
Mumbai News : शरद पवार गटाच्या आठपैकी सात खासदारांना अजित पवार गटाकडून संपर्क केला जात असून त्यांना अजित पवारांबरोबर येण्याची ऑफर दिल्याची चर्चा दिल्लीसह मुंबईत रंगली आहे. पवार गटाच्या खासदारांशी दिल्लीसह राज्यातील काही नेत्यांनी संपर्क केल्याचे सांगण्यात आले. मात्र, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र त्यास नकार दिला.
सुनील तटकरेंनी अजित पवार गटाच्या खासदारांना संपर्क केल्यानंतर याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना फोन करून तटकरेंबाबत नाराजी व्यक्त केल्याचीही सांगण्यात येत आहे. याप्रकरणी सोनिया दुहान यांनीही शरद पवार गटाच्या खासदारांना संपर्क करून ऑफर दिल्याचे काही खासदारांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आले आहेत. यातील सुप्रिया सुळे वगळता इतर सात खासदारांना अजित पवार गटाकडून संपर्क केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
या चर्चा सुरू झाल्यानंतर याबाबत स्पष्टीकरण देताना तटकरे म्हणाले की, ‘आमच्याकडून तसा कोणताही प्रयत्न केलेला नाही, कुणालाही फोन गेला नाही. दिल्लीत अनेक कार्यक्रमात खासदार भेटतात. त्या वेळी काही चर्चा होते. पण अशा प्रकारचा संपर्क मी केलेला नाही, तसेच आमच्याकडून कुणालाही फोन गेला नाही. केवळ चर्चेत राहण्यासाठी केला गेलेला हा प्रयत्न आहे.’ सोनिया दुहान या काही आमच्या पक्षात नाहीत. त्यांना आमच्याकडून कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असेही तटकरे म्हणाले.
सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये काय चर्चा झाली याबद्दल मला काही माहिती नाही. पण कुणी, कुठे, काय बोलले आहे याची माहिती मी योग्य वेळी देईन. २०१४ पासून २०२४ पर्यंत राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्यासाठी काय प्रयत्न केले हे योग्य वेळी सांगेन, अशा इशाराही तटकरे यांनी दिला आहे.
दुहान यांच्याकडून संपर्क : खासदार अमर काळे
राष्ट्रवादी शरद पवार गटातून काँग्रेसमध्ये गेलेल्या सोनिया दुहान आमच्यासमवेत संपर्क साधत होत्या आणि त्यांनी आपण अजित पवार गटासमवेत चला, असा आग्रह केला होता, असे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी सांगितले. जर विकासकामे करायची असतील तर तुम्हाला एनडीएमध्ये आल्याशिवाय पर्याय नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या.
केवळ अमर काळेच नाही तर नीलेश लंके, भास्कर भगरे, धैर्यशील मोहिते-पाटील, बजरंग सोनावणे यांच्यासह सात खासदारांशी त्यांनी संपर्क साधला होता. सुनील तटकरे यांनी कधीही आमच्याशी संपर्क साधला नाही, असेही काळे म्हणाले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत आम्ही तक्रार केली आहे, अशी माहितीही काळे यांनी पत्रकारांना दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.