
Jalna News : एका बहर न घेता दोन बहरांचा अट्टहास आणि एका बहराची फळे झाडावर असताना दुसऱ्या बहरासाठी झाडांना देण्यात येणाऱ्या ताणामुळे मोसंबी बागांवर संकट आल्याचे असल्याचे क्षेत्रीय भेटी दरम्यान शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रीय भेटीचे आयोजन गुरुवारी (ता.२६) करण्यात आले होते. त्या वेळी ही कारणे पुढे आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
क्षेत्रीय पाहणीदरम्यान अंबड तालुक्यातील बोरी, शेवगा, सोनक पिंपळगाव, लालवाडी, हस्त पोखरी आदी ठिकाणी मोसंबी व इतर फळपिकांची पाहणी तज्ज्ञ व अधिकाऱ्यांनी केली. या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. सूर्यकांत पवार, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार,
राम रोडगे, केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ. दीपक कच्छवे, डॉ. सचिन धांडगे, ‘एनएआरपी‘चे रामेश्वर ठोंबरे, जालना जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. या पाहणीदरम्यान मोसंबी पिकाचे मोठ्या प्रमाणात अशास्रीय व्यवस्थापन दिसून आले. या वेळी भागवत गोरे, योगेश्वर काळे, श्याम पवार, प्रसाद गोरे, दीपक सावंत, रमाकांत जंगले आदी शेतकरी उपस्थित होते.
तज्ज्ञांचा सल्ला
शिफारशीत अंतरावर योग्य कलमांची लागवड करून शाखीय वाढ पूर्ण झाल्यानंतर बाग ताणावर सोडावी.
झाडाच्या क्षमतेनुसार फळसंख्या ठेवावी. सद्यःस्थितीत बागा उत्पादनक्षम राहण्यासाठी मागील हंगामाची फळे काढून टाकावीत.
बागेत हवा, सूर्यप्रकाश मिळण्यासाठी गच्च झालेल्या फांद्यांची छाटणी करून एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
खतमात्रा ताण तोडण्यापूर्वी व नंतर विभागून द्याव्यात. सद्यःस्थितीत आंबिया बहरासाठी ताणावर असणाऱ्या बागेत क्लोरोमेक्वेट क्लोराइड (१००० पीपीएम) १ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास चांगली फुले येतील, असा सल्ला मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिला.
मोसंबीचे नेमके क्षेत्र किती?
छत्रपती संभाजीनगर : पैठण, सोयगाव, गंगापूर. छ. संभाजीनगर
जालना : घनसावंगी, अंबड, जालना, बदनापूर.
परभणी : परभणी, पूर्णा, जिंतूर.
नांदेड : माहूर, नांदेड, हिमायतनगर, मुखेड.
बीड : बीड, वडवणी, शिरूर कासार, गेवराई, माजलगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.