Nursery Planning : भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका नियोजन

Vegetable Crops : भाजीपाला रोपे तयार करण्यासाठी उथळ पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. जमीन भुसभुशीत, सुपीक पाण्याचा निचरा होणारी आणि सेंद्रिय कर्ब जास्त असणारी असेल तर रोपवाटिकेतील रोपांचे दर्जेदार उत्पादन मिळते. ट्रेमध्ये देखील भाजीपाल्याच्या दर्जेदार रोपांची निर्मिती करता येते.
Nursery
NurseryAgrowon
Published on
Updated on

भरत टेमकर, डॉ. दत्तात्रय गावडे

Agriculture Management : भाजीपाला पिकांची लागवड करताना सुधारित तंत्रज्ञान आणि शिफारस केलेल्या जातींची निवड महत्त्वाची ठरते. हंगामानुसार पिकांची निवड, बाजारपेठेच्या मागणीनुसार लागवडीची वेळ लक्षता घेतली तर आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होऊ शकते. भाजीपाला पिकांमध्ये चवळी, मोहरी, झेंडू, मका या सापळा पिकांचा वापर केल्यास पीक-संरक्षणावरील खर्चात बचत होऊ शकते.

एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापनाचा अवलंब करून कमी उत्पादन खर्चात भाजीपाला पिकांचे दर्जेदार उत्पादन घेता येते. माती परीक्षणानुसार खतांचा वापर महत्त्वाचा ठरतो. कोबी, फुलकोबी, ब्रोकोली, बीट, वाटाणा, कांदा, लसूण, घेवडा, वालवड या पिकांना वाढीच्या सुरुवातीच्या काळात थंड आणि समशीतोष्ण हवामान पोषक ठरते. कांदा पिकाची रोपवाटिका तयार करताना कोरडे व धुकेविरहित हवामान रोपांच्या वाढीसाठी पोषक ठरते. थंड हवामानात धुके पडल्यास रोपवाटिकेतील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते.

भाजीपाला रोपे तयार करण्यासाठी उथळ पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.

भाजीपाला रोपांना मध्यम व कसदार जमीन मानवते. जमीन भुसभुशीत, सुपीक पाण्याचा निचरा होणारी आणि सेंद्रिय कर्ब जास्त असणारी असेल तर रोपवाटिकेतील रोपांचे दर्जेदार उत्पादन मिळते.

भारी किंवा चिकण जमिनीत पिकांची वाढ चांगली होत नाही. अशा जमिनीत कांदा, लसूण, बीट, मुळा यांची पुरेशा प्रमाणात वाढ होत नाही.

जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असल्यास रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

आम्लयुक्त जमिनीत कोबी, फुलकोबी पिकांची लागवड करू नये. अत्यंत क्षारयुक्त जमिनी भाजीपाला रोपवाटिकेसाठी निवडू नयेत. जमिनीतील चुनखडीचे प्रमाण कमी असावे. पाणी साचून राहणाऱ्या जमिनी भाजीपाला रोपांसाठी योग्य नाहीत.

Nursery
Onion Nursery Damage : कांदा रोपवाटिकांची मोठी हानी

रोपवाटिका व्यवस्थापन

रोपवाटिका करण्यासाठी ३ मीटर लांब, १ मीटर रुंद व १५ सेमी उंच या आकारमानाचे गादीवाफे तयार करावेत. वाफा चांगला भुसभुशीत करून घोळून त्यातील दगड, ढेकळे, कचरा काढून टाकावा.

प्रत्येक वाफ्यावर एक घमेले चांगले कुजलेले शेणखत, निंबोळी खत व १५:१५:१५ हे खत १५० ग्रॅम प्रमाणे मिसळून घ्यावा.

या गादीवाफ्यावर १० सेंमी अंतरावर वाफ्याच्या रुंदीसाठी समांतर रेषा पाडाव्यात. या रेषा २ ते ३ सेंमी खोलीच्या असाव्यात. अशा ओळींमध्ये बी हलक्या हाताने पेरावे. बी पेरून झाल्यावर हलक्या हाताने बी मातीने झाकावे. बियांची उगवण होईपर्यंत वाफ्यावर झारीने पाणी द्यावे.

