

प्रताप पवार
Agri Tech India: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि काटेकोर शेती तंत्रज्ञानाचा वापर करून आता पीक उत्पादन वाढविणे शक्य आहे. त्यासाठी नवीन पीकपद्धती उपयोगात आणणे आवश्यक आहे. यातून पाणी, खत, मजूर आणि वेळेची बचत होणार आहे. याचबरोबरीने जमिनीचा पोत सुधारून गुणवत्तापूर्ण पीक उत्पादन वाढीला चालना मिळेल हे सिद्ध झालेे आहे.
आपण गेल्या काही दिवसांपासून बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबद्दल बोलत आहोत, चर्चासत्रे करीत आहोत, त्याच्या उपयुक्ततेबद्दल आता फारशा शंका राहिल्या नाहीत. परंतु लोकांचा एक असा समज झाला आहे, की फक्त ऊस बागायतीसाठी हे तंत्रज्ञान आहे. त्यात तथ्यही आहे, परंतु ते पूर्णपणे नाही. कारण कोठेतरी सुरुवात करावी लागते.
ऊस हे महाराष्ट्राच्या अर्थकारणातील सर्वांत महत्त्वाचे आणि मूल्यसाखळी असलेले पीक आहे. यामुळे साहजिकच आम्ही पहिल्या टप्यांत ऊस पिकामध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला. मात्र हे तंत्रज्ञान सर्व पिकांसाठी कशा पद्धतीने वापरता येईल, याचे विचारमंथन आणि प्रत्यक्ष शेतीमध्ये प्रयोग बारामतीमध्ये केव्हाच सुरू झाले आहेत. पुढील १ ते २ वर्षांत त्याचे निष्कर्ष समोर येतील. हे प्रयोग करताना सध्या आहे या परिस्थितीत आणखी काय करता येईल का, याचाही विचार सतत सुरू आहे.
ऊस हे नगदी आणि खात्रीचे पीक असल्याने शेतकरी त्याला प्राधान्य देत होते, आजही देत आहेत. काही कारखानदारांशी बोलताना असे समजले, की जूनमध्ये ऊस लागवड करता यावी यासाठी शेतकरी सर्व प्रकारचे प्रयत्न करतात, त्यात वादविवाद होतात. याचे कारण मी समजावून घेतले. पंधरा किंवा अगदी अठरा महिन्यांनी ऊसतोड झाली तरी पुढील लागवडीच्या आधी पाच सहा महिने शेत रिकामे असते. या काळात शेतकरी गव्हाचे पीक घेऊ शकतो, म्हणजेच दोन वर्ष किंवा २४ महिन्यांत एक उसाचे पीक आणि एक गव्हाचे पीक घेण्याची धडपड शेतकरी करतो.
आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान यशस्वीपणे हाती आल्याने आम्ही बारामतीमध्ये एक योजना आखली, या योजनेबद्दल काही तज्ज्ञांशी चर्चा केली. साधारण २४ महिन्यांच्या कालावधीमध्ये आता आपण दोन नव्हे, तर तीन पिके घेऊ शकू. आर्थिक लाभाशिवाय इतरही काही लाभ मिळवता येतील का, याचाही विचार झाला आणि तो शक्य होईल का, याचे नियोजन सुरू झाले. आता आवश्यकता आहे ती शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्या सहकार्याची, प्रयोगशील वृत्तीची.
चोवीस महिन्यांचा पीक आराखडा
आता आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून केलेला चोवीस महिन्यांतील पीक नियोजनाचा आराखडा आपल्यासमोर मांडत आहोत. उदा. ः १५ जून २०२५च्या सुमारास सोयाबीन लागवड करावी. योग्य व्यवस्थापनात हे पीक १५ ते ३० सप्टेंबर २०२५पर्यंत काढणीस येईल. त्यानंतर मशागत करून १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत उसाच्या लागवडीचे नियोजन करावे. ऊस लागवड करताना महत्त्वाची बाब म्हणजे पाणी, खत व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करणे उपयुक्त ठरेल.
