
Solapur News : राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या (एनटीपीसी) सोलापूर येथील ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी कोळशामध्ये मिसळण्यासाठी बांबू बायोमास खरेदी करणार आहे. यादृष्टीने शाश्वत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत पन्नास वर्षांसाठी प्रारंभिक करार केले जातील, असे ‘एनटीपीसी’चे अध्यक्ष गुरदीप सिंह यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एनटीपीसी’च्या अध्यक्षांना आठवड्यापूर्वीच धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी धोरणे आखण्याच्या उद्देशाने पत्र लिहिले होते. त्यानंतर नुकतीच मुंबईत ही बैठक बोलावण्यात आली होती. त्यात सिंह यांनी ही माहिती दिली. या बैठकीला महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी,
मुख्यमंत्र्यांच्या पर्यावरण आणि शाश्वत विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल, ‘एनटीपीसी’चे सोलापूर प्रकल्प प्रमुख तपनकुमार बंदोपाध्याय, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, ‘एनटीपीसी’चे प्रादेशिक कार्यकारी संचालक कमलेश सोनी, मित्रा आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
श्री. सिंह म्हणाले, की सोलापूर येथील ‘एनटीपीसी’ संयंत्रासाठी दरवर्षी चार दशलक्ष इतक्या कोळशाची गरज असते. सुरुवातीच्या टप्प्यात दहा टक्के बायोमास मिसळल्यास दरवर्षी अंदाजे ४००,००० टन बायोमास लागेल. बांबूंची उपलब्धता जसजशी वाढत जाईल तसतसे हे प्रमाण २०-३० टक्के वाढवता येईल.
बांबू बायोमासची खरेदी लगेच करण्यासाठी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत दीर्घ कालावधीचे करार करण्यासाठी एनटीपीसी तयार आहे. या उपक्रमामुळे सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होईल, असेही ते म्हणाले. तसेच एनटीपीसीच्या अध्यक्षांनी या बैठकीत अशा प्रकारच्या पहिल्यांदाच होत असलेल्या या उपक्रमाचा तपशील यावेळी सांगितला.
बांबूसाठी ‘मनरेगा’चा लाभ घ्यावा
या वेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले, की कालव्यांच्या, रस्त्याच्या कडेला आणि शेतांजवळ मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली जाते आणि सोलापूर एनटीपीसी प्रकल्प पूर्णपणे बांबू बायोमास वापरू शकतो, ही बाब शेतकऱ्यांना आणि शाश्वत लागवड पद्धतींसाठी उपयुक्त ठरेल, शेतकऱ्यांनी ‘मनरेगा’द्वारे देण्यात येणारे प्रति हेक्टर ७.०४ लाख रुपये यासारख्या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.