Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Water Issue : राज्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून टँकरने पाणीपुरवठा वाढला असला तरी अनेक वाड्या आणि गावांत पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Mumbai News : राज्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून टँकरने पाणीपुरवठा वाढला असला तरी अनेक वाड्या आणि गावांत पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहे. सध्या राज्यातील ७,४९५ गावे आणि वाड्यांमध्ये २,७३७ टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे.

निवडणुकीच्या प्रचारात ‘हर घर नल से जल’ची सरकार जाहिरात करत असले तरी धरणांतच पाणी नाही तर नळातून पाणी कुठले देणार, असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. पावसाळ्यात सरसरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. शिवाय अनेक भागांत सप्टेंबरपासून पाऊस झाला नाही, परिणामी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात आहे.

सध्या राज्यातील मोठ्या धरणांमध्ये केवळ २८.४२ टक्के पाणीसाठा आहे, तर मध्यम प्रकल्पांत ३७.४४ आणि लघू पाटबंधारे प्रकल्पांत २९.९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या दहा दिवसांत झपाट्याने पाणीपातळीत घट होत असून अद्याप मॉन्सूनच्या पावसाला उशीर असल्याने पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण होणार आहे.

२० एप्रिल रोजी राज्यातील धरणांमध्ये ३१ टक्के पाणीसाठा होता, तो झपाट्याने कमी होत असून नऊ दिवसांत तो २८ टक्क्यांवर आला आहे. अनेक प्रकल्पांतील पाणीवापरावर निर्बंध घातले असून नदीकाठावरील वीज कनेक्शन बंद केली आहेत. पिके करपत असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न उभा राहिला आहे.

Water Scarcity
Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

केंद्र सरकारने पिण्याच्या पाण्यासाठी पुढील तीस वर्षांचा आराखडा तयार करून राबविलेली ‘जलजीवन मिशन’ ही योजना पाण्याअभावी कोरडी पडल्याचे चित्र गावोगावी आहे. ‘हर घर नल से जल’ असा गाजावाजा करत ही योजना राबविली खरी पण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांना स्थानिक पातळीवर कात्रजचा घाट दाखवीत ड्राय झोनमध्ये अनेक ठिकाणी जॅकवेल बांधली गेली आहेत. त्यामुळे योजनांना पाणीच नसल्याचे चित्र आहे. परिणामी ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ या उक्तीप्रमाणे जॅकवेलमध्ये पाणीच नाही तर नळातून कुठे येणार असे समजून नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

टँकरमध्ये झपाट्याने वाढ

जायकवाडी प्रकल्पात केवळ वापरण्यायोग्य नऊ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने छत्रपती संभाजीनगरात अभूतपूर्व पाणीटंचाई सुरू आहे. आठ ते नऊ दिवसांनी येथे पाणीपुरवठा होत असून सध्या येथे ५३९ टॅँकरनी पाणीपुवरठा केला जात आहे.

एक एप्रिल रोजी राज्यात १,५२२ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, तो आकडा २९ एप्रिल रोजी २,७३७ टँकरवर गेला आहे. तर गावांची संख्या १,२३३ वरून २,१८४ वर तर वाड्यांची संख्या दुप्पट झाली असून २,७७५ वरून ५,३११ वर गेली आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा गेल्या नऊ दिवसांत १२.९४ वरून ९.२९ वर आला आहे.

छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ जालन्यात ४०८, बीडमध्ये ३१०, पुणे १७१, साताऱ्यात १८४, सोलापुरात १२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कोकण विभागात ११४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून मुंबई शहराला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात ३९ टँकर सुरू आहेत.

रायगडमध्ये २९, तर पालघरमध्ये ३९ टँकरद्वारे ४९० वाड्या आणि १३० गावांत पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिमध्ये २४९ गावे आणि ५३५ वाड्या तहानल्या असून तेथे २५९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला आहे. जळगावमध्ये ६२ गावांमध्ये ८२ टॅँकर सुरू आहेत, तर नगरमध्ये २२७ गावे आणि १,२५२ वाड्यांमध्ये २३२ टँकर सुरू आहेत. बुलडाण्यात ४६ गावांत पाणीटंचाई असून, तेथे ४७ टँकर सुरू आहेत.

Water Scarcity
Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

खासगी टँकरमालकांची चलती

सध्या राज्यात २७३७ टँकरद्वारे विविध ठिकाणी पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये ९१ सरकारी टँकरमधून, तर २,६४६ खासगी टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये ४० हजार ४८५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून त्यापैकी केवळ १२ हजार ११० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपयुक्त आहे. त्यामुळे पुढील किमान दीड महिना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

मागील वर्षीपेक्षा भीषण पाणीटंचाई

सरकारी आकडेवारीनुसार मागील वर्षी केवळ १०१ टँकर्समधून पाणीपुरवठा केला जात होता. २५९ वाड्या आणि १११ गावांमध्ये पाणीटंचाई होती. ही आकडेवारी सध्या कित्येक पटींनी वाढली असून प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com