
Pune News : वंचित आणि पीडित शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी योजना निघतात; मात्र त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नसल्यामुळे शेतकऱ्याची कशी वणवण होते याचे धक्कादायक उदाहरण वेळवंड खोऱ्यातील धोंडिबा भांबू गोरे याच्या घरात बघण्यास मिळते.
नीरा आणि वेळवंडी अशी दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांमधून जाणाऱ्या घाटमाथ्यावरील पर्वतरांगेत धोंडिबा एका पाड्यावर राहतो. साळंगुण ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील ३०० लोकसंख्येच्या सांगवी गावाच्या दऱ्याडोंगरात ५२ वर्षीय धोंडिबाची शेती आहे.
धोंडिबा गोरे, त्याचा चुलता तुकाराम गोरे, बहीण गंगूबाई आबाजी कचरे आणि आई भागाबाई भांबू कचरे अशी संयुक्तपणे ५० एकर शेती करतात. अर्थात, अतिपावसाळी प्रदेशामुळे भात, नाचणी, वरईसोडून धोंडिबाला इतर पिके घेता येत नाहीत.
‘‘एकदा भात, नाचणी शेतीमधील कामे संपली की वर्षभर गायीगुरे सांभाळणे हाच आमचा व्यवसाय असतो. टीव्ही, रेडिओवर आम्ही अनेक सरकारी योजनांची माहिती ऐकतो; परंतु त्या आमच्यापर्यंत का पोहोचत नाहीत हे कळत नाही. माझ्या आईला श्रावणबाळ योजनेचे मासिक ६०० रुपये मिळतात.
मात्र मला मोदींची (पीएम किसान सन्मान निधी योजना) मदत मिळालेली नाही,’’ असे धोंडिबा मनमोकळेपणे सांगतो. त्याला योजनेचे नावदेखील पूर्ण माहीत नाही. धोंडिबाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसल्याने तो आपोआप ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’पासून देखील वंचित आहे. कारण ‘पीएम’चा लाभार्थी हाच ‘नमो’चा लाभार्थी असावा, असा नियम राज्य शासनाचा आहे.
गावातील इतर शेतकऱ्यांना मोदी योजनेचे पैसे मिळतात व मला मात्र वंचित ठेवल्याचे सांगून धोंडिबा खिन्न होतो. ‘‘काही महिन्यांपूर्वी मी बॅंकेच्या खातेपुस्तकाची झेरॉक्स, रेशन कार्डची प्रत आमचे सरपंच राजेश रांजणे यांना दिली होती. मात्र काही केल्या मदत मिळत नाही आणि काय अडचण आहे ते मला कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यानेही कधी सांगितले नाही. घरकुल योजनेला माझे नावे आले. परंतु प्रत्यक्षात मदत न मिळाल्यामुळे घरबांधणीदेखील थांबली आहे,’’ अशी कैफियत धोंडिबा मांडतो.
दारिद्र्यामुळे मुलांच्या शिक्षणाची परवड
शेतकरी धोंडिबाला चार मुले आहेत. मात्र दारिद्र्यामुळे मुलांच्या शिक्षणाची दाणादाण झाली आहे. जगण्यासाठी मजुरी महत्त्वाची वाटत असल्यामुळे मुले शिकू शकलेली नाहीत, असे धोंडिबा सांगतो. मोठा मुलगा रमेशने दहावीमध्ये शाळा सोडली व तो रस गुऱ्हाळात कामाला लागला. दुसरा मुलगा सुरेशने आठवीत शाळा सोडली आहे. तिसरा मुलगा गणेश अजून अकरावीत; तर छोटा मुलगा उमेश नववीत कसाबसा शिकतो आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.