
Nashik Kanda Rate : मागील दोन आठवड्यापासून राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा प्रमुख पीक आहे. परंतु नैसर्गिक संकट आणि बाजारातील कांद्याला कमी दर यामुळे कांदा उत्पादकांना दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांची पुरती आर्थिक कोंडी झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची लागवड चांगली झाली होती. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु उष्णतेच्या लाटांमुळे कांदा पिकाला फटका बसला. त्यामुळे कांदा उत्पादकांचं उत्पादन घटलं. दुसरीकडे कांद्याला बाजारात सध्या प्रतिक्विंटल ७०० ते १ हजार १०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. या दरातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी कांदा चाळीत साठवून ठेवत आहेत. परंतु मागील दोन आठवड्यांपासून वादळी पावसामुळे चाळीतला कांदा पीक भिजून नुकसान होत आहे, असं शेतकरी सांगतात आहेत.
पावसाच्या हजेरीमुळे नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, बाजरी, मका, डाळिंब, आंबा आणि भाजीपाला पिकं पाण्याखाली गेलली आहेत. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार १३ मेपर्यंत नाशिक जिल्ह्यात ६४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे खरीप तोंडावर शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
कांद्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्च वसूल होत नाही. त्यामुळे सरकारने कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन द्यावं. तसेच नाफेड आणि एनसीसीएफने बाजार समित्यांमधून थेट लिलावाद्वारे कांदा खरेदी करावी, अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
मागील वर्षी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातली. तसेच किमान निर्यात शुल्कात वाढ करून पाचर मारली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. सध्या कांदा निर्यातीवरील बंधनं नाहीत. परंतु निर्यातीला उठाव नाही. त्यामुळे केंद्र सरकारने जागतिक बाजारात कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून कांद्याच्या दराला आधार मिळेल, असं मत जाणकार व्यक्त करत आहेत.
केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक (संरक्षित साठा) करण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी करून ३ लाख टनांचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. यामध्ये नाफेड १.५ लाख टन आणि एनसीसीएफ १.५ लाख टन कांदा खरेदी करणार आहे. परंतु अद्यापही नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे कांदा खरेदी नेमकी कधीपासून सुरू करण्यात येणार, असा कांदा उत्पादक शेतकरी सवाल उपस्थित करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.