बियाणे प्रमाण : (प्रति हेक्टरी)

कांदा : ८ ते १० किलो

टोमॅटो : १०० ते १५० ग्रॅम

कोबी : २०० ते ३०० ग्रॅम

फ्लॉवर : २०० ते ३०० ग्रॅम

ब्रोकोली : २०० ते ३०० ग्रॅम

बीजप्रक्रिया : रोपवाटिकेतील रोपांवर मर रोग, रोपे कोलमडणे, स्क्लेरोसियम, कॉलर रॉट इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रति किलो बियाण्यांस बी पेरण्यापूर्वी,

कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) किंवा

थायरम (७५ टक्के डब्ल्यूएस) किंवा

कार्बोक्सिन (३७.५ टक्के) अधिक थायरम (३७.५ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) किंवा

कार्बेन्डाझिम (२५ टक्के) अधिक मॅन्कोझेब (५० टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ते ५ ग्रॅम

या प्रमाणात बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया गरजेचे आहे.

जैविक बीजप्रक्रिया करण्यासाठी, ट्रायकोडर्मा ५ ते १० ग्रॅम या प्रमाणात प्रति किलो बियाण्यांस चोळावे. तसेच जमीन ओली असताना प्रति १०० किलो शेणखतामध्ये १ किलो ट्रायकोडर्मा मिसळून प्रति ५ गुंठे प्रमाणे जमिनीमध्ये मिसळावे.

रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी.

रोपवाटिकेची जमीन एक महिना अगोदर पाणी देऊन १५० ते २५० गेजच्या पॉलिथिनने झाकून घ्यावी. त्यामुळे सूर्यप्रकाशाद्वारे जमिनीतील हानिकारक बुरशी आणि तणांचे बीज नष्ट होईल.

रोपवाटिकेत तण नियंत्रणासाठी खुरपणी करावी. तणनाशकाचा वापर टाळावा.

रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आठ दिवसांच्या अंतराने कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. शक्य असल्यास सर्व गादीवाफ्यावर मच्छरदाणीसारख्या जाळीचा वापर करावा.

गादीवाफ्यावर कोबी, फुलकोबीची रोपे २० ते २४ दिवसांत, वांगी, कांदा पिकाची रोपे ८ आठवड्यांत, तर टोमॅटो, मिरची या पिकांची रोपे ३ ते ४ आठवड्यांत तयार होतात.

Nursery
Crop Loan : सांगली जिल्ह्यात खरिपात १६८० कोटींचे पीककर्ज वितरण

जैविक खतांचा वापर

जमिनीच्या सुपीकतेबरोबरच जमिनीची सजीवता वाढवणे महत्त्वाचे आहे. ॲझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पी.एस.बी.), पालाश उपलब्ध करणारे जिवाणू या जैविक खतांचा वापर भाजीपाला रोपवाटिकेमध्ये फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे (ॲग्रेसको शिफारस). कॅल्शिअम नायट्रेट २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात गरजेनुसार फवारावे.

गादीवाफ्यावर रोपांचे हार्डनिंग

साधारणतः ४ ते ५ आठवड्यांत रोपे १२ ते १५ सेंमी उंचीची होतात. त्या वेळी त्यांची पुनर्लागण करावी. रोपवाटिकेमध्ये संरक्षित वातावरणात रोपे तयार झालेली असतात. मुख्य शेतामध्ये ही रोपे लावल्यानंतर कडक सूर्यप्रकाश, अपुरा पाणीपुरवठा, जोराचा वारा इत्यादी घटकांमुळे रोपांची मर मोठ्या प्रमाणावर होते. हे टाळण्यासाठी रोपवाटिकेत गादीवाफ्यावरच रोपांचे हार्डनिंग करावे. त्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

गादीवाफ्यावर केलेली सावली काढून टाकावी. रोपे गादीवाफ्यावर असतानाच कडक सूर्यप्रकाश सहन करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला हवी.

