Team Agrowon
महाराष्ट्रासह देशभरात नगदी पीक कापसाची शेती आतबट्ट्याची ठरत आहे. या वर्षी राज्यात अतिवृष्टीने कापसाचे प्रचंड नुकसान केले. पहिल्या वेचणीचा कापूस भिजला. त्यानंतर कापूस पिकावर रोग-किडींचा हमला वाढला.
कीड-रोगनियंत्रणात ठेवण्यासाठी उत्पादकांना त्यावर अधिकच्या फवारण्या कराव्या लागल्या.
किडीमुळे बीटी कापसासाठी रासायनिक खतांचा वापरही अधिक प्रमाणात करावा लागत असल्याने खर्च वाढत आहे.
कापूस वेचणी हे फारच जिकिरीचे अन् खर्चीक काम आहे. कापूस वेचणी मजुरीही सातत्याने वाढतेय. एकीकडे बीटी कापूस उत्पादनासाठी असा खर्च वाढत असताना दुसरीकडे उत्पादन मात्र अनेक कारणांनी घटत चालले आहे.
कापसाला यावर्षी सुरुवातीपासून ते आता शेवटपर्यंत कमी दर मिळतोय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक तणावामध्ये आहेत.
आगामी खरीप हंगामासाठी बीजी-२ कापसाच्या बियाण्यात प्रतिपाकीट (४७५ ग्रॅम) ४३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून देशपातळीवर बीटी बियाण्याचे दर केंद्र सरकार निश्चित करीत असल्याने त्यांच्या संमतीने ही दरवाढ झाली आहे.
आता बीटी बियाण्याच्या एका पाकिटासाठी शेतकऱ्यांना ८५३ रुपये मोजावे लागतील. प्रतिपाकीट ४३ रुपयांची वाढ कमी वाटत असली तरी राज्यातील सरासरी लागवड क्षेत्र आणि प्रतिएकरी वापरात येत असलेले बियाणे पाहता त्यांच्यावर ८६ कोटींचा भुर्दंड बसणार आहे.