हेक्टर

- प्रत्यक्ष लागवड ः ३८,५५६ हेक्टर

- टक्केवारी ः ६४.२४

जिल्हानिहाय लागवड हेक्टरमध्ये (कंसात टक्केवारी)

ठाणे ः १३१९ (८७.९५), पालघर ः २,२६४ (८३.८७). रायगड ः १,७७७ (७४.६), रत्नागिरी ः १,७५० (४३.७७), सिंधुदुर्ग ः १,५५२ (४५.६२) नाशिक ः२,८७५ (७१.८९), धुळे ः ८३७ (८३.७७), नंदुरबार ः २,३७६ (९५.०८), जळगाव ः १३६३ (५४.५३), नगर ः १३०१ (४३.४०), पुणे ः १४५२ (४८.४२), सोलापूर ः १,६५४ (६१.२६), सातारा ः ७१२ (५९.३५), सांगली ः ६८७ (४२.९८) कोल्हापुर ः २०३ (३३.९५), छत्रपती संभाजीनगर ः ३३८ (३३.८९), जालना ः १०९३ (६०.७८), बीड ः ३५५ (७१.३३), लातुर ः ८१५ (६२.७४), धाराशिव ः ५७६ (७२.००), नांदेड ः ४५० (६४.३२), परभणी ः ३५४ (२३.६६) हिंगोली ः २०८ (३४.८१), बुलडाणा ः १४८५ (८२.५३), अकोला ः ५९४ (५९.३३) , वाशीम ः १०१३ (१०१.३६), अमरावती ः १५२३ (६९.२४), यवतमाळ ः २६१० (१११.६६), वर्धा ः ५११ (५१.१७), नागपूर ः ९५५ (६३.६९), भंडारा ः ५४९ (५४.९७), गोंदिया ः ११८१ (७८.७६), चंद्रपूर ः १११८ (७४.५४), गडचिरोली ः ६७८ (६७.९०)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com