Paddy Farming : कधी काळी भात कापणी होता एक उत्सव

Paddy Harvesting : मजूर टंचाईमुळे शेतीचे आता झपाट्याने यांत्रिकीकरण होते आहे. ते आवश्यकही आहे. मात्र, यंत्रामुळे शेतीमधील उत्सवाचे क्षण कमी होत आहेत. शेती असूनही मी ४० वर्षांपूर्वी शेतमजूर होतो आणि आजही शेतमजूरच आहे.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : मजूर टंचाईमुळे शेतीचे आता झपाट्याने यांत्रिकीकरण होते आहे. ते आवश्यकही आहे. मात्र, यंत्रामुळे शेतीमधील उत्सवाचे क्षण कमी होत आहेत. शेती असूनही मी ४० वर्षांपूर्वी शेतमजूर होतो आणि आजही शेतमजूरच आहे. त्यामुळे शेतीमधील मजुरांची वाटचाल माझ्या डोळ्यासमोर आहे. सह्याद्री डोंगररांगांमध्ये अतिपावसामुळे केवळ भात, नाचणी, वरईची शेती करता येत होती. आता केवळ भाताची लागवड होते. त्यासाठी एकमेकांच्या शेतावर मजुरीने कामाला जाणे किंवा मदत म्हणून काम करण्यासाठी लोकं जात होती. एकत्र येत गावाबाहेर पडून पंढरीला वारी केली जात होती; तसेच लोक शिवारात एकत्र येत आणि एकमेकांची भात शेती फुलवीत असत.

आज त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो. रानात भाताची शेतं तयार झाली की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील लगबग वाढत असे. दिवाळीनंतरची भात कापणी म्हणजे सर्वांसाठी एक उत्सव असायचा. त्यामुळे भल्या सकाळी बायकामाणसं, मुलीबाळी झोपेतून लवकर उठत होती. काही न खाता घराला कडी टाकून कुत्रा, माजरं, बैल अशा जित्राबांसह आम्ही सारे गावातून शिवारात जात होतो. दुपारी १२ वाजता एक दोन बायका पुन्हा घरी जात व भाजीभाकरी तयार करीत सर्वांना जेवण घेऊन येत असत. भात कापून आधी त्याच्या पेंढ्यांच्या बुचडा बांधून ‘उठवं’ करीत असू. ती जागा आधी साफ केली जायची. त्यावर टहाळे, गवताच्या पेंढ्या टाकल्या जात. त्यात उंदीर घुसू नये म्हणून सागाची पाने लावली जायची. त्यावर भात रचला जायचा. दोन दिवस भात तसाच वाळू दिला जायचा. कापणी झाली म्हणजे लोक लगेच खळे करण्याच्या तयारीला लागत होते.

Paddy Farming
Paddy Crop Damage : वीसगाव खोऱ्यात भात पिकास फटका

खळ्याच्या जागेवर आदल्यादिवशी साफसफाई करावी लागे. पाणी शिंपडून दगड हटवून जमीन पातळी समान केली जात होती. त्याजागेवर बैलं फिरवली जायची. त्यानंतर शेणाचा सडा टाकला जायचा. भले मोठे गोलाकार खळे दोन-तीन दिवस रोज हाताने सारवले जात होते. या कष्टाच्या कामात महिला आघाडीवर होत्या. परंतु, अनेक गावांमध्ये पुरुषदेखील बरोबरीने काम करीत होते. खळ्याचा आकार, गोलाई किंवा किती भात मळायचा आहे यावर खळ्यात किती बैलं वापरायचे ते ठरवले जात होते. कधी दोन तर कधी सहा-सातदेखील बैलं वापरले जायचे. ही सर्व कामे आम्ही खूप आनंदाने करीत असू.

लेकीबाळींबाबत बायकांच्या गप्पा रंगायच्या. आम्हीदेखील गाणी म्हणत बोलतचालत कामे करीत असू. खळ्याभोवती बैलं हाकताना कामे खूप चपळाईने केली जात. गडीमाणसांनी एकदा भात मळून दिला की पुढील कामं महिला करीत असत. खळं साफ करणे, उफणणे, रास करणे, चाळणी मारणे, पोती भरणे अशी कामं महिला करायची. भात मळणीची काम करीत असताना सारे जण दिवसभर शेतात थांबत. विहीर, झरे, ओहोळाचे पाणी प्यायचे. कधी कधी कष्ट केल्यानंतर लोकं नदीत डुंबतपण असत. थंडीची चाहूल लागलेली असायची. खळ्याभोवती रानपक्षी आणि फुलपाखरं भिरभिरायची.

Paddy Farming
Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण

खळ्यातील काम संपताच घरात किंवा झोपडीत पुन्हा भात साठवणीची तयारी चालू होत असे. सारा भात ४ किंवा १० किंवा १४ मण क्षमतेच्या कणग्यांमध्ये साठवला जायचा. कणगीत साठवलेल्या भाताला कधीच किडा लागत नव्हता. त्याचा गंधही जात नसायचा. ज्याच्या घरी जितक्या मोठ्या कणग्या तितका तो भाताने समृद्ध समजला जात होता. मग, खळ्यात तयार करून ठेवलेली धानाची पोती आम्ही बैलगाडीमध्ये भरत असू. मोठ्या आनंदाने, उत्साहाने बैलगाड्या गावात यायच्या. प्रत्येकाच्या घरासमोर महिला नटूनथटून पूजेसाठी उभ्या असायचा. भाताच्या गाडीसोबत आलेला धनी, खळ्यात काम करणारे मजूर, बैलं या साऱ्यांची पुजा केली जायची. आरती होत असे. मग तो भात उतरवून कणगीत साठवला जायचा.

कणगी काठोकाठ भरली की त्यावर सागाची पाने टाकली जात होती व त्यावर शेणाने लिंपले जायचे. कणगीवर अक्षयतृतीयेला पाच गोवऱ्यांची चित्र लावली जात होती. भाताची भरलेली कणगी म्हणजे आम्हा गरीब शेतकऱ्यांची जणू काही धनाने भरलेली तिजोरीच होती. कणगीतील भात गरजेप्रमाणे विकायचे, उखळात भरडून आम्ही खायचे. असा कष्टाने पिकवलेला भात पै-पाहुण्यांना वानुळा म्हणून वाटला जायचा. आजही मी कष्टाने पिकवलेला भात माझ्या पाहुण्यांना आनंदाने देत असतो. लोक सांगतात की, माझा भात खूप चविष्ट असतो. कारण, त्यात माझा घाम आणि डोंगरातील मातीचा गंध सामावलेला असतो.

(शब्दांकन : मनोज कापडे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com