Grape Export : देशातून द्राक्ष निर्यातीला अडथळा

Grape Export Of India : इस्राईल आणि हमास युद्धाची झळ सुएझ कालव्यामार्गे माल वाहतूक करणाऱ्या जहाजांना बसली आहे. त्यामुळे या मार्गे जाणारी सर्व वाहतूक जहाज कंपन्यांनी थांबविली आहे.
Grape Export
Grape ExportAgrowon

Sangli News : इस्राईल आणि हमास युद्धाची झळ सुएझ कालव्यामार्गे माल वाहतूक करणाऱ्या जहाजांना बसली आहे. त्यामुळे या मार्गे जाणारी सर्व वाहतूक जहाज कंपन्यांनी थांबविली आहे.

दरम्यान, केप ऑफ गुड होप-दक्षिण आफ्रिकेमार्गे वाहतूक सुरू असून, युरोप आणि रशियाला द्राक्ष निर्यातीचा मार्ग असला, तरी कंटरेनच्या भाड्यात २७०० ते ३२०० डॉलरेन वाढ झाली आहे.

त्यामुळे देशातून निर्यात होणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसला असून, द्राक्ष निर्यातीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशातून द्राक्ष निर्यातीचा वेग मंदावला असून, द्राक्षाची निर्यात धोक्यात आली असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

देशातून द्राक्ष निर्यातीचा हंगाम सुरू झाला आहे. युरोप आणि रशिया या दोन देशांत सुएझ कालव्यामार्गे द्राक्षाची निर्यात केली जाते. वास्तविक पाहता, गतवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात २०० ते २५० कंटनेर म्हणजे ३००० ते ३७५० टन द्राक्षाची निर्यात झाली होती. मात्र इस्राईल- हमास गाझापट्टीवरील हल्ल्यात वाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ला झाला. यामुळे माल वाहतूक करणाऱ्या जहाजांनी सुएझ कालव्यामार्गे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Grape Export
Exportable Grape : ‘ग्रेपनेट’वर निर्यातक्षम द्राक्ष बागा नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

परिणामी, देशातून द्राक्ष निर्यातीला अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामात १२५ ते १५० कंटनेर द्राक्ष युरोपमध्ये पोहोचली आहेत. यामुळे याचा फटका देशातील द्राक्ष निर्यातीवर बसला आहे. द्राक्ष निर्यात करण्यासाठी यापूर्वी आठ दिवसांतून दोन ते तीन जहाजे उपलब्ध होत होती. परंतु सध्या दहा ते बारा दिवसांतून रिकामे जहाज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे द्राक्ष निर्यात करण्यासाठी जहाजच मिळत नसल्याने द्राक्ष निर्यातदारही अडचणीत सापडला आहे.

कंटेनरच्या भाड्यात वाढ

सुएझ कालव्यामार्गे युरोपला द्राक्ष पाठवण्यासाठी प्रति कंटनेर १८०० ते २००० डॉलर असा दर होता. मात्र हा मार्ग बंद आहे. त्यामुळे काही शिपिंग कंपनीने केप ऑफ गुड होप-दक्षिण आफ्रिकेमार्गे वाहतूक सुरू केली असून, जहाजांची उपलब्धता होत नाही.

परंतु या मार्गे द्राक्ष निर्यात करायची असल्यास प्रति कंटेनरला २७०० ते ३२०० डॉलरने वाढ केली आहे. अर्थात प्रति कंटेनरचे भाडे आता ४५०० ते ५००० डॉलरवर पोहोचले आहे. कंटेनरच्या भाड्यात वाढ झाल्याने द्राक्ष निर्यात करण्यासाठी खर्च वाढल्याने शेतकऱ्यांसह द्राक्ष निर्यातदारांनाही त्याची झळ बसू लागला आहे.

वाढत्या कालावधीने द्राक्ष गुणवत्ता घसरणार?

सुएझमार्गे युरोपला द्राक्ष जाण्यासाठी २० ते २२ दिवसांचा कालावधी लागतो. परंतु आता केप ऑफ गुड होपमार्गे जहाज येण्यासाठी आणि जाण्यासाठी १० ते १५ दिवसांचा अतिरिक्त कालावधी लागणार आहे. अर्थात, ३५ ते ४० दिवस कंटेनरमध्ये द्राक्ष असणार आहेत. त्यामुळे द्राक्ष पोहोचण्यास विलंब होणार आहे. परिणामी, द्राक्ष खराब आणि रिजेक्ट होण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Grape Export
Grape Export : आपत्तींवर मात करून सांगली जिल्ह्यातून ४३८ टन द्राक्ष निर्यात

केंद्र सरकारने लक्ष घालावे

या साऱ्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होत आहे. सुएझ कालवामार्गे वाहतूक व्यवस्था करू करावी यासाठी केंद्र सरकार, परराष्ट्रमंत्री आणि शिपिंग मंत्री यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा करून याचा मार्ग काढावा, अशी मागणी द्राक्ष निर्यातदार, भारतीय द्राक्ष निर्यात असोसिएशन करत आहे.

सुएझ कालव्यातून द्राक्ष निर्यातीसाठी जहाज वाहतुकीसाठी अडचण आली आहे. वाहतूक व्यवस्था कधी सुरळीत होणार आहे, या बाबत शाशंकता आहे. केप ऑफ गुड होपमार्गे वाहतूक करणे परवडणारे नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
- जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, भारतीय द्राक्ष निर्यात असोसिएशन
यंदा आपत्तीतून द्राक्ष बागा वाचवल्या. पण निर्यातीला अडथळे आले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
- कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ
निर्यात सुरू असली, तरी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार असल्याने कंटेनरच्या भाड्यात वाढ झाली आहे. तसेच द्राक्ष पोहोचण्यास वेळ लागणार असल्याने युरोपमधील बाजारपेठ काजीब करणे कठीण आहे.
- लक्ष्मण सावळकर, द्राक्ष निर्यातदार, नाशिक
सध्या द्राक्ष निर्यातीची सुरुवात आहे. सध्याची परिस्थिती आव्हानात्मक असून, त्याकडे लक्ष ठेवावे लागेल. पण फेब्रुवारी महिन्यापासून निर्यातीला गती येईल. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये चित्र बदलेल, अशी आशा आहे.
- विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मस नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com