
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील २५२ कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय संस्थाकडून कामे सुरू आहेत, परंतु काही अशासकीय संस्था संबंधित शासकीय यंत्रणेला कोणतीही पूर्वसूचना न देता कामे सुरू करत आहेत, ही बाब अत्यंत चुकीची असून, अशासकीय संस्थांनी पुढील कामे कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू करू नयेत, अन्यथा अशा संस्थांना काळ्या यादीत टाकले जाईल याची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. या वेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, वरिष्ठ भू-वैज्ञानिक मुस्ताक शेख यांच्यासह सर्व समिती सदस्य, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की अशासकीय संस्थांना गाळमुक्त धरण अंतर्गत कामे करताना शासकीय यंत्रणांकडून सहकार्य करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने अशासकीय संस्थांनीही शासनाने घालून दिलेल्या विहित अटी व शर्तीनुसार कामे केली पाहिजेत. अशासकीय संस्थांच्या ज्या काही अडचणी येथे मांडण्यात आलेल्या आहेत, त्या नक्कीच सोडवण्यात येतील, परंतु या संस्थांनी गाळ काढण्याचे कोणतेही काम सुरू करताना संबंधित शासकीय यंत्रणेला पूर्वकल्पना द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
६५ रद्द कामांच्या कारणांचा अहवाल द्या
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५२ कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान देण्यात आली होती, त्यातील ८१ कामे पूर्ण झालेली आहेत. सद्यःस्थितीत २७ कामे सुरू आहेत, तर ७९ कामे सुरू झालेली नाहीत. जी कामे सुरू झाली नाहीत, ती कामे आचारसंहिता संपल्यानंतर तत्काळ सुरू करावीत. तसेच मंजूर कामातून ६५ कामे रद्द करण्याची शिफारस संबंधित यंत्रणांनी केली आहे. ती का रद्द करावीत याचा अहवाल कारणासह तत्काळ प्रशासनाला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.
१६०० शेतकऱ्यांना गाळाचा लाभ
जिल्हा जलसंधारण अधिकारी दामा यांनी या अभियानांतर्गत ८१ कामे पूर्ण झालेली आहेत. या कामापैकी ५२ कामे २०२३ मध्ये पूर्ण होऊन, त्यातून २१.३३ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला असून, तो अंदाजे ६०० हेक्टर क्षेत्रावर टाकला आहे, त्याचप्रमाणे २०२४ मध्ये २९ कामांमधून २०.६१ लक्ष घनमीटर काढून, तो अंदाजे ५५० हेक्टर क्षेत्रावर पसरवलेला आहे, यातून जवळपास १ हजार ६०० शेतकऱ्यांना लाभ झाला आहे, एकूण ०.१४८ टीएमसी पाणी साठवण क्षमता निर्माण झालेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.