तसेच आम्ही शिफारशीत केलेल्या ऊस जातीच्या रोपांची लागवड करणे महत्त्वाचे आहे. यामुळे वेळ, पाणी, खत आणि पीक व्यवस्थापन खर्च वाचेल. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे हा ऊस तोडणीसाठी बारा महिन्यात म्हणजे १५ ऑक्टोबर २०२६मध्ये तयार असेल. पुढे १ नोव्हेंबर २०२६ किंवा फार तर १५ डिसेंबर २०२६पर्यंत जमीन गहू किंवा हरभऱ्यासारखे रब्बी पीक लागवडीसाठी उपलब्ध होऊ शकेल. म्हणजेच आता तिसरे पीक मार्च २०२७च्या मध्यापर्यंत कापणीसाठी तयार असेल.
त्यानंतर १ एप्रिल ते मे २०२७ दरम्यान हिरवळीचे पीक म्हणजे ताग किंवा धैंचा घेता येईल. याचा जमिनीचा पोत वाढविण्यासाठी फायदा होईल. अशा पद्धतीने आपल्याला २४ महिन्यांत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे दोनऐवजी तीन पिकांची लागवड करणे शक्य होणार आहे. या तीन पिकांमुळे शेतकऱ्यांना आणखी आर्थिक लाभ होईल. शिवाय कदाचित पुढील वर्षामध्ये खतांची आवश्यकता आणखी कमी होईल असे वाटते.
आम्ही असा प्रयत्न करीत आहोत, की प्रति वर्षी शेतकऱ्याला कोणत्याही पिकात एकरी किमान एक लाख रुपयांचा नफा व्हायला हवा आणि हे नवीन तंत्रज्ञानाच्या अवलंबाने शक्य होईल असा विश्वास आहे. या प्रयोगाच्या प्रात्यक्षिकासाठी प्रत्येक गावात सुमारे दहा एकर जमीन संबंधित विभागातील साखर कारखान्याने बारामतीच्या ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ला उपलब्ध करून द्यायला हवी. या प्रात्यक्षिक प्रयोगामध्ये संबंधित शेतकऱ्यांचा सहभाग असणे महत्त्वाचे असेल.
त्यामुळे संबंधित गावातील शेतकरी पीक लागवड आणि नवीन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहू शकतील. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्याचे दिसल्यावर संपूर्ण गावातील शेतकरी या पीक पद्धतीचे अनुकरण करतील असा विश्वास वाटतो. या पीक लागवड तंत्रामध्ये उसाबरोबर आपण धान्य म्हणजे गहू, तेलबिया पीक म्हणजे सोयाबीनचा समावेश केला आहे. समाजाची अन्नधान्याची भूक भागविण्यासाठी हे पीक नियोजन आणि व्यवस्थापन उपयुक्त ठरेल.
सुदैवाने गेल्याच आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाने पाठविलेले शिष्टमंडळ बारामतीच्या प्रक्षेत्रावर येऊन गेले. या तंत्रज्ञानाबाबत त्यांच्या सर्व शंकांचे समाधान झाले आहे, असे आमचे मत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने हे तंत्रज्ञान वापरले जाण्यासाठी सक्रिय सहभाग मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
लेखात नमूद केल्याप्रमाणे जमिनीचा सर्वोत्तम परिपूर्ण उपयोग (म्हणजे १२ महिने) विविध पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी केला जावा. एकही दिवस जमीन अनुत्पादक राहू नये हेच आपल्या प्रयत्नांचे साध्य आहे. सुदैवाने परदेशातून म्हणजे व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि भारतातून तमिळनाडू राज्यातून आपले तंत्रज्ञान वापरण्यासाठी पाठपुरावा होत आहे, ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्मार्ट शेती करणारांसाठी हा टर्निंग पाइंट ठरणार आहे. या क्षेत्रात नव्याने काही प्रयोग करू पाहणाऱ्या सर्व प्रगतिशील तरुण आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना ही चांगली संधी आहे. शेतकरी कुटुंबातील तरुणांनो आता तरी तुम्ही याचा उपयोग करून घ्याल का...
उसाचे हंगामनिहाय नियोजन
हंगाम महिना कालावधी पिकाखालील क्षेत्र
आडसाली जुलै ते ऑगस्ट १६ ते १८ महिने २० टक्के
पूर्व हंगामी ऑक्टोबर ते नोव्हेंबर १२ महिने (कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर) ४० टक्के
सुरु आणि खोडवा डिसेंबर ते फेब्रुवारी १२ महिने (कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर) ४० टक्के
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.