HT BT Cotton Seed : एचटीबीटी कापूस बियाण्याची एक लाख पाकिटे दाखल

Cotton Seed Market Update : काळाबाजार सुसाट; राज्यभरात १० लाख हेक्टरवर लागवडीची शक्यता
Cotton Seed
Cotton SeedAgrowon

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon Cotton Seed Market : राज्यात बनावट किंवा एचटीबीटी (हर्बीसाईड टॉलरंट) (HTBT) कापूस बियाण्याची १० लाखांवर पाकिटे दाखल झाली आहे. कृषी यंत्रणा, संघटना, दलाल, काही निविष्ठा कंपन्यांचे प्रतिनिधी अनेकांच्या मदतीने हा गोरखधंदा यंदाही फोफावत आहे. कोट्यवधींची उलाढाल यातून यंदाही होईल, असे दिसत आहे.

राज्यात कापसाची यंदा किमान ४१ लाख हेक्टरवर लागवड होईल. यातील तब्बल १० ते ११ लाख हेक्टरवर या बनावट कापूस बियाण्याची लागवड यंदाही होईल. कारण मागील वर्षीदेखील एवढीच किंवा यापेक्षा अधिकची लागवड या बियाण्याची झाली होती.


यंदा ११०० ते १२०० रुपये प्रतिपाकिट (एक पाकिट ४०० ग्रॅम क्षमता), असे दर त्याचे आहेत. राज्यात खानदेश, नाशिकचा पूर्व भाग, मराठवाड्यातील दाक्षिणात्य भागालगतचा भाग, विदर्भात मिळून सुमारे १० लाख पाकिटे दाखल झाली आहेत. पुढील टप्प्यात पाकिटांचा आणखी पुरवठा होईल.

Cotton Seed
BT Cotton Seed : बीटी कापूस बियाण्यांच्या सोळा लाख पाकिटांची विक्री

आपल्या किंवा आपल्या परिचयातील मंडळीला ही पाकिटे उधारीवर पुरवठादार पोचवीत आहेत. खानदेशात गुजरात व मध्य प्रदेशातून ही पाकिटे येत आहेत.

त्यासाठी कृषी यंत्रणा, कृषी निविष्ठा कंपन्यांचे प्रतिनिधी आदींची मदत पुरवठादार घेत आहेत. गुजरातमधील राजकोट, जुनागड आणि सापुतारा लगतच्या भागातून हे बनावट बियाणे येत आहे.

मागील वर्षी फसगत
मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांची या बियाण्यात फसगत झाली आहे. कमी उत्पादन व अपेक्षित वाढ नसणे, वेळेत बोंडे न उमलणे, गुलाबी बोंड अळी अशा समस्या एचटीबीटीच्या होत्या. त्यामुळे यंदा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष आहे.

Cotton Seed
BT Cotton Rate In India : केंद्र सरकार बीटी बियाण्याची दरवाढ रोखणार?

कृषी विभागाचा फतवा अनेकांसाठी मारक
राज्यात कृषी विभागाने कापूस बियाणे १ जूनपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार नाही. १ जूनपूर्वी कापूस लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीची समस्या येते, असा फतवा जारी केला आहे.

यातच पूर्वहंगामी कापूस लागवडीसंबंधी अनेक शेतकरी बनावट कापूस बियाणे घेतात. त्यात राज्यात कायदेशीरपणे किंवा कृषी केंद्रांत उपलब्ध होणाऱ्या बोलगार्ड २ प्रकारच्या बीटी कापूस बियाण्याच्या विक्रीस कमी प्रतिसाद मिळतो.

खानदेशात मागील दोन वर्षे असाच अनुभव अनेक कापूस बियाणे पुरवठादार कंपन्यांना आला आहे. यंदाही हीच स्थिती तयार होईल.

कृषी विभागाचा कापूस बियाणे विक्रीसंबंधीचा फतवा काळाबाजार करणाऱ्यांना पूरक ठरत आहे. यामुळे शेतकरी, लोकप्रतिनिधी व खते, बियाणे विक्रेत्यांच्या संघटनांनी राज्यात कापूस बियाणे विक्रीस १५ मेपासून परवानगी द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे.


उत्तरेकडे लागवडी एप्रिलमध्येच उत्तर भारतात पंजाब, हरियाना, राजस्थानात एप्रिलच्या मध्यातच कापूस लागवड पूर्ण होते. तेथे शेतकऱ्यांना कायदेशीरपणे एप्रिलच्या सुरवातीलाच मान्यताप्राप्त कंपन्यांचे बियाणे उपलब्ध होते.

राज्यातही शेतकऱ्यांची लूट व फसत टाळण्यासाठी कापूस बियाणे विक्रीच्या नियमांत बदल करण्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

तणनाशक सहनशील, पण बोंड अळीचे काय?
कापूस उत्पादकता राज्यात गुलाबी बोंड अळीच्या समस्येने व अतिपावसानेही घटली आहे. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांचा उपयोग वाढला आहे. यासोबत संप्रेरकेही शेतकरी घेतात.

यामुळे उत्पादन खर्च वाढला असून, सकारात्मक परिणाम मात्र शेतकऱ्यांना चार वर्षे दिसलेला नाही. अशात बनावट एचटीबीटी कापूस बियाणे फक्त तणनाशक सहनशील आहे. तण ही मोठी समस्या नसून, गुलाबी बोंड अळी ही समस्या गंभीर आहे. त्यासंबंधी अटकाव करणारे कापूस बियाणे राज्यात किंवा देशात हवे आहे.

पण एचटीबीटी कापूस बियाण्याबाबत चुकीची माहिती पसरवून मोठा नफा राज्यातून लाटला जात आहे. जखम किंवा दुखापत पायाला आणि उपचार केले जात आहेत, कपाळावर असा हा प्रकार आहे.

शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी स्थापन केलेल्या कृषी यंत्रणा, संशोधन केंद्र बोटचेपी, बघ्याची भूमिका घेत आहेत, असा मुद्दा शेतकरी तथा कृषी विषयांचे अभ्यासक विशाल पाटील (शिरपूर, जि. धुळे) यांनी उपस्थित केला आहे.

खानदेशात दोन खोक्यांची बेगमी
खानदेशात अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या विक्रीतून दोन खोक्यांची बेगमी अनेकांना लागवड हंगामाअखेरपर्यंत मिळेल.

तसा ठराव पुरवठादार आणि काही कमिशनखोरांत झाल्याची चर्चा आहे. यापेक्षा अधिकची उलाढाल विदर्भ व मराठवाड्यात होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com