Dryland Farming: कोरडवाहू क्षेत्रासाठी स्वयंसेवी संस्था ठरल्या वरदान

NGO Initiatives: कोरडवाहू भागातील शेतीसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वयंसेवी संस्था नवसंजीवनी देत आहेत. लोकसहभागाच्या जोरावर हे गाव विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. पाणीटंचाई, शेती सुधारणा, पर्यटन, रोजगार आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी केलेल्या प्रयत्नांची ही यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.
Agricultural Innovation
Agricultural InnovationAgrowon
Published on
Updated on

Pune News: अडचणीत सापडलेल्या कोरडवाहू कृषी व्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी स्वयंसेवी संस्था कौतुकास्पद कामे करीत आहेत. सरकारी यंत्रणेला दोष न देता लोकसहभागातून विविध प्रकल्पांद्वारे कोरडवाहू गावांना विकासाच्या वाटेवर आणणाऱ्या या संस्थांच्या अचंबित करणाऱ्या गाथा ‘विकास संवाद’मध्ये ऐकण्यास मिळाल्या.

‘रिव्हायटलायझिंग रेनफेड अॅग्रीकल्चर (आरआरए) नेटवर्क’ व ‘विकास संवाद’ यांनी संयुक्तपणे दोन दिवसीय संवाद उपक्रमाचे आयोजन पुण्यात केले होते. ‘शेतीची सद्यःस्थिती आणि कोरडवाहू क्षेत्रातील अनुभव’ या विषयावर राज्यभरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या यशस्वी गाथा यावेळी कथन केल्या.

Agricultural Innovation
Dryland Agriculture Research : कोरडवाहू शेती संशोधनाची चौकट बदलावी लागेल ; डॉ. सुरेशकुमार चौधरी

भकास भोमाळे गाव उजळले

पुण्याच्या खेड तालुक्यातील भोमाळे गाव कोरडवाहू शेतीशिवाय काहीही करू शकत नव्हते. दारिद्र्यात खितपत पडलेल्या या गावातील शेतकऱ्यांना ‘कल्पवृक्ष’ स्वयंसेवी संस्थेने ‘आरळा व्हॅली कॅम्प साइट’ सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याबाबत युवा शेतकरी दीपक पवार, समीर पवार यांनी अनुभव कथन केले.

‘‘आम्हाला जगण्यासाठी कोणतीही साधने नव्हती. परंतु, पर्यटन केंद्र चालू करण्याची युक्ती आणि त्यासाठी पाठबळदेखील आम्हाला ‘कल्पवृक्ष’ने दिले. गावकुसात जैवविविधता व निसर्गविषयक उपक्रम राबविले. त्यामुळे आता गावाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. गेल्या वर्षी आम्ही सहा लाखांची उलाढाल केली व पावणे दोन लाखांचा नफा कमावला,’’ असे या युवकांनी सांगितले.

Agricultural Innovation
Dryland Farming : कोरडवाहू शेतीकडे तरुणांचा ओढा आहे का?

महिलांनी केले तलाव पुनरुज्जीवित

‘पीट फाउंडेशन’ शालू कोल्हे यांनी यशोगाथा सांगितली. ‘‘भंडारा, गोंदिया तलावांचे जिल्हे ओळखले जात होते. मात्र, शेतीसारखीच तलावांचीही दुरवस्था झाली होती. बुजलेल्या तलावातील जैवविविधता संपली होती. आम्ही शासनाशी पत्रव्यवहार करून थकलो. शेवटी महिलांनी श्रमदान केले. रोहयोमधून तलाव पुनरुज्जीवित करीत ४३ गावांमधील ६३ तलाव जिवंत केले. यामुळे शेतकरी, महिला, तरुणांना रोजगार मिळाला आहे,’’ असे श्रीमती कोल्हे यांनी सांगितले.

भूमिहीन शेतकऱ्यांसाठी उभारली चळवळ

धुळे येथील विकास मंचचे प्रमुख विनोद पगार यांनी, भूमिहीन शेतकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारा पहिला प्रयोग धुळे जिल्ह्यात राबविला जात असल्याचे सांगितले. ‘‘भूमिहीन शेतकऱ्यांना बॅंकांमध्ये खाते उघडू दिले जात नाही. शासन दरबारी त्यांना माणूस म्हणून वागणूक मिळत नाही. त्यासाठी आम्ही संघर्ष चालू केला. एका भूमिहीन महिलेला बॅंकेत खाते उघडण्यासाठी सात महिने वणवण फिरावे लागले. तिला २५ हजाराचे कर्ज मंजूर होईपर्यंत तिचे २२ हजार रुपये खर्च झाले होते. मात्र, आता भूमिहीन वर्गाला स्थान मिळू लागले आहे,’’ असे श्री. पगार यांनी नमूद केले.

वर्धा येथील किसान अधिकार अभियानाचे प्रमुख अविनाश काकडे, कन्हैयालाल पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष कृषिभूषण भीमराव बोरसे, प्रगती अभियानाचे कार्यक्रम समन्वयक संगीता जाधव, ‘ग्राम आरोग्य-घाटी’च्या समन्वयिका मीनाक्षी नाकाडे तसेच इतर संस्थांनी कोरडवाहू भागातील आपापले कार्य कथन केले.

कोरडवाहू क्षेत्रात शासन व संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेले विविध उपक्रम राज्यासाठी दिशादायक ठरले आहेत. ते वाढविण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. या उपक्रमाचे नियोजन ‘विकास संवाद’चे सहयोगी संचालक राकेश मालवीय, निधी तिवारी व ‘आरआरए नेटवर्क’चे राज्य समन्वयक सजल कुलकर्णी, प्रफुल्ल कालोकार यांनी केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com