
Nanded News : नांदेड जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. २०२४ मध्ये जिल्ह्यातील १६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनाकडे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा वारसाला देण्यासाठी पैसे नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून ९० प्रकरणांत वारसांना छदामही देण्यात आला नसल्याची बाब समोर आहे.
नांदेडमध्ये मागील सतरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. यात २०१४ पासून वाढ झाली. सततचा ओला किंवा कोरडा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. जिल्ह्यात सतत चार वर्षे शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागला. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी. यातूनही चुकून समाधानकारक पाऊसपाणी झालेच तर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जातात.
काही दिवसांच्या पावसातच महिनाभराची सरासरी गाठली जाते. यामुळे निर्सगावर अवलंबून असलेला हंगाम हातून जातो. यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याचे दिसून येत आहे. २०२४ या वर्षातही १६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यातील १४९ प्रकरण मदतीसाठी पात्र ठरले आहेत. एक प्रकरण अपात्र ठरले आहे. तर १६ प्रकरणात कागदपत्राची प्रतीक्षा असल्याने ते प्रलंबीत आहेत. तसेच दोन प्रकरणात फेर चौकशी लावली आहे.
दरम्यान पात्र ठरलेल्या १४९ प्रकरणांतील केवळ ५९ प्रकरणांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आली आहे. तर तब्बल ९० प्रकरणांत बाधित कुटुंबाला मदत देण्यात आली नाही. याबाबत अधिक माहिती घेतली. मागील मे २०२४ आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये निधी मिळाला होता. यानंतर चार महिन्यांपासून प्रशासनाकडे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला देण्यासाठी निधी नसल्याची बाब समोर आली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठीच्या अनेक कल्याणकारी योजनांचा निधी इतर कामासाठी वळविल्यामुळे गरज असलेल्या लाभार्थ्यांना मदतीसाठी शासकीय कार्यालयाकडे खेटे मारावे लागत आहेत.
मागील १० वर्षांत १५४७ आत्महत्या
वर्ष शेतकरी आत्महत्या
२०१४ ११८
२०१५ १९०
२०१६ १८०
२०१७ १५३
२०१८ ९८
२०१९ १२२
२०२० ७७
२०२१ ११९
२०२२ १४७
२०२३ १७५
२०२४ १६७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.