
Agricultural Policy : कोरडवाहू भागातील शेतकरी कुटुंबातील तरुणांचा शेती करण्याकडे ओढा नाही. एकंदर तरुणांना उपजीविकेचे साधन म्हणून शेती करावी असे का वाटत नाही? अनेक तरुण इतर क्षेत्रात रोजगारांची संधी उपलब्ध नसल्यामुळे नाइलाजाने शेती करत असल्याचे सांगतात. शेतकरी कुटुंबातील तरुण खासगी, सरकारी, सेवा क्षेत्रात नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात असतात.
अलीकडे आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, वेगवेगळे संकरित बियाणे, पाणी बचतीचे यंत्रे, पाणी व्यवस्थापन, नियोजनाचे तंत्रज्ञान हळूहळू शेतीमध्ये येत आहे. त्याच बरोबर नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत. त्यामुळे तरुणांना शेतीत शाश्वती दिसत नाही. कोरडवाहू शेती आतबट्ट्याचा धंदा झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ‘शेती नकोच’ असे बहुतांश तरुण म्हणतात.
तरुण शेतकरी नानासाहेब मुंडे (रा. मुंडेवाडी, ता. केज, जि.बीड) म्हणतात, ‘‘शेती कसण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक घटकाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. त्यात मजुरांच्या टंचाईमुळे शेती करणे कठीण होऊन बसलं आहे. शेतीत कष्टाची आणि आर्थिक गुंतवणूक केली, तरीही अचानक निसर्गाचा लहरीपणाचा आघात होतो.
अगदी हातातोंडाशी आलेले पीक बघता बघता नष्ट होते. दुसरीकडे अगदीच सर्व सुरळीत होऊन थोडाफार शेतमाल घरात आलाच, तर पुढे शासकीय धोरणांमुळे आणि व्यापारी साखळीमुळे शेतीमाला अत्यंत कवडीमोल भाव मिळतो. हेच चित्र वर्षानुवर्षे अनुभवत आहे. तर सांगा शेती करायला कोण तरुण पुढे येईल?’’
शेतीमालाचा भाव, नैसर्गिक संकटे, शेती निविष्ठांच्या वाढत्या किमती यामुळे शेती किफायतशीर उरली नाही. गेल्या दहा वर्षांत एखादा अपवाद वगळता बहुतांश शेतीमालाला चांगला भाव मिळत नसल्याचा अनुभव आहे. शेतकऱ्यांकडून माल व्यापाऱ्यांकडे गेल्यावर भाव वाढलेले दिसतात. त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. निविष्ठांच्या किंमतवाढीच्या तुलनेत शेतीमालाचे भाव वाढलेले नाहीत.
त्यामुळे उत्पादन वाढले तरीही उत्पन्न वाढत नाही. सठीसहामाशी शेतीमालाचे भाव वाढ होऊन शेतकऱ्यांकडे चार पैसे येण्याची शक्यता निर्माण झाली, की लगेच सरकारकडून हस्तक्षेप करून भाव पाडले जातात. त्यामुळे शेतीतील गुंतवणुकीचा परतावा मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही.
या संदर्भात शेतकरी सुमंत केदार (रा. एकुरका, ता. केज, जि. बीड) म्हणाले, ‘‘गेल्या सात वर्षांत खासगी सावकार, पतसंस्था, मायक्रो फायनान्स यांच्याकडून घेलेले कर्ज परतफेड करण्याएवढे देखील उत्पन्न शेतीतून मिळाले नाही.’’ अनेक जणांना बिगरशेती क्षेत्रात मजुरी करून कुटुंबाच्या उपजीविकेचा खर्च भागवावा लागत आहे. कोरडवाहू भागाप्रमाणेच बागायती क्षेत्रातील तरुणांचा कलही शेती सोडून शहरात किंवा बिगर कृषी क्षेत्रात मिळेल ते काम करण्याकडे दिसून येत आहे.
शेतीतील वाढती जोखीम
प्रत्येक वर्षी चांगले उत्पादन मिळेल असे वाटत असताना ऐन मोक्याच्या क्षणी घात होतो. कधी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, रोगराई अशी नैसर्गिक संकटे येतात. तर दुसरीकडे उत्पादन जरी चांगले मिळाले, तरीही बाजारभाव काय असतील याचा काहीच नेम नाही. बाजार भाव पाडणे, प्रकिया उद्योगास चांगले वातावरण निर्माण न होऊ देणे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित ठेवणे,
सक्षम कर्जपुरवठ्याचा अभाव, अपुरी बाजारव्यवस्था, साठवणुकीच्या तुटपुंज्या सुविधा, वाहतूक व्यवस्था सक्षम नसणे यासारख्या गोष्टींमुळे शेतीतून उत्पन्नाची हमखास शाश्वती मिळत नाही. त्यामुळे शेती म्हणजे एक प्रकारचा जुगारच वाटतो. त्या तुलनेत शहरांमध्ये नोकरी, रोजंदारी केली तर निदान महिन्याला ठरावीक रक्कम मिळेल, अशी मानसिकता हळूहळू तयार झाली आहे.
अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी शेती हा उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे आणि खरी गोची इथेच आहे. शेतीमधून जर ठरावीक उत्पन्न मिळाले नाही, तर मग कर्जबाजारीपणाचा फेरा सुरू होतो. त्यातून बाहेर पडणे अशक्य होते. तरुण शेतकऱ्यांनी शेतीबरोबर जोडव्यवसायातून उत्पन्नाचे स्रोत तयार करण्याचे प्रयत्न केले तरीही त्यास अनेक अडथळे आहेत.
