Jalgaon News : जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागांत भेंडीचे क्षेत्र वाढले आहे. कमी कालावधी व पावसात चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून भेंडीला अनेकांनी पसंती दिली आहे.
यंदा भेंडीची बाजारातील आवक कायम आहे. दरात मध्यंतरी वाढ झाली, परंतु या दरांचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. कारण दर कमीअधिक होत आहेत. भेंडीला उठावही आहे.
एरंडोलमधील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागांत भेंडी पीक असते. तसेच धरणगावमधील पथराड, चोरगाव, चांदसर, दोनगाव, पाळधी, रेल, लाडली, भोकणी, फुलपाट, आव्हाणी व इतर भागात भेंडी पीक बारमाही घेतले जाते. पावसाळ्यातही या भागात भेंडी असते. परंतु सध्या भेंडीची लागवड करण्याकडे अनेक शेतकरी वळत आहेत. ज्या भागात लागवड झाली आहे.
लागवड अजूनही सुरूच आहे. मागील महिन्यात लागवड केलेल्या भेंडी पिकातून पुढील महिन्यात किंवा ३० ते २३ दिवसानंतर भेंडीची काढणी सुरू होईल. यामुळे सध्या भेंडीची बाजारातील आवक टिकून आहे. या भागातील ज्या शेतकऱ्यांची भेंडी काढणीवर आहे, त्यांना थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत १५ ते २० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.
कमी दर्जाच्या किंवा दुय्यम दर्जाच्या भेंडीसही १० रुपये प्रतिकिलोचा दर आहे. या गावांत एरंडोल, धरणगाव भागातील मोठे खरेदीदार, एजंट भेंडीची खरेदी करीत आहेत. या भेंडीची पाठवणूक मुंबई, ठाणे, मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील सुरत, बडोदा येथे केली जात आहे. तसेच आवक अधिक असल्याने स्थानिक बाजारात भेंडीची आवक कायम आहे. जळगाव इतर शहरांमधील आठवडी व इतर बाजारांत विक्रेते भेंडीची ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री करीत आहेत.
जळगाव येथील भाजीपाल्याचा बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव, सिल्लोडसह धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल आदी भागांतूनही भाजीपाल्याची आवक होते. परंतु सध्या भेंडीची आवक निम्म्यावर किंवा त्यापेक्षा कमी आहे.
ऑगस्टमध्ये भेंडीची जळगावच्या बाजारात प्रतिदिन सरासरी २० क्विंटल आवक झाली होती. या महिन्यात मागील आठ दिवसांत ही आवक प्रतिदिन सरासरी २८ क्विंटल एवढी आहे. यात बुधवारी, गुरुवारीही आवक अधिक राहिल्याची नोंद झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.