Land Records Office : शासकीय मोजणीसाठी शेजाऱ्याकडून विरोध? काळजी नसावी, 'या' मोजणीसाठी करा अर्ज

Land Counting : रोव्हर मशीनद्वारे मोजणीचा कालावधी कमी झाला, पण त्यानंतर संबंधित क्षेत्राचे रेकॉर्ड बनविणे, हद्द-खुणा कायम करण्यासाठी तेवढाच वेळ लागतो.
Land Record
Land Record Agrowon
Published on
Updated on

Land Records Office Solapur : शेतीच्या बांधावरून भांडणांची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालल्याने जमीन मोजणीसाठी अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सध्या दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात दरमहा सरासरी ५५० शेतकरी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज दाखल होत आहेत. जमीन मोजणीच्या अर्जात वाढ झाली आहे परंतु मोजणीवेळी शेजारचा हद्द, खुणा निश्चित करताना विरोध करतो. त्यावेळी संबंधित शेतकऱ्यास निमताना, सुपर निमताना मोजणीचा उत्तम पर्याय भूमिअभिलेख कार्यालयाने उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यात जमिनीच्या मोजणीसाठी ५० रोव्हर मशीन आहेत. तातडीची मोजणी चार महिन्यांत, अतितातडीची मोजणी दोन महिन्यांत आणि साधी मोजणी सहा महिन्यांत होणे अपेक्षित आहे. याशिवाय अतिअतिताडीची मोजणी १५ दिवसांत केली जाते. रोव्हर मशीनद्वारे मोजणीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत झाली, पण त्या क्षेत्राच्या खुणा व हद्दी कायम करण्यासाठी लागणाऱ्या कामास आजही तेवढाच वेळ लागतो ही वस्तुस्थिती आहे.

मागच्या आठ महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील सहा हजार ५५६ शेतकऱ्यांनी मोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयांकडे अर्ज केले. त्यातील तीन हजार १३९ शेतकऱ्यांची मोजणी अजूनही शिल्लक आहे. मोजणीनंतर त्या क्षेत्राचे रकॉर्ड तयार करणे, क्षेत्र कोणत्या दिशेने दिसेला सरकते, सध्याच्या वहिवाटीचे क्षेत्र, या बाबींचा विचार करून हद्द-खुणा निश्चित केल्या जातात. त्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याने तातडी, अतितातडीची मोजणीस विलंब लागतो. दरम्यान, जागा, जमिनीच्या वादाच्या सर्वाधिक तक्रारी तथा गुन्हे पोलिसांत दाखल होत असल्याचीही स्थिती आहे.

मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करणे जरूरी

जिल्हा भूमिअभिलेख अधिक्षख दादासाहेब घोडके म्हणाले की, रोव्हर मशीनद्वारे मोजणीचा कालावधी कमी झाला, पण त्यानंतर संबंधित क्षेत्राचे रेकॉर्ड बनविणे, हद्द-खुणा कायम करण्यासाठी तेवढाच वेळ लागतो. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये मोजणीसाठी विलंब होतो, तरीदेखील तातडी, अतितातडी, अतिअतितातडीची मोजणी वेळेत पूर्ण केली जाते. ज्यांना त्यांच्या क्षेत्राची मोजणी करायची आहे, त्यांना आता ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ऑफलाइन अर्जाची पद्धत पूर्णत: बंद झाली आहे.

निमताना, सुपर निमताना मोजणी म्हणजे काय?

एखाद्या शेतकऱ्याने मोजणीसाठी अर्ज केला, त्याच्या क्षेत्राची मोजणी करताना शेजारील खातेदार त्यास हरकत घेतो आणि मोजणी अमान्य करतो. त्यामुळे भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मोजणी अर्ध्यावर ठेवून यावे लागते. अशावेळी संबंधित शेतकऱ्याला निमताना मोजणी करून घेता येते. पण, त्यासाठी पहिल्या मोजणीच्या तीनपट शुल्क भरावे लागते. त्या मोजणीवेळी तालुक्याचे भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक जागेवर येतात. याशिवाय सुपर निमताना मोजणीसाठी पाचपट शुल्क भरल्यास जिल्ह्याचे अधीक्षक त्या क्षेत्राच्या मोजणीसाठी तेथे जातात. त्यावेळी त्या क्षेत्राची मोजणी करून हद्द-खुणा कायम करून देतात.

मोजणीसाठी हेक्टरी दोन हजार रुपयांचे शुल्क

जमिनीच्या मोजणीसाठी हेक्टरी दोन हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते. तर दोन हेक्टरसाठी तीन हजार रुपयांचा दर आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन असल्याने ते शुल्क ऑनलाइन भरावे लागते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com