या संदर्भात तरुण शेतकरी भाऊराव बेंडे (वसमत, जि. हिंगोली) म्हणाले, ‘‘शेती परवडत नाही. मूलभूत गरजा पूर्ण करण्याइतकं उत्पन्न शेतीतून मिळत नाही. त्यामुळे शेती करावीशी वाटत नाही. पण शेतीशिवाय दुसरं उत्पन्नाचं साधन नाही. त्यामुळे नाइलाजाने शेती करावी लागते. शेतीला जोडधंदा म्हणून घरच्यांच्या विरोधात जाऊन शेळीपालनाचा उद्योग केला. मात्र घरचे विरोधात असल्याने त्यात म्हणावं तसं यश आलं नाही.’’
राज्यातील प्रमुख शेतीपूरक जोडधंदा म्हणून दूध धंद्याकडे पाहिले जाते. परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. दूधाचे भाव एवढे पाडलेले आहेत की जनावरांच्या चारा आणि पशुखाद्याचा खर्चही त्यातून निघणे कठीण झाले आहे, असे अनेक शेतकरी सांगतात. अर्थात, शेती आणि शेती पूरक जोडव्यवसायामध्ये प्रत्येक टप्प्यावर अडथळे, धोके, जोखीम असल्याचे पाहण्यास मिळते. त्यावर ठोस उपाय होत नसल्यामुळे शेतीपूरक जोडधंद्यातूनही उत्पन्नाची शाश्वती उरलेली नाही, असे अनेक तरुण शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
रोजगार निर्मितीत अपयश
गेल्या दोन-तीन दशकांमध्ये शेतीचे तुकडीकरण खूप मोठ्या प्रमाणावर झालेले दिसून येते. विशेषतः कुटुंबांच्या अंतर्गत तुकडीकरण होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामागे पिढ्यांचा विस्तार होत जाणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवणे हे दोन घटक कारणीभूत आहेत. १९७०-७१ च्या कृषी गणनेनुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण ३७ टक्के होते.
ते २०१५-१६ मध्ये झालेल्या कृषी गणनेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त झालेले आढळून येते. याचा अर्थ अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या संख्येत जवळपास ४३ टक्क्यांची भर पडली. जमिनीच्या तुकडीकरणाचा परिणाम म्हणून शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळते.
त्यामुळे उपजीविका भागवण्यासाठी कुटुंबातील एका सदस्याने शेती करावी आणि दुसऱ्या सदस्याने बिगर कृषी क्षेत्रात काम, धंदा, नोकरी करावी असे बहुतांश शेतकरी कुटुंबांना वाटते. एवढेच नाही तर अनेक कुटुंबांत वडील शेती सांभाळतात, तर मुलगा बिगर कृषी क्षेत्रात नोकरी, रोजगार, व्यवसाय करताना दिसून येतो. नवरा-बायको असलेल्या कुटुंबात बायको शेतीत आणि नवरा बाहेर रोजंदारी, नोकरी करताना दिसतो.
एकंदर शेतकरी कुटुंबांना उपजीविका भागविण्यासाठी बिगर शेती क्षेत्रातील रोजगारावर अवलंबून राहावे लागत आहे. हा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी शासनाकडून स्थानिक पातळीवर कृषी क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे होते. एका बाजूला दीर्घकालीन धोरणात्मक निर्णयांच्या माध्यमातून शेतीमालाला किफायतशीर भावाची हमी दणे आणि दुसऱ्या बाजूला पायाभूत सुविधा, शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदे, प्रकिया उद्योग भक्कमपणे उभे राहण्यासाठी प्रयत्न करणे, सक्षम बाजारव्यवस्था उभी करणे अशा आघाड्यांवर काम करणे गरजेचे होते.
त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. उलट शेतकरी सन्मान निधी, नमो शेतकरी योजना, अनुदान, पॅकेज जाहीर करून कृषी क्षेत्रातील अपयशावर पांघरून टाकण्याची भूमिका शासनाकडून घेतली गेली. परिणामी तरुणांना शेतीत शाश्वती वाटेल अशी स्थिती उरलेली नाही.
सारांश, शेती म्हणजे प्रचंड श्रमाची गोष्ट आहे; तसेच या श्रमाला समाजात प्रतिष्ठा आणि बाजारमूल्य नाही. त्यामुळे यात जोखीम आणि अनिश्चितता मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तरूणांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. बिगर कृषी क्षेत्रातील आयुष्यात तुलनेने स्थिरता आहे. त्यामुळे तरुण पिढीला शेतीऐवजी शहरात मिळेल ते काम करावे असे वाटते. परिणामी, तरुण पिढी शेतीत उतरण्यास तयार नाही.
परंतु बिगर शेती क्षेत्रातही रोजगार पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यासाठी आवश्यक असलेली औद्योगिक प्रगती खुंटल्यासारखी झाली आहे. तसेच या रोजगारासाठी आवश्यक असलेली कौशल्ये बहुतांश तरुणांकडे नाहीत. त्यामुळे अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. या सगळ्याचा सारासार विचार करून शेती आणि बिगर शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
९८८१९८८३६२
(लेखक शेती, दुष्काळ, पाणी प्रश्नांचे अभ्यासक असून द युनिक फाउंडेशन,
पुणे येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.