गादीवाफ्यावर पाणी देण्याचा कालावधी हळूहळू वाढवावा. जेणेकरून कमी पाण्यात तग धरून राहण्याची क्षमता रोपांमध्ये निर्माण होईल.

रोपवाटिकेभोवती वारा येऊ नये म्हणून आडोसा केला असेल तर तो काढून टाकावा. म्हणजे जोराचा वारा सहन करण्याची शक्ती रोपांमध्ये येईल.

गादीवाफ्यावरून रोपे उपटण्याच्या आदल्या दिवशी, गादीवाफ्यावर भरपूर पाणी द्यावे. जेणेकरून रोपे उपटताना सुलभ जातात. रोपांची मुळे तुटत नाहीत.

रोपे उपटल्यानंतर ताबडतोब जुडी बांधून सावलीमध्ये ठेवावीत. ओलसर कापडाने ही रोपे झाकावीत.

या रोपांची वाहतूक करताना बांबूच्या टोपल्या किंवा क्रेटचा वापर करावा. रोपांवर कडक ऊन पडणार नाही याची काळजी घ्यावी.

रोपांची पुनर्लागण

टोमॅटो, मिरची, वांगी, कांदा या रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बुडवून नंतर लागवड करावी. त्यामुळे रोपांचे मूळकुज, खोडकुज, कंदकुज या रोगांपासून संरक्षण होते. (ॲग्रेस्को शिफारस)

टोमॅटो, मिरची, वांगी पिकांची लागवड सरी वरंब्यावर करावी. कांदा पिकाची लागवड सपाट वाफ्यावर किंवा गादीवाफा पद्धतीने करावी.

प्लॅस्टिक ट्रेमध्ये रोपे निर्मिती

रोप निर्मितीसाठी बाजारामध्ये विविध प्रकारचे ट्रे उपलब्ध आहेत. ७० कप, ९८, १०२ कप इत्यादी प्रकारचे ट्रे टोमॅटो रोप निर्मितीसाठी वापरता येतात. ट्रेमध्ये कोकोपीट वापरून रोपे तयार करता येतात. एका ट्रेमध्ये साधारणतः १.२५ किलो कोकोपीट बसते.

कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करून ट्रेमध्ये कोकोपीट भरावे. हे ट्रे एकमेकांवर रचून ठेवले असता ०.५ सेंमी खोल दाबले जाते. त्यामध्ये एकेक बी टाकून पुन्हा कोकोपीट भरावे. झारीच्या साह्याने पाणी द्यावे. हे ट्रे पसरवून अथवा एकमेकांवर ठेवून प्लॅस्टिक पेपरच्या साह्याने झाकून ठेवावेत. साधारणपणे ४८ ते ७२ तासांमध्ये बियाण्यांस अंकुर फुटतात. त्यावेळी हे प्लॅस्टिक काढून ट्रे शेडनेट किंवा पॉलिहाउसमध्ये किंवा इनसेक्टनेटमध्ये ठेवावेत. त्यांना वेळोवेळी पाणी देणे गरजेचे असते. साधारणतः ५ ते ७ दिवसांत बियाणे उगवण्यास सुरुवात होते.

टोमॅटो, कोबी, फ्लॉवर व ब्रोकोलीची रोपे २१ ते २५ दिवसांत, तर कांद्याची रोपे ४० ते ४५ दिवसांत पुनर्लागणीसाठी तयार होतात.

ट्रेमधील रोप उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी रोपांवर १९ः१९ः१९ या विद्राव्य खतांची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच झिंक, फेरस, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, बोरॉन यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा जमिनीतून किंवा फवारणीद्वारे फायदेशीर ठरतो.

भरत टेमकर, ९४२२५१९१४३

डॉ. दत्तात्रय गावडे, ९४२१२७०५१०

